zopu yojana scam in kdmc

 

तीन संशयित आरोपींची लाचखोरी कथित चित्रफितीतून प्रसिद्ध झाल्याने पालिकेत खळबळ

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’तील संशयित आरोपी व माजी शहर अभियंता पाटीलबुवा कारभारी उगले, प्रभारी कार्यकारी अभियंता दीपक भोसले हे पालिकेच्या एका ठेकेदाराकडून विकासकामांची नस्ती मंजूर करण्याच्या बदल्यात पैसे स्वीकारत असल्याची एक ध्वनिचित्रफीत प्रसारित झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. या ध्वनिचित्रफिती काही तक्रारदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक सतीश माथूर यांना पाठविण्यात आल्या आहेत. दरम्यान, अशा काही चित्रफिती अस्तित्वात असल्याचे आपणास माहिती नसून असा प्रकार घडलेला नाही, असे स्पष्टीकरण उगले आणि पाटील या दोघाही अभियंत्यांनी दिले आहे.

मंगळवारी दुपारपासून या ‘सीडी’ प्रकरणाची चर्चा शहरात सुरू झाली. गेल्या १५ वर्षांत पालिकेतील अनेक बडे अधिकारी लाचखोरीमुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. दरम्यान, महापालिकेत नियमित कार्यरत असणाऱ्या ठेकेदाराने या चित्रफिती प्रसारित केल्याची चर्चा आहे. या चित्रफितीत महापालिकेच्या विकासकामांशी संबंधित एक ठेकेदार कामाच्या दोन नस्ती (फाइल्स) घेऊन शहर अभियंता पाटीलबुवा कारभारी उगले यांच्या दालनात आल्याचे दिसते आहे. यापुढे त्या ठेकेदाराने उगले यांच्याशी कामांविषयी चर्चा केली आणि खिशातून एक हजार, पाचशेच्या नोटा काढून त्या पाटीलबुवा उगले यांच्या हाती दिल्याचे दिसत आहे. उगले यांनी डाव्या हाताने ती रक्कम स्वीकारून थेट स्वत:च्या खिशात टाकली. यावेळी उगले यांच्या दालनात जानेवारी २०१६चे कॅलेंडर, आजूबाजूला नस्तींचा ढिगारा दिसून येतो.

चित्रफितीत काय?

याच ‘सीडी’मध्ये कार्यकारी अभियंता दीपक भोसले हे स्वत:च्या घरात आलेल्या एका ठेकेदाराकडून विकासकामांच्या नस्ती स्वत:च्या हातात घेऊन त्याची पाहणी करीत आहेत असे दिसते. बिनयन आणि भगव्या लुंगीवर असणारे दीपक भोसले नस्तींची पाहणी केल्यानंतर ठेकेदाराला काही सूचना करीत आहेत. नस्ती ठेकेदाराच्या स्वाधीन केल्यानंतर याचवेळी ठेकेदार पैशांचे पुडके भोसले यांच्या स्वाधीन करीत आहेत. पैशाची गड्डी भोसले यांच्या हाती असतानाच, ठेकेदाराने आणखी ‘एका’ उच्चपदस्थ अभियंत्याला आपण पैसे दिले असल्याचे म्हटले आहे. भोसले ही पैशाची चवड घरातील टेबलावरील रुमालाखाली ठेवत आहेत. त्यानंतर तेथून ठेकेदार काढता पाय घेत आहे. तुम्ही मला गोविंदवाडी रस्ता पाड कामाच्या ठिकाणी भेटा, असे भोसले ठेकेदाराला सांगत आहेत. हे सगळे ध्वनिमुद्रित चित्रीकरण ‘सीडी’मध्ये कैद झाले आहे. ‘लोकसत्ता ठाणे’कडे या सीडीसह मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेली तक्रार आहे. हे प्रकरण जुने असल्याचे काही पालिका सूत्रांचे म्हणणे आहे. पण गोविंदवाडी पाडकाम, उगलेंच्या कार्यालयातील जानेवारी २०१६चे कॅलेंडर त्यामुळे हे प्रकरण मागील सहा ते सात महिन्यांपूर्वीचे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तक्रार कोणी केली?

कल्याण-डोंबिवली पालिकेतील एका कर्मचाऱ्याने पालिकेतील अभियंत्यांची लाचखोरी, भ्रष्टाचार, बजबजपुरीचा गोंधळ पाहून एका कामाच्या बदल्यात अभियंते पैसे स्वीकारत असल्याची एक सीडी मिळवल्याची चर्चा आहे. या कर्मचाऱ्याने आपले मूळ नाव गुलदस्त्यात ठेवले आहे. नगरविकास विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. दरम्यान, ‘या सीडीची सत्यता तपासून पाहावी लागेल. त्या घटना कधी, कोठे घडल्या आहेत. तक्रारदार कोण आणि कशासाठी पालिका अधिकाऱ्यांना पैसे देतोय. यातील सत्यता पडताळून पाहाव्या लागतील, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

आयुक्त बैठकीत

आयुक्त ई. रवींद्रन यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता, त्यांनी नेहमीप्रमाणे कोणताही प्रतिसाद दिला नाही. आयुक्त कार्यालयात दूरध्वनीवर संपर्क केला असता, स्वीय साहाय्यकाने आयुक्त बैठकीत व्यस्त आहेत. नंतर आपणास संपर्क करून देतो, असे सांगितले. असे काही घडल्याची सीडी किंवा तक्रार अद्याप सामान्य प्रशासन विभागाकडे आलेली नाही.’

– दीपक पाटील, उपायुक्त, सामान्य प्रशासन कडोंमपा

असे कधीच काही घडलेले नाही. आता विधिमंडळ अधिवेशन जवळ आले आहे. आपणास अडचणीत आणण्यासाठी काही मंडळींनी हा प्रकार केला असावा. याबाबत कौस्तुभशी बोला, तेच काय ते सांगतील. त्या सीडीत काय आहे हे आपणास माहिती नाही. तूर्तास याप्रकरणी काही लिहू नका.’

– दीपक भोसले, कार्यकारी अभियंता

असा प्रकार आपल्या बाबतीत कधीही झालेला नाही. असे कधी, केव्हा घडल्याचे आपणास आठवतसुद्धा नाही.’

 – पाटीलबुवा उगले, माजी शहर अभियंता

Story img Loader