शाळेतील मुलांचा गुणवत्तापूर्ण विकास आणि शाळेत भौतिक सुविधा देण्यात आघाडी घेऊन, शिक्षक, विद्यार्थी आणि लोकसहभागातून शाळेचा सर्वागीण विकास मुरबाड तालुक्यातील (जि. ठाणे) बुरसुंगे प्राथमिक शाळेने केला आहे. शाळेच्या या गुणवत्तापूर्ण कार्याची दखल पुणे येथील गुणनियंत्रण विभागाने घेतली आणि शाळेला ‘आयएसओ’(९००१-२०१५) दर्जा बहाल केला आहे. सोमवारी या दर्जाची घोषणा करण्यात आली. अशा प्रकारचा दर्जा मिळणारी ठाणे जिल्हा परिषदेची ही पहिलीच ‘आयएसओ’ शाळा आहे.
बुरसुंगे शाळेतील विविध शैक्षणिक व अन्य सुविधांची तपासणी करण्यासाठी पुणे येथून ‘आयएसओ’ दर्जा देणाऱ्या पाहणी पथकाने भेट दिली. दर्जासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्यात आल्यामुळे बुरसुंगे शाळेला आयएसओ दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागात ठाणे जिल्हा परिषदेची बुरसुंगे प्राथमिक शाळा आहे. शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. शाळेत एकूण ३३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण मिळावे. त्या माध्यमातून त्यांना अभ्यासक्रमातील धडे देता यावेत म्हणून यापूर्वीच शाळा डिजिटल (संगणक तंत्रज्ञान) करण्यात आली आहे. शहरी भागातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत अत्याधुनिक सुविधा मिळतात, तशाच सुविधा ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या मुलांना मिळाल्या पाहिजेत. हा विचार करून बुरसुंगे शाळेचे शिक्षक महेंद्र सुपेकर यांनी शाळेला ‘आयएसओ’ दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केले. ‘आयएसओ’च्या गुणवत्ता प्रमाणकानुसार शाळेत शैक्षणिक, भौतिक, सुशोभीकरणाच्या सुविधा निर्माण करणे आवश्यक होते. हा विषय खर्चिक असल्याने सुपेकर यांनी हा विषय काही महिने गुंडाळून ठेवला. पण शाळा ‘आयएसओ’ करण्याचा निर्धार असल्याने, त्यांनी हा विषय केंद्रप्रमुख गोपाळ सोनावळे यांना सांगितला. सोनावळे यांनी शाळा, शिक्षक पुढाकार घेणार असेल तर, आपण शाळेत सुविधा देण्यासाठी काही खर्चाची तजवीज करू, अशी तयारी दर्शविली. त्यामुळे शाळेतील आर्थिक प्रश्न सुटला.
उपलब्ध निधीतून गुणनियंत्रण संस्थेने केलेल्या सूचनांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले. शाळेतील खिडक्यांना पडदे लावण्यात आले. अन्य प्रकल्प राबविण्यात आले. गेल्या चार महिन्यापासून नव्या जोमाने शिक्षक महेंद्र सुपेकर, शिक्षिका प्रणाली काळे, केंद्रप्रमुख गोपाळ सोनावळे, विद्यार्थी, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी कामाला लागले. ‘आयएसओ’ दर्जा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता करण्यात आली.
शाळेने ‘आयएसओ’ दर्जा प्राप्त करण्यासाठी केलेल्या सुविधांची पाहणी करण्यासाठी पुणे येथून एक पथक बुरसुंगे शाळेत आले होते. या पाहणी पथकाने शाळेने केलेल्या कार्याची पाहणी करून शाळेला आयएसओ दर्जा देत असल्याचे जाहीर केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा