गेली ४५ वर्षे अमेरिकेच्या स्वाभिमानाला अधिक प्रखर करणाऱ्या इतर अनेक रोमहर्षक घटनांमध्ये चांद्रविजय महत्त्वाचा मानला जातो. चंद्रावर पडलेले मानवाचे पहिले पाऊल हा संपूर्ण मानवजातीच्या श्रेष्ठतमतेचा नमुना असला, तरी २० जुलै १९६९ नंतर ४५ वर्षांत कुठल्याही राष्ट्राला अशी यशस्वी मोहीम आखता आलेली नाही. या घटनेबाबतचे ‘षड्यंत्र सिद्धान्त’ मात्र जगभराने राबवले. खुद्द अमेरिकी ‘पॉप कल्चर’ चांद्रमोहिमेवरचा अविश्वास विविध घटकांनी राबवू लागले. आजच्या सोशल नेटवर्किंगच्या युगात असे षड्यंत्र सिद्धान्त खूपच लोकप्रिय होऊ शकले असते. मात्र याच सोशल नेटवर्किंगचा वापर चंद्र पाहिलेल्या माणसांनीच यंदाचे चांद्रविजय वर्ष साजरे करण्यासाठी करायचे ठरविले आहे. याबाबत नासा सोशल नेटवर्किंगवर करीत असलेल्या ऐतिहासिक कार्यक्रमानिमित्ताने चांद्र-लढाईच्या स्मृतींना नव्याने उजाळा-
सांगू चांद्रमानवाला काही
यंदा चांद्रमोहिमेच्या ४५ व्या वर्धापनदिनाचा जास्त गाजावाजा करायचा व त्याला आधुनिक जगातील सोशल नेटवìकगची साथ घ्यायची, असे बझ आल्ड्रिन यांनी ठरवले आहे. त्यामुळेच त्यांनी चंद्रावतरणाची व्हिडीओ यू टय़ूबवर टाकून पुन्हा स्मृती जागवल्या आहेत. या निमित्ताने त्यांनी लोकांमध्ये जागृती घडवण्यासाठी पुस्तक मोहीमही राबवली आहे. अपोलो मोहीम त्यांच्यासाठी किती महत्त्वाची व देशासाठी किती महत्त्वाची याचे विवेचन त्यांनी यात केले आहे. ट्विटरवर hashtag #Apollo45 <https://twitter.com/ search?q=%23Apollo45&src=tyah> मध्ये त्यांनी या मोहिमेची बरीच माहिती दिली आहे. नासा व अमेरिका सरकारनेही हा ऐतिहासिक कार्यक्रम करायचे ठरवले आहे. चांद्रविजयाचा प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळा अर्थ आहे. तो त्यांनी आम्हाला आमच्या ट्विटर हॅशटॅगवर कळवावा असे चांद्रवीर आल्ड्रिन यांनी म्हटले आहे.
विजयेतिहास!
अमेरिकेत २० जुल १९६९ रोजीची संध्याकाळ नवलाईची होती. तेथील लाखो लोक त्यांच्या दूरदर्शन संचावर माणसाने चंद्रावर पाऊल ठेवून मिळवलेला चांद्रविजय पाहण्यासाठी उत्सुक होते. अमेरिकेचा अपोलो ११ मोहिमेचा कमांडर नील आर्मस्ट्रॉँग याने पहिल्यांदा चांद्रभूमीवर मानवी पावलाचा ठसा उमटवला. या साहसी चांद्रमोहिमेला २० जुल २०१४ रोजी ४५ वष्रे पूर्ण होत आहेत. त्यानंतर कुठल्याही देशाने चांद्रमोहीम राबवली नाही, कारण त्यांना त्यात स्वारस्य वाटले नाही. चंद्रावर जाऊन माणूस बरेच काही करू शकला असता; निदान एकदा तरी अशी चांद्रमोहीम एखाद्या देशाने करून दाखवायला हरकत नव्हती, पण तसे काही घडले नाही. त्यामुळे अमेरिकेने चंद्रावर ठेवलेले पाऊल हा मानवजातीचा विजय खरा; पण तो खरे तर अमेरिकेने शीतयुद्धाच्या निमित्ताने रशियावर मिळवलेला तंत्रज्ञानातील विजय होता. अनेक जणांनी अमेरिका चंद्रावर गेलीच नाही, ती छायाचित्रे खोटी आहेत असा रडीचा डाव खेळून पाहिला. पण अपोलो मोहिमेतील ४० हजार लोकांपकी एकाने तरी या विरोधात तोंड उघडले नसते यावर विश्वास बसत नाही. सूत्रांच्या मते चांद्रविजय खोटा असल्याचे गुपित जपणे हे अणुबॉम्ब ज्या मोहिमेत बनवला होता, त्या मॅनहटन प्रकल्पापेक्षा अवघड होते. त्यामुळे चांद्रविजय खोटा असल्याची सुतराम शक्यता नाही. ज्येष्ठ विश्वरचना शास्त्रज्ञ कार्ल सगान यांनीही माणूस चंद्रावर उतरलाच नाही हे तर्कट फेटाळलेले आहे. बझ आल्ड्रिन तर आता या प्रश्नाला उत्तर देण्याचे काहीच कारण नाही असे सांगतात.
अपोलो-११ मोहिमेची कहाणी
अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांनी २५ मे १९६१ रोजी काँग्रेसपुढे एक भाषण केले होते. त्यात त्यांनी अमेरिका रशियाच्या तुलनेत तंत्रज्ञानामध्ये मागे पडत असल्याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी त्या वेळी त्या दशकाच्या अखेरीस अमेरिकी माणूस चंद्रावर उतरला पाहिजे असे जणू आव्हानच दिले होते. त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजे १६ जुलै १९६९ रोजी अपोलो ११ यान केनेडी स्पेस सेंटर येथून अवकाशात झेपावले. तीन दिवसांच्या प्रवासानंतर कमांडर नील आर्मस्ट्राँग, कमांडर मॉडय़ुल, पायलट मायकेल कॉलिन्स, ल्युनर ज्युनियर, पायलट एडविन ई आल्ड्रिन हे चांद्रभूमीवर पोहोचले. तेथे पहिले मानवी पाऊल ठेवण्याचा मान कमांडर नील आर्मस्ट्राँग यांना मिळाला. त्या वेळी त्यांनी ‘दॅट्स वन स्मॉल स्टेप फॉर अ मॅन, वन जायंट लीप फॉर मॅनकाइंड’ असे उद्गार काढले होते.
शीतयुद्धाचा परिणाम
१९५७ मध्ये रशियाचा ‘स्पुटनिक’ हा उपग्रह जेव्हा अवकाशात टिक. टिक करू लागला तेव्हा अमेरिकी नेतृत्वाच्या म्हणजे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी १९७० पर्यंत माणसाला चंद्रावर पाठवण्याची भीष्मप्रतिज्ञा केली. त्यांच्या ह्रदयाचा ठोका चुकला आणि त्यांनी यापेक्षा भव्यदिव्य असे काही तरी करून दाखवण्याची ईर्षां मनीमानसी बाळगली. नासाने त्यांचे हे स्वप्न खरे केले. या मोहिमेतील जे चांद्रवीर होते त्यातील नील आर्मस्ट्राँग नुकतेच निवर्तले आहेत. बझ आल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स हे जिवंत आहेत. नेहमीच्या प्रथेप्रमाणे ते २० जुलला अध्यक्ष बराक ओबामा यांना भेटायला जाणार आहेत, पण प्रथमच नील आर्मस्ट्रॉँग या कमांडरशिवाय ते जाणार आहेत. अमेरिकेच्या आधी रशियाचा युरी गागारिन हा पहिला अंतराळवीर एप्रिल १९६१ मध्ये व्होस्टोक यानातून अवकाशात जाऊन आला होता. त्यानंतर अमेरिकेने या स्पध्रेत काहीसा उशिरा प्रवेश करूनही नंतर जे यश मिळवले ते झगमगते होते. अमेरिकेच्या नासा या संस्थेत तेव्हा राजकारण जास्त होते व अमेरिकी काँग्रेसमध्येही मतभेद होते. रशियात मात्र तसे नव्हते, पसाही भरपूर होता व मतभेदही नव्हते. त्यामुळे रशियन अंतराळवीरांनी अनेक विक्रम नोंदवले.
अंतराळ संशोधनातही फक्त राजकीय इच्छाशक्ती व पसा महत्त्वाचा असतो हेच त्यातून सिद्ध होते. आजची परिस्थिती पाहता आपल्याला रशिया व अमेरिका यांच्यात युक्रेनवरून शीतयुद्धसदृश स्थिती दिसते. सध्या अमेरिकेकडे स्पेस शटलसारखे अंतराळ वाहन नाही, त्यामुळे त्यांना रशियाची मदत घ्यावी लागते. अमेरिकेच्या एका अंतराळवीरास अंतराळ स्थानकात नेऊन सोडण्यासाठी रशिया अब्जावधी डॉलर अमेरिकेकडून उकळते आहे. नासाने आपल्याकडे पसा नाही असे सांगून अंतराळ संशोधनाला अंतराळ पर्यटनाचे रूप देऊन त्याचे खासगीकरण केले आहे.‘मार्स वन’सारख्या मोहिमेत भारतासह अनेक देशांचे साहसी वीर परत न येण्याच्या बोलीवर
मंगळावर जाण्यास तयार झाले आहेत. त्या काळात माणूस चंद्रावर उतरणे ही अशक्य बाब वाटत होती, पण ते स्वप्न साकार झाले. मंगळाचे स्वप्नही साकार होईल.
पृथ्वीवर आगमन
द कमांड मॉडय़ुलचे नाव कोलंबिया होते. त्यात दोन भाग होते, त्यात वरती शंकूसारखा आकार होता. त्यात तिघे चांद्रवीर बसले, कारण ते परतीचे वाहन होते. पृथ्वीच्या कक्षेत परत आल्यानंतर त्यांनी पॅसिफिक महासागरावर कोलंबिया वाहन आणले व नंतर पॅराशूटने समुद्रात उतरले. नंतर हेलिकॉप्टरने त्यांना अमेरिकेच्या यूएसएस हॉन्रेट या युद्धनौकेत आणण्यात आले. २४ जुलै १९६९ रोजी कोलंबिया मोडय़ुल पृथ्वीवर परतले. अपोलो ११ मोहीम यशस्वी झाली व अध्यक्ष केनेडी यांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले. त्या अगोदर २७ जानेवारी १९६७ मध्ये अपोलो १ मोहिमेतील चीन चांद्रवीर मरण पावले होते. अपोलो-१ सुद्धा उतरवताना गडबड होत आली होती, पण अवघ्या २० सेकंदांपुरते इंधन राहिले असताना ते सुखरूप उतरले. या मोहिमेपूर्वी चंद्रासारखा पृष्ठभाग असलेल्या अमेरिकेतील अरिझोना उल्कापात विवर, सनसेट विवर येथे चांद्रवीरांनी सराव केला होता. ग्रीक पुराणातील प्रकाशाची देवता असलेल्या झिअसच्या पुत्राचे नाव अपोलो होते त्यावरून या मोहिमेला अपोलो असे नाव देण्यात आले होते.
चंद्रावर पहिल्यांदा कुणी उतरायचे?
चंद्रावर पहिले पाऊल कुणी ठेवायचे याचा संकेत खरे तर वेगळा होता. त्यामुळे त्या पथकातील सर्वात कनिष्ठ सदस्याने उतरायचे असे ठरले होते. पण नासाच्या संदेशानुसार कमांडर नील आर्मस्ट्राँग यांना चांद्रभूमीवर पाऊल ठेवण्यास सांगण्यात आले. पण आता ८४ वष्रे वय असलेल्या आल्ड्रिन यांना त्याची जराही खंत नाही. ते म्हणतात की, कमांडर या नात्याने नीललाच तो मान मिळायला हवा होता. आपल्याला त्याचे अजिबात शल्य वाटत नाही, पण आता या ४५ वर्षपूर्तीनिमित्त त्यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे की, अपोलो ११ मोहिमेतील सहभागाबद्दल आपल्याला ‘डेसिगनेटेड ल्यूनर अँबेसेडर’ म्हणजे ‘विशेष चांद्रदूत’ म्हणून ओळखले जावे किंवा तसे जाहीर करावे.
घराची खरी किंमत घर सोडल्यावरच कळते तशीच काहीशी भावना तिघा चांद्रवीरांची अपोलो यानातून पृथ्वीचे दर्शन घेताना होती. ४५ वर्षांपूर्वी पृथ्वीचे अंतराळात खोलवरच्या भागात जाऊन प्रथमच छायाचित्र टिपण्यात आले. त्यानंतर२३ ऑगस्ट १९६६ रोजी नासाच्या ‘ल्यूनर ऑरबायटर वन’ यानाने चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीचे पहिले छायाचित्र पाठवले. १९४०, १९५० व १९६० मध्ये उपग्रहांनी पृथ्वीची छायाचित्रे टिपली होती, पण त्यापेक्षा हा अनुभव वेगळा होता.
कोण काय म्हणाले-
चंद्रावर उतरल्यानंतर नील आर्मस्ट्राँगने काय वाक्य उच्चारायचे हे ठरलेले होते. त्यानुसार त्यांनी ‘दॅटस वन स्मॉल स्टेप फॉर मॅन वन जायंट लीप फॉर मनकाइंड’ असे म्हणायचे ठरले होते. तेथे उतरल्यानंतर थोडा ‘ध’ चा ‘मा’ झाला व ते म्हणाले ‘दॅटस वन स्मॉल स्टेप फॉर अ मॅन वन जायंट लीप फॉर मनकाइंड’ त्यानंतर ते नेमके काय म्हणाले यावर बरेच संशोधन झाले. काहींच्या मते त्यांनी बरोबर शब्द उच्चारले, पण तिथे ते नीट ऐकू आले नाहीत. चांद्रविजय म्हणाले की, नील आर्मस्ट्राँग काय म्हणाला ते लक्षात राहिले. पण आल्ड्रिन यांनीही त्यांची उत्कट भावना प्रत्यक्ष तिथे व्यक्त केली, ती म्हणजे इतकी निर्जन, शांत जागा (मॅग्निफिसंट डेझोलेशन) पृथ्वीवर सापडणे कठीण आहे. चंद्रावरची भूमी पाहताना पहिल्या काही क्षणात हे विचार आपल्या मनात आले, असे ते म्हणतात. चंद्रावरून पृथ्वीकडे पाहताना काय वाटत होते या प्रश्नावर ते म्हणतात की, कुठे अब्जावधी माणसांची गर्दी असलेली पृथ्वी व इथे तर आम्ही तिघेच होतो. आम्ही हा विजय तिथे साजरा करूही शकलो नाही.
तो चित्तथरारक क्षण
चंद्रावर कुठे उतरायचे हे ठरलेले होते, पण आपण एका क्षणात उतरण्याची प्रक्रिया बदलली. आम्ही जिथे उतरणार होतो त्याच्या काही फूट लांब अंतरावर उतरायचे ठरले. ल्यूनर लँडरचे प्रायमरी थ्रस्टर्स संपले होते. आमच्या चमूला दिशादर्शनप्रणाली पुन्हा सुरू करून उतरावे लागले. खरे तर ती माझी चूक होती, मी नीलला वेगळे काही तरी सुचवत होतो व मी काय म्हणतो आहे हे त्याला बरोबर समजते आहे असे मानण्यात त्याची चूक झाली. त्यामुळे आम्ही दोघांनी चुका केल्या.
माणसाची अंतराळातील पुढची संस्मरणीय कामगिरी ठरेल ती म्हणजे पृथ्वीचे भावंड मानलेल्या मंगळावरचे यशस्वी अवतरण. दोन दशकात अमेरिका मंगळावर पोहोचेल यात शंका नाही, पण मंगळावरची मोहीम आखताना ती ‘ना परतीची’च असायला हवी, म्हणजे जे जातील त्यांनी तिथेच राहायचे परत यायचे नाही. तुम्ही जर पृथ्वीने निर्माण केलेले अंतराळ क्षेत्रातील प्रणेते असाल व मानवजातीसाठी झोकून देण्याची इच्छा असेल तरच असे करू शकाल. लोकांना मंगळावर नेऊन परत आणणे सोपे नाही. काही खासगी कंपन्यांनी तसे दावे केले असले तरी त्यात तथ्य नाही. मंगळावर कायमची वसाहत करावी व ती करणे शक्य आहे. मंगळावर जाणे म्हणजे आत्महत्या मोहीम आहे हे आपल्याला मान्य नाही. खासगी पर्यटकांचे लोकांना मंगळावर पाठवण्याचे प्रयत्न फारसे प्रशंसनीय नाहीत. अमेरिकने आता पुन्हा चंद्राकडे वळण्याऐवजी मंगळाकडे वळावे. लघुग्रहांवर मानवाला न पाठवता तेथे यंत्रमानव पाठवावेत, उगाच शक्ती खर्च करू नये.
– बझ आल्ड्रीन
चंद्र-पृथ्वी अंतर २३८९०० मल (पृथ्वीच्या व्यासाच्या ३० पट)
सॅटर्न पाच अग्निबाणाने
अपोलो -११ चंद्रावर लागलेला कालावधी- तीन दिवस