आज सोशल मीडियावर; खरंतर ट्विटर या संकेतस्थळावर तिने गाझा येथून युद्धाचा आँखो देखा हाल ट्विटरवर सांगितला आहे. तिचे वडील गाझा शहरातील शिफा रूग्णालयात शल्यकर्मी डॉक्टर आहेत व ती या रूग्णालयाच्या जवळच राहते. माध्यमिक शाळेत शिकणारी ही चिमुरडी अ‍ॅथलिट आहे. तिचे ट्विटरवर ८०० अनुसारक (फॉलोअर्स) होते; ते या युद्धकथेने एकदम १ लाख ६६ हजार झाले आहेत. तिचं नाव आहे फराह बेकर. तिने तिच्या अकाउंटवर जे पोस्ट केले आहेत ते अतिशय जिवंत चित्र उभे करणारे आहेत. त्यामुळे पॅलेस्टिनींना जगातून पािठबा मिळत आहे. १ ऑगस्टला तिने व्हिडिओ टाकली आहे, त्यात रस्त्यावर पडलेल्या बॉम्बमुळे निर्माण झालेला काळोख दिसतो आहे. एका संदेशात ती म्हणते की, मी आता घरात एका खोलीत लपलेली आहे, जगाला या युद्धाची खरी कहाणी कळावी एवढाच या संदेशांचा हेतू आहे. तिच्याकडे अर्थातच स्मार्टफोन आहे त्यावरून ती व्हिडिओज व जे काय होते आहे त्याचा थरारारक वृत्तान्त टाकते आहे. या संदेशांमध्ये नाट्यमयता आहे, तिच्या भोवतीची भीती आपल्याला जाणवेल अशी बोलकी भाषा आहे. निळ्या डोळ्याची ही मुलगी खरोखर सोशल मीडियाची सेन्सेशन ठरली आहे. मी थोड्याशाच लोकांसाठी लिहिते आहे असे पहिल्यांदा वाटत होते पण आता माझे लिहिलेले जगभरात वाचले जातेय हे समजले, असे ती म्हणते. ती वकील होण्याचे स्वप्न बघते आहे, इस्रायल व इजिप्त यांच्या बेचक्यात सापडलेल्या गाझा सागरी किनारपट्टीमध्ये जे अत्याचार चालू आहेत त्यात तिला गाझाची बाजू मांडायचीय. ती म्हणते अजून मी लहान आहे, येथे जे चालले आहे ते जगाला दाखवणे हेच मी करू शकते. एखादे वेळी रडू कोसळते तेव्हा नकळत शब्द झरझर उमटू लागतात, भीती वाटायला लागते पण मी स्वत:लाच बजावते, ‘बये, थांबू नकोस; तुला हे सगळं सहन करावंच लागणार आहे. शेवटी प्राक्तन कुणाला चुकलय..Farah_Gazan<https://twitter.com/Farah_Gazan&gt; हा तिचा ट्विटर पत्ता आहे. तुम्हीही तिची ही दर्दभरी युद्धकथा वाचू शकता.

Story img Loader