नद्यांना येणाऱ्या पुराची पूर्वसूचना अकरा महिने आधी देण्याची नवीन पद्धत शोधून काढल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. नद्यांच्या खोऱ्यातील गुरुत्वीय क्षेत्रात होणारे सूक्ष्म बदल उपग्रहांच्या मदतीने टिपून हे भाकित करण्यात येणार आहे. वैज्ञानिकांनी प्रथम एखाद्या नदीच्या खोऱ्यात पुराच्या काळात किती पाणी सामावू शकते याचाही विचार केला आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे भूवैज्ञानिक जे. टी. रीगर यांनी हा शोधनिबंध लिहिला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, एका बादलीत किती पाणी साठू शकते हे ठरलेले असते. तसेच नद्यांच्या खोऱ्यात किती पाणी साठू शकते हेही ठरलेले असते. रीगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपग्रहांनी दिलेल्या माहितीच्या आधारे २०११ मध्ये मिसुरी नदीच्या पुरात किती पाणी जमिनीत शोषले जाऊ शकते व किती पाण्यामुळे पूर येऊ शकतो हे नमूद केले आहे, असे लाइव्ह सायन्सच्या वृत्तात म्हटले आहे. नद्यांना मोठे पूर केव्हा येणार हे पाच महिने आधी सांख्यिकीय प्रारूपाच्या मदतीने सांगता येते. काही वेळा ११ महिने अगोदरही पुराचे भाकित करता येणार आहे. पाऊस पडण्याच्या आधीच आपण पुराचा अंदाज सांगू शकतो असा दावा रीगर यांनी केला असून विश्वासार्ह सूचना सात महिने अगोदर देऊ शकतो असे म्हटले आहे. पुराचा अंदाज देता आल्यास पिकांची नासाडी वाचेल शिवाय मनुष्यहानीलाही आळा बसेल असे त्यांचे म्हणणे आहे, नासाच्या ग्रेस या उपग्रहांच्या माहितीवरून त्यांनी एखाद्या भागाची पूरक्षमता सांगितली आहे. पृथ्वीवरील नद्यांच्या खोऱ्यात गुरुत्वाकर्षणात बदल होत असतो त्यामुळे उपग्रहांची कक्षा किंचित बदलते, पुराचे पाणी व बर्फ यांचे वस्तुमान हे या गुरुत्वीय क्षेत्रातील बदलांशी समरूप असतात त्यामुळे अवकाशातील उपग्रहाच्या मदतीने आपण जमिनीवर पूर येणार की नाही हे सांगू शकतो असे रीगर यांचे म्हणणे आहे. नेचर जियोसायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Story img Loader