आपण जो नेहमी चहा पितो त्यापेक्षा ग्रीन टी महाग असतो पण त्यात जास्त औषधी गुण असतात. तो दुधाबरोबर वापरला जात नाही तर काढय़ासारखा वापरला जातो. त्यामुळे माणसाचे सर्वागीण आरोग्य सुधारते. मेंदूची शक्ती वाढते. स्वित्र्झलडच्या संशोधकांच्या मते ग्रीन टी मुळे आकलन वाढते, डिमेन्शिया (विसरभोळेपणा) यात सुधारणा दिसून येते. आतापर्यंत ग्रीन टी कर्करोगावर कसा गुणकारी आहे यावर बरेच संशोधन झाले आहे, पण ग्रीन टी मुळे मेंदूची बोधन क्षमता वाढते हे बॅसेल विद्यापीठाचे ख्रिस्तोफर बेगलिंगर व सायकिअॅट्रिक युनिव्हर्सिटी क्लिनिकचे स्टेफन बोरगाईट यांनी एक प्रयोग केला. त्यानुसार ग्रीन टी चा अर्क घेतल्यास मेंदूतील जोडण्या सुधारतात. तसेच मेंदूची तंदुरुस्ती वाढते. दोन्ही भाग कार्यक्षमतेने काम करतात, कामचलाऊ स्मृती लगेच सुधारते. काही प्रौढांना ग्रीन टी देऊन स्मृतींशी संबंधित कामे सांगितल्यानंतर त्यांनी ती चटकन केली. मॅग्नेटिक रेझोनन्स पद्धतीने मेंदूचा अभ्यास केला असता मेंदूच्या पॅरिएटल व फ्रंटल कॉर्टेक्स या भागातील जोडणी चांगली झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ज्यांच्यावर प्रयोग केला त्या प्रौढांची काम करण्याची क्षमता सुधारली. ग्रीन टी मुळे मेंदूतील जोडण्यांची लवचिकता वाढते, असे बोर्गवार्डट यांचे मत आहे. ज्यांच्यात बोधनात्मक क्रियेमध्ये बिघाड आहे अशा लोकांमध्ये मेंदूचे कार्य ग्रीन टी मुळे सुधारते. डिमेन्शिया या न्यूरोसायकिअॅट्रिक आजारातही त्याचा फायदा होतो. सायकोफार्माकोलॉडी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाणी तपासण्याचे यंत्र
आपल्याकडे पिण्याच्या पाण्याचा दर्जा तपासून बघण्याच्या भानगडीत कुणी फारसे पडत नाही. श्रीमंतांच्या घरात ते तपासण्याची गरज नसते कारण अगदी बोअरचे पाणीही शुद्ध करणारी यंत्रे मिळतात. दूषित पाण्यामुळे माणसाला अनेक आजार होतात, त्यामुळे सुरक्षित पेयजल मिळणे हा खरा तर सर्वाचाच अधिकार आहे. पाणी दूषित आहे की स्वच्छ हे ओळखण्यासाठी भारतीय वंशाच्या मनूप्रकाश या अमेरिकी वैज्ञानिकाने एक रासायनिक संच तयार केला आहे त्याची किंमत अवघी पाच डॉलर आहे. विकसनशील देशात पाण्याच्याच नव्हे तर रोगांच्या निदानासाठी त्याचा वापर करता येणार आहे. मनूप्रकाश हे स्टॅनफर्डच्या जैवअभियांत्रिकी विभागात सहायक प्राध्यापक आहेत. त्यांना हे यंत्र आणखी विकसित करण्यासाठी पन्नास हजार डॉलरचे अनुदान मिळाले आहे. त्यात बऱ्याच नावीन्यपूर्ण कल्पना वापरल्या असून ते यंत्र मुलांना संगीत खेळणे म्हणूनही वापरता येते त्यामुळे तो म्युझिक बॉक्सही आहे. म्हटलं तर पाणी किंवा द्रवाची चाचणी करणारे यंत्र  नाहीतर खेळणे आहे. त्यात एक चाक, एक सिलिकॉन चिप, आवर्ती छिद्र असलेला पेपर टेप आहे. सिलिकॉन चिपमध्ये द्रव वाहिन्या आहेत. जेव्हा पिन पेपर टेपमधील छिद्रात जाते तेव्हा द्रवाचा ठिपका पडतो. असे पंधरा पंप एकावेळी थेंब पडण्याने सुरू होतात. हा रासायनिक संच कुठेही नेता येतो व पाण्याचा, मातीचा दर्जा त्याच्या मदतीने तपासता येतो. शिवाय सापाच्या विषाची चाचणीही करता येते. मनूप्रकाश व जॉर्ज कोरिक यांनी हे यंत्र स्वस्तात तयार केले आहे.

तुमच्या हृदयाचे वय किती?
हृदय हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव असतो. वैज्ञानिकांनी आता हृदयाचे खरे वय ठरवणारे साधन शोधून काढले आहे. कौटुंबिक व जीवनशैलीविषयक जोखमीचे घटक पाहून हे साधन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे जोखमीचे घटक नसलेल्यांच्या तुलनेत ते असलेली व्यक्ती उपचार न केल्यास हृदविकाराचा झटका येण्यापूर्वी किती काळ जगू शकेल याचा अंदाज करता येतो. ब्रिटिश मेडिकल सोसायटीजच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार जेबीएस३ जोखीम मापक त्यांनी तयार केली आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला हृदयविकाराचा धोका कितपत आहे? तो कसा टाळता येईल हे अगदी अलीकडच्या टप्प्यात समजते. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.सध्याची जीवनशैली, रक्तदाब, कोलेस्टेरॉल पातळी, वैद्यकीय स्थिती यांचा हृदयावर जो परिणाम होतो याचा विचार यात केला जात आहे. समजा ३५ वर्षांच्या एका स्त्रीचा सिस्टॉलिक रक्तदाब १६० एमएम व कोलेस्टेरॉल ७ एममोल/ लिटर आहे शिवाय घरात हृदयविकाराचा इतिहास आहे तर तिच्या हृदयाचे वय ४७ समजावे व हृदयविकारापुरता विचार केला तर तिला ७१ व्या वर्षीपर्यंत हृदयविकार व पक्षाघाताचा धोका नाही. दहा वर्षांतील तिची जोखीम ८ टक्के असेल. जर स्त्रियांनी धूम्रपान सोडले, कोलेस्टेरॉल ४ एम.मोल/ लि. व सिस्टॉलिक रक्तदाब १३० ठेवला तर त्यांच्या हृदयाचे वय ३० पर्यंत खाली येते व या स्त्रिया हृदयविकार न होता ८५ वर्षे जगतील. दहा वर्षांत त्यांची जोखीम ०.२५ टक्केही राहणार नाही. जेबीएस३ हा मोठा जोखमीचा घटक असतो. तो तुमच्या जीवनशैलीने किती परिवर्तन घडले हे दाखवतो. धूम्रपान सोडणे, आरोग्यदायी आहार पद्धती, नियमित व्यायाम यामुळे हृदयविकाराचा धोका टळू शकतो.

मेदाचे प्रमाण तपासणारी रक्तचाचणी
डीएनएचे वाचन करणारी एक साधी रक्त चाचणी. तुमच्या मुलात लठ्ठेपणा येणार की नाही हे सांगू शकणार आहे. साऊथहॅम्पटन, एक्स्टर, प्लायमाऊथ या विद्यापीठातील संशोधकांनी ही चाचणी विकसित केली असून, त्यात ‘पीजीसी१ए’ या जनुकातील एपिजेनेटिक स्वीचेसचा अभ्यास करण्यात आला आहे, हे जनुक शरीरात मेदाचा साठा करण्यास कारणीभूत ठरत असते. डीएनए मेथिलेशन. या रासायनिक बदलामुळे एपिजेनेटिक स्वीचेस तयार होतात. ही स्वीचेस जनुकाचे नियंत्रण करीत असतात. साऊथहॅम्पटन विद्यापीठाच्या संशोधकांना असे दिसून आले की, पाच वर्षांच्या मुलांवर ही चाचणी केली असता ते मोठे होतील तेव्हा त्यांच्या रक्तात मेदाचे प्रमाण किती असेल हे सांगता येते. डीएनए मेथिलेशन हे वयाच्या ५ व्या वर्षी १० टक्के जास्त असले तर वयाच्या १४ व्या वर्षी त्या मुलात मेदाचे प्रमाण हे १२ टक्के असणार हे उघड आहे. मुलगा असो की मुलगी मेदाचे हे गणित चुकणार नाही, असा वैज्ञानिकांचा दावा आहे. साऊथ हॅम्प्टन विद्यापीठाचे डॉ. ग्रॅहॅम ब्रज व डॉ. कॅरेन लिलीक्रॉप यांनी हे संशोधन केले आहे. मोठेपणी मुले लठ्ठ होतील की नाही हे वयाच्या पाचव्या वर्षीय समजण्यासाठी त्यांनी ही  चाचणी विकसित केली आहे. या संशोधनाचा दुसरा अर्थ लहानपणीचा लठ्ठपणा हा केवळ जीवनशैलीवर नव्हे तर त्याचे नियंत्रण करणाऱ्या जनुकांवर अवलंबून असतो. या ज्ञानातून पुढे विकसित व विकसनशील देशातील मुलांमध्ये असलेला लठ्ठपणा रोखण्यात मदत होणार आहे. यात एक्स्टर विद्यापीठाच्या टेरेन्स विलकीन, प्लायमाऊथ विद्यापीठाच्या डॉ. जोआन होस्किंग यांचा सहभाग होता. ‘डायबेटिस’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. अर्ली बर्ड प्रोजेक्ट या प्रकल्पात प्लायमाऊथ विद्यापीठात ३०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यातील ४० मुलांची डीएनए तपासणी करण्यात आली. वय वर्षे पाच ते १४ या काळात त्यांच्यावर संशोधन करण्यात आलो. मुले किती मेद सेवन करतात, किती व्यायाम करतात, याचा अभ्यास करून त्यांचे रक्त नमुने गोळा करण्यात आले. त्यातील जनुके काढून एपिजेनेटिक स्वीचेस तपासण्यात आली. लठ्ठपणामुळे टाइप-२ मधुमेह होण्याची शक्यता असते.

मराठीतील सर्व Thats इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health related information