पूर्वीपेक्षा लोक खूप संवादतायत. आभासी माध्यमातून का होईना एकमेकांशी जास्तच संपर्क ठेवतायत. व्हॉट्स अॅपवरचे ग्रुप्स वाढतायत. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक भल्या-बुऱ्या-निर्थक घटनेला विस्तृत प्रमाणावर शेअर करतायत. ‘चमको’ फॉरवर्डेड मेसेज, पोस्टना अधिक चमकण्यासाठी आणखी फॉरवर्ड होतायत. संवादांची तुडुंब गर्दी भूतलावर झाली आहे. मात्र मूळ भाषांचे अस्तित्व नष्ट होत आहे, जी कधी भाषिक वैशिष्टय़े होती अशी संवादाची बोली नष्ट होत आहे याच्याकडे कुणाचेच लक्ष नाही. जग सपाटीकरणाच्या प्रक्रियेत ज्या काही चांगल्या गोष्टी अस्तंगत होत आहेत, त्यात भाषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. दर चौदा दिवसाला एक भाषा नष्ट होत आहे. हे प्रमाण प्रगतीची प्राथमिक फळे फळे उपभोगणाऱ्या या पिढीच्या अद्याप लक्षात आलेले नसले, तरी भाषिक व्यवहारांची गळपेची होऊ घातलेल्या आगामी पिढीला मात्र खूप जवळच्या, खूप उपलब्ध असलेल्या भाषेच्या मृत्यूचे साक्षीदार व्हावे लागणार आहे. आर्थिक सुबत्ता आणि भाषिक मृत्यूता यांच्याबाबत नवे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्यानिमित्ताने अमरतेचे कुठलेच वरदान न लाभलेल्या आपल्याही भाषेविषयी, भाषाव्यवहाराविषयी चिंता करण्याची वेळ आली आहे म्हणून..
हे करता येऊ शकेल काय?
*आपली उरली सुरली भाषा, पोटभाषा, बोलीभाषा वाचविण्यासाठी शक्य तितक्या परिचितांमध्ये, आप्तांमध्ये त्या त्या भाषा-पोटभाषेमध्ये बोलण्याकडे अधिक कल ठेवावा.
*इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषेविषयी गोडी वाटावी, यासाठी पुस्तके, गाणी, चित्रपट यांचा आधार घेऊन, त्यांना आपल्या भाषिक व्यवहाराची आकलन क्षमता अधिक व्हावी यासाठी पालकांनी पुढे व्हावे.
*आपल्या पोटभाषेतील कालबाह्य होत असलेल्या म्हणी, वाक्प्रचारांना सोशल नेटवर्किंग साइट्सवरून जास्तीत जास्त प्रचारात ठेवावे. फॉरवर्डेड मॅसेज फिरवून चमको होण्यापेक्षा हे भाषिक उत्तरदायित्व प्रत्येकाने पार पाडावे.
*उरल्या सुरल्या प्रादेशिक साहित्यिक नियतकालिकांचे अधिकाधिक वाचन, चर्चा, आदान प्रदान करावे. जर हा साहित्य व्यवहारच सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला, तर कालांतराने तो संपुष्टात यायला वेळ लागणार नाही.
* शक्यतो समभाषिकांशी अधिकाधिक मराठीतूनच बोलण्याचा प्रयत्न करावा.
* मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषय शिकविणाऱ्या शिक्षक-प्राध्यापक मंडळींनी विद्यार्थ्यांची भाषिक भीती काढून टाकून, त्यांना अधिकाधिक भाषाप्रवीण करण्याकडे कल ठेवावा. भाषिक आकलनाचे महत्त्व, साहित्याचे जगण्याशी असलेले नाते उलगडून दाखविल्यास भाषिक अनास्थेच्या रडगाण्याचा वार्षिक सोहळा टाळता येईल.
आपण सगळेच भाषिक मारेकरी
आकडय़ांतून सारे काही
संशोधनाच्या चष्म्यातून..