प्रसिद्ध चॉकलेटिअर आणि शेफ वरुण इनामदार यांनी देश-विदेशातील चॉकलेट्सची चव घेत केलेलं हे चॉकलेटी रसग्रहण! या पाक्षिक सदरातून शेफ वरुण नव्या-जुन्या चॉकलेटी दुनियेची सैर घडवतील. कॅरामल आणि चॉकलेटच्या भन्नाट कॉम्बिनेशनबद्दल आणि कॅरामल चॉकलेटच्या देशी-विदेशी चवींबद्दल आजच्या लेखात..
एक चॉकलेटियर म्हणून मला कुणी चॉकलेटशिवाय दुसरा कुठला तितकाच व्हर्सटाइल चॉकलेटच्याच बरोबरीने येणारा.. चॉकलेटचा जुळा भाऊ शोभेल असा पदार्थ कुठला असं विचारलं तर मी साध्याशा पण तरीही शानदार अशा ‘कॅरामल’चं नाव घेईन. कशातही मिसळून जाणारा, त्या पदार्थाची चव वाढवणारा आणि तरीही आपली चव राखून असलेला एकमेव पदार्थ कॅरामल. दूध, सुकामेवा, आइसक्रीम अशा कोणत्याही पदार्थाशी सहज मैत्री करून चॉकलेटचे नवनवीन रूपात सादरीकरण शक्य करणारा हा पदार्थ.. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. असा हा बहुगुणी पदार्थ अगदी जुजबी सामग्रीसह बनतो. रेसिपीसाठी लागणारं साहित्य एकच- साखर. साखरेचं खमंग, चविष्ट रूप म्हणजे कॅरामल. हे वैशिष्टय़पूर्ण कॅरामल बनवण्यासाठी साखरेला मंद आचेवर १७० अंश सेल्सियसवर तापवून, द्रवरूप साखरेला पुन्हा घनरूपात आणले जाते आणि एक सोनेरी रंगाचा, खरपूस गोड चवीचा, एकाच वेळी कडक पण गुळगुळीत पोताचा, वेगळाच पदार्थ तयार होतो.
खरं तर कॅरामल आणि आपली ओळख खूप जुनीच आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी एकदा तरी चॉकलेट एक्लेअर्स नक्कीच चघळली असणार. त्या मिल्क चॉकलेट आणि कॅरामल टॉफीची चव आजही चांगलीच स्मरणात आहे. मला तर लहानपणचा मी आठवून अजूनही इक्लेअर खाताना तेव्हा सुटायचं तसं तोंडाला पाणी सुटलंय. काळाच्या ओघात, कॅडबरीज एक्लेर्असच्या चॉकलेट्सच्या आकारात बरेच बदल आणि प्रयोग झाले, आणि तेच जुने इक्लेअर, ‘चॉक्लेअर्स’ म्हणून नव्याने ओळखीचे झाले. याच्या बरोबर मध्ये असणारं मिल्क चॉकलेटचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे ती ‘कॅरॅमली’ चव जास्त वेळ जिभेवर रेंगाळू शकते.
अर्थात या सगळ्यात कॅडबरीज फाइव्ह स्टार नावाच्या यम्मी बारला आपण कसे विसरू शकतो? मिल्क चॉकलेट, कॅरामल शिवाय रोस्टेड नट्सच्या चिवट, च्युई फाईव्ह स्टार चॉकोलेटशी आपल्या किती तरी आठवणी निगडित असतील नाही का? याचेच सध्याचे नवीन रूप म्हणजे फाईव्ह स्टार फ्रूट अँड नट, फाईव्ह स्टार (राईस किंवा कॉर्नफ्लेक्स) किंवा क्रंची नटी, फाईव्ह स्टार चॉम्प (ज्यांना चॉकलेटमध्ये कुरकुरीत दाणेदार असं काही हवं असतं- त्यांच्यासाठी शेंगदाण्याची ही नटी चव हा बार देतो). एकूणच या आयकॉनिक चॉकलेट बारनी अनेक दशकं आपल्या जिभेवर कॅरामल चॉकलेट्सची चव घोळवली आहे.
पण तुम्हाला यापेक्षा वेगळं काही तरी ट्राय करायचं असेल तर एक छोटा कॅरामल टॉफी बार नक्की ट्राय करायला हवा -नेस्ले मिल्कीबार च्यू. मध्ये व्हाइट चॉकलेट असलेला हा च्युई बार मुलांमध्ये प्रिय आहे. मोठय़ांपैकी काहींना मिल्क चॉकलेटचा कंटाळा आला की कधी तरी बदल म्हणून खायला हा पर्याय चांगला आहे. पण मला विचाराल तर चॉकलेट म्हणजे मिल्क किंवा डार्क चॉकलेटच असायला हवं. चॉकलेट म्हणून हे पुढे केलं, तर मला आवडणार नाही.
आता परदेशी चॉकलेट्सबद्दल बोलायचं झालं, तर परदेशातल्या आपल्या काका, मामा, आत्या, मावशांनी लहानपणी आणलेली- छोटय़ा वरुणसाठी आणलेली काही चॉकलेट्स माझ्या अजून लक्षात आहेत. या माध्यमातूनच त्या काळात विदेशी चॉकलेट्सची ओळख करून दिली होती. त्यातले एक म्हणजे ‘मार्स चॉकलेट बार’. चॉकलेट, कॅरामल आणि नॉगट (रोस्टेड नट्स असलेली च्युई, चिवट कँडी) यांनी युक्त अशा या अत्यंत चविष्ट बारमध्ये चॉकलेटचे प्रमाण जास्त असे. आता ३० च्या दशकापासून उपलब्ध असणाऱ्या या चॉकलेट बारमध्ये असं काय आहे, जे आपल्या फाइव्ह स्टारमध्ये नाही, तर चॉकलेटचं प्रमाण. ज्यांना चॉकलेट जास्त आणि कॅरामल कमी आवडतं त्यांच्यासाठी हा मार्स चॉकलेट बार एक उत्तम प्रकार आहे. आजकाल तर ही मार्स चॉकलेट्स आपल्याकडील वाण्याच्या दुकानांतून किंवा ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातूनही सहज उपलब्ध झालेली दिसतात.
आता आपण भारतात मिळणाऱ्या परदेशी चॉकलेट्सचा विषय काढलाच आहे, तर ट्विक्स या कुकीबारला विसरून कसं चालेल? चॉकलेट, कॅरामल आणि क्रंची कुकीजपासून हा बार बनवला जातो. किंवा स्नीकर्सही हल्ली आपल्याकडे लोकप्रिय आहे.कॅरामल, पीनट्स, मिल्क चॉकलेट आणि नॉगटचं मिश्रण स्नीकर्समध्ये असतं. ‘हर्शेज’चे ‘किसेस कॅरामलपण चांगलं आहे.
छोटय़ा छोटय़ा चॉकलेट- कॅरामल ‘किसेस’च्या रूपात ते उपलब्ध असतं. सीरिअल्स आणि चॉकलेट फ्लेवर्ड वेफर्सने बनलेले ‘सफारी’चे चॉकलेट बार पण एक वेगळ्या चवीचं चॉकलेट आहे. कॅरामलमध्ये थोडीशी खारट चव आवडत असेल तर मऊसूत लिण्ड्टला पर्याय नाही. कॅरामलमध्ये किंचितसे मीठ आणि मिल्क चॉकलेट असलेले ‘लिण्ड्ट सॉल्टेड कॅरामल’ नक्की ट्राय करा. ही सगळी चॉकलेट्स म्हणजे टेस्टी स्नॅक आयटमच म्हणायला हवेत.
आनंदाची गोष्ट म्हणजे या सगळ्या विदेशी चॉकलेट्सच्या दर्जाशी स्पर्धा करताना आपल्या परिचित ‘कॅडबरीज’नेही स्वत:च्या उत्पादनांतून बरेच फेरबदल केलेत आणि नवनवीन प्रकारची चॉकलेट्सची निर्मिती केली आहे. त्यांच्या डेअरी मिल्क सिल्क कॅरमेलो या मऊसूत चॉकलेटचा इथे आवर्जून उल्लेख करायला हवा.
चॉकलेटच्या थरात योग्य प्रमाणात लपलेले कॅरामल आणि तोंडात तुकडा पडताक्षणी शब्दश: विरघळणारं स्वरूप.. डिव्हाइन! हा शब्द तिथे वापरायलाच लागतो. कॅरामल आणि चॉकलेटच्या युतीबद्दल आता एवढं सगळं लिहिताना तोंडाला पाणी सुटलंय आणि तूर्तास लेख थांबवून तोच स्वर्गीय आस्वाद घ्यायला मी जातोय.
(अनुवाद – गीता सोनी )