‘हम ने देखी हैं इन आँखों की महकती खुशबू, हाथ से छू के इसे रिश्ते का इल्जाम न दो, प्यार को प्यारही रहने दो कोई नाम न दो’ वर समाधान मानण्यात आपल्याला रस नाही. त्यात बेक्कार गुळमुळीतपणा आहे हे आपल्याला मान्यच. असं कसं ‘नाम न दो?’

नसेल आपण प्रपोज मारलेलं कधीच एकमेकांना. राखी तर नाहीच बांधणार बावळटासारखी; पण बोलता-बोलता कानातल्याशी अजाणता चाळा करणारी माझी बोटं बघून तुझी नजर जातेच खेचली माझ्या बोटांकडे- तुझ्याही नकळत. मी मोठय़ा प्रयत्नानं खांद्यावरून मागे वळून पाहायचं टाळते. किंवा तुझा तो गेल्या शतकातला, धुऊन-धुऊन शेप हरवून बसलेला, विटका नि मऊसूत झालेला राखाडी कुर्ता घालून त्याच्या बाह्य पार कोपरापर्यंत दुमडून घेतोस, तेव्हा मी मवालीपणा करून शिट्टी मारत नाही इतकंच.

Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Squids Have Hearts in Their Heads
Animal Has Heart in Head : छातीत नव्हे तर चक्क डोक्यामध्ये आहे ‘या’ प्राण्याचे हृदय, तुम्हाला माहितीये का?
young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
Toxic semen kill female mosquitoes australia
डासांच्या निर्मूलनासाठी विषारी वीर्याचा वापर; त्यामुळे जीवघेण्या आजारांचा प्रसार कमी कसा होणार?

पण एका कटाक्षात टिपलेले असतात मी तुझ्या हातावरचे कुरळे केस, आतल्या बाजूचं तुलनेनं कोवळं, रेखीव मनगट आणि कोपरावरची खळी आणि त्यापलीकडचा तुझ्यातला निवांत, सैलसर, गुणगुणता मूडही. बाप्यांना बायांचे फक्त आकार-उकारच पाहायचे असतात असं नाही आणि बायांना बाप्यांचे चीकबोन्स नि रुंद खांदे सोडून इतरही अनेक गोष्टी पाहण्यात कमालीचा रस असतो, हे एकमेकांचं शिक्षण आपणच नाही का केलेलं? बाई असल्यामुळे मला पुन:पुन्हा नजर टाकावी लागत नाही इतकंच. तरी कसं बुवा

‘नाम न दो?’

पण शरीर असल्याचं अमान्य न करणाऱ्या माणसांना एकमेकांशी करार-मदार न करता घट्ट बांधणाऱ्या नात्याला तूर्तास तरी मैत्री हेच एक नाव आपल्या भाषेत आहे, म्हणून आपण त्याबद्दल तह केलेला. आपल्याला एकमेकांबद्दल आकर्षण वाटून गेलं आहे, पुढेही अधूनमधून वाटेल आणि तरीही आपापल्या कारणांमुळे आपण त्या वाटांवर पाय टाकत नाही आहोत हे आपल्याला दोघांनाही स्वच्छ माहीत आहे, कबूल आहे, त्यात कोणतेही त्याग-अन्याय-एकतर्फी प्रेम इत्यादी मध्ययुगीन प्रकार नाहीत. या नात्याचं नाव ‘मैत्री’ असं सबगोलंकारी असलं, तरी त्यातले स-ग-ळे कंगोरे आपल्याला नीट ठाऊक आहेत. ही सऽगळी समजूत प्रस्थापित करण्यात आपण काही गंभीर भांडणं, काही जीवघेणे अबोले आणि काही सहनशील चर्चा खर्ची घातलेल्या नाहीत का?

इतक्या साऱ्या वर्षांच्या गाढ परिचयानंतरही अजूनही माझ्याबद्दलचा पालकभाव तुझ्यात कधी-कधी जागा होतोच. एखाद्या मोठय़ा मीटिंगपूर्वी ‘अमुक अमुक आगाऊपणा करू नकोस..’ असा पोक्त सल्ला देऊन किंवा ‘इतक्या रात्री जागी का आहेस? झोप बघू मुकाट’ असा दम भरून मग तू कसनुसा होतोस. आपण तद्दन पुरुषीपणा करून या बाईला पंखाखाली घेतलं की काय, आता ही कशी रिअ‍ॅक्ट होईल, त्यावरून भांडण होईल का, झालं तर कसं निस्तरायचं, चुकलं तर आपलं आहेच, पण काय चुकीचं सांगतोय का.. असे डझनभर प्रश्न तुला एकसमयावच्छेदेकरून पडून जातात. मग सारवासारव. अशा वेळी तू जनरल पुरुषपणा करत नसून मैत्रीतून येणाऱ्या काळजीमुळे असं सांगतो आहेस, त्यात थोडा पुरुष डोकावला तरी तो सहन केला पाहिजे नि अखेर तू आहेस तर पुरुषच, ते थोडंच नाकारायचंय.. हे माझं सहनशील स्वगत. मीही स्त्रीवादी व्यक्ती नंतर आणि माणूस आधी आहे, हे हजार वेळा बजावावं नाही का लागत माझं मलाच? कधी-कधी मलाही हवेसे होतातच आयते सल्ले, आधारबिधार आणि असल्या छत्रछायाही. पण तेव्हा नेमका तू  ‘बघ बुवा. मला हे असं-असं वाटतंय. तुझं तू ठरव.’ असा सुटवंग पवित्रा घेतोस तेव्हा कांगावखोर चिडचिड होते माझी! आपल्या वागण्यातले असे अनेक लहानसहान कंगोरे आपापल्या बाई-बुवापणामुळे आल्यासारखे भासत असले, तरी त्यात काही अन्यायकारक नाही, शरमण्यासारखं तर नाहीच नाही हे स्वत:ला सांगण्यात नि स्वीकारण्यात आपली दोघांचीही बरीच ताकद खर्ची पडली आहे, अजूनही पडते, हे आपल्या माणुसपणाचं लक्षण की सोईस्करपणाचं? कुणास ठाऊक.

आपल्याला एकमेकांचं कौतुक वाटतं. कधी अगदी रास्त आणि कधी अगदी अवाजवी कारणांनी. ‘बावळट आहेस. माझ्यासमोर करतोस ते ठीके. जगात इतका बावळटपणा करून कसं चालेल? विकून खातील तुला.’ हा माझा कायमचा त्रागा. तर ‘प्लीजच! इतके मूर्ख न्यूनगंड कोण बाळगतं? No. Don`t even try fishing for compliments. मुद्दय़ाचं बोल.’ हा तुझा सडेतोडपणा. एकमेकांचं कौतुक तरी थेट निरोगीपणे करावं? ते करायची पद्धत नाही आपल्यात. त्याऐवजी खवचटपणानं ओढलेले धारदार ताशेरे. जिभेची धार परजून घेण्यासाठी एकमेकांना दगडासारखं वापरणं. सतत छिद्रान्वेषीपणे दोष तेवढे दाखवणं. असे दोष दाखवणं हेच जणू जबाबदार कौतुकाचं अखेरचं लक्षण मानणं.  कौतुक करताना मात्र हात राखून आडवळणानं बोललं.. न बोललं! कधी घडलंच कौतुक न राहवून चुकूनमाकून एखाद्या निसटत्या क्षणी, तर आधी आश्चर्य आणि मग संकोचून विषय बदलणं. कशातून येतं हे? निव्वळ अतिसज्जनपणाचे गंड, की आपण आपल्या बाई-बाप्येपणाचे संकोच पुरते ओलांडलेलेच नाहीत अजून? तसं म्हणावं, तर ‘माझी पाळी येणार आहे. मी जरा रडारड करीन. गप ऐकून घे’ असं सांगायला मी अनमान करत नाही. वर ‘ हे बरंय तुझं. कपाळावर पाटी लावून फिरत जा आठवडाभर. सुरुंग टाळत फिरल्यासारखं दबकत-दबकत वावरायला तरी नको मला. फक्त चॉकलेटं नि मोरपिसं नि रेशमी शाली नि अत्तरदाण्या घेऊन फिरत जाईन तेवढे दिवस.’ अशी तुझी आदळआपट. काय की..

पण न बोलता थोडे जास्त सहिष्णूपणे लाडही केले जातात. मला दिवसभरात इतक्यांदा कुणी कंटाळा-कंटाळा म्हणून कुरकुरून दाखवलं, तर मी ‘ए बाबा! घरी जाऊन पाट मांडून रड. माझा वेळ खाऊ  नकोस’ असं म्हणून बिनदिक्कत फटकारून टाकीन; पण तुला मात्र ‘बाबा रे, पुता रे..’ असं गोंजारत, चुटके नि किस्से ऐकवत, गाणी नि कविता देत, टोकत आणि फटकारत तुझा मूड सुधारायला पाहणं. मलाही रडायला खांदा लागणारच असतो पुढेमागे आणि तेव्हा काही प्रियकर नि प्रेयस्या नि सहकारी नि भावंडं येत नाहीत कामी, ही व्यावहारिक खात्री असते की काय त्याच्या मुळाशी?  पण असले विनिमयाचे व्यवहार वाजवून घ्यायला आपण काय लग्नाचे नवरा-बायको आहोत थोडेच?

आपण असलोच काही, तर एकदा नाकातोंडात पाणी जाऊन जीव खाऊन धडपडत वर आलेले, बुडतानाच्या भीषण तडफडीचं ज्ञान जागं राखलेले आणि इथे पोटाशी धरणारा कुणी एक असेलच असं नाही हे कडवट सत्य गिळावं लागलेले शहाणेसुरते जीव आहोत, बस.

अर्थात, इतके सोवळेही नव्हेच आपण! एकमेकांच्या तत्कालीन प्रेमपात्रांबद्दल आपले खास पवित्रे असतात. एक विशिष्ट संशयीपणा. आपल्या मित्राच्या वा मैत्रिणीच्या योग्यतेची आहे का ही व्यक्ती, असा संशय सतत पाश्र्वभूमीवर जागा असलेला. पण तो दिसू द्यायचा नाही, हा बाणाही. आपल्या मित्रा-मैत्रिणीबद्दलचा दिसे-न-दिसेसा मालकी हक्क आणि त्या व्यक्तीबद्दल थोडा मत्सरही अर्थात. तो दिसू द्यायला मात्र आपली हरकत नसते! ‘हेच मी म्हटलं की फिस्कारून दाखवतोस. ती बोलते ते बरं चालतंय, अं?’ असे खवचट प्रश्नही. पण आपल्या वर्षांनुवर्षांच्या मैत्रीपोटी त्या बिचाऱ्या तिसऱ्या (!) व्यक्तीवर अन्याय होऊ नये, म्हणून जागेही असतो आपण कायम. त्यापायी एकमेकांना जाब विचारणं, पुन्हा-पुन्हा विचार करायला प्रवृत्त करणारे प्रश्न विचारणं, त्या-त्या माणसासोबत पुरेसा वेळ दवडायला ढकलणं आणि अखेरीस अती झालं तर मग ‘काय त्याची इंटेग्रिटी? कमॉन. वेळेवर माती खाल्लीनं नि गेला टिनपाटात!’ अशी आडून समजावणी. अशा वेळी थोऽडा का होईना, जीव भांडय़ात पडतो आपला? मी अनेकवार उकरून उकरून पाहिलंय. पण मला नाही वाटत..

आपलं हे असं, शक्य तितक्या तटस्थपणे विचार करणं तितकंसं पणाला लागलेलंच नसावं अजूनपर्यंत कधी, असा माझा सावध अंदाज. ते लागेलच आज ना उद्या. तेव्हा आपण एकमेकांना उरू का, उरू ना.. असा प्रश्न पडतो. मग घाईघाईनं ‘आपण असूच’ असे साळसूद दिलासे दिले जातात एकमेकांना, स्वत:ला. त्यातला फोलपणा आणि त्यांची गरज दोन्ही कळतं आपल्याला, म्हणून बरंय..

आपल्या लिंगांचं भान म्यान न करता, एकमेकांना रक्तबंबाळ न करता, लयबद्ध खणखणाट करत पदन्यास करण्याचं किती जणांच्या नशिबात असतं खरोखर?

आपण बाई असलो, बुवा असलो, बाईच्या शरीरातला बुवा असलो, बुवाच्या शरीरातली बाई असलो, किंवा अजूनही अधलंमधलं काही असलो असतो; तरीही असेच असलो असतो आपण थोडय़ाफार तपशिलांच्या फरकासकट. तोवर तुझ्याकडे पाहणारी माझी नजर कुठल्या लिंगाची आहे, यानं खरंच काय फरक पडतो?

– मेघना भुस्कुटे

meghana.bhuskute@gmail.com

Story img Loader