विदुला साठे

मारीपोसा ग्रोव्ह म्हणजे प्राचीन वृक्षांचा समूह. अर्थात योजेमिटी नॅशनल पार्कमध्ये हे एवढं एकच आकर्षण नाही. प्रचंड धबधबे, उंच देखणे डोंगर, आखीवरेखीव रस्ते तिथे आपली वाट पहात असतात.

black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
mla kshitij thakur
“वसईच्या सनसिटी येथे धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न”, आमदार क्षितीज ठाकूर यांचा आरोप
Important research Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University shows that mosquitoes are repelled by yellow light of LED
डासांपासून त्रस्त झाले का? हे करून बघा, काय सांगते पिवळ्या दिव्याचे नवे संशोधन
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
The decision regarding the permission of the meeting at Shivaji Park Maidan is now with the Urban Development Department mumbai news
शिवाजी पार्क मैदानवरील सभेच्या परवानगीचा निर्णय आता नगरविकास विभागाकडे
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : हीच ‘सप्रेम इच्छा’अनेकांची!

महिन्याभरातल्या कॅलिफोर्निया मुक्कामातली आमची शेवटची ट्रीप होती, ‘योजेमिटी नॅशनल पार्क’ (Yosemite). सनीवेलहून दुपारी चार वाजता निघालो. आधी दोन, तीन ट्रिप्स् झाल्यामुळे इथले सुंदर रस्ते, त्यावर भरधाव धावणाऱ्या एकसे एक गाडय़ा, वेगामध्येही लेनची शिस्त, ट्रॅफिक नियम पाळणारे चालक हे सर्व आता सवयीचे झाले होते. तरीही मला गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहताना उगाचच वाटे की मैलोन् मैल नुसते डोंगर, पठार कुठे जास्त वस्ती नाही. आपल्यासारखे छोटी गावे, शेती वगैरे इकडे काही दिसत नाही. प्रवास सुरू झाला आणि ही आजवर इथे न पाहिलेली गोष्टही पहायला मिळाली. रस्त्याच्या दुतर्फा शेती. अधे-मध्ये कुठे कुठे फळांचे स्टॉल्स् लावलेले. स्ट्रॉबेरी, अ‍ॅवाकॅडो वगैरे. ‘एक डॉलर – सहा अ‍ॅवाकॅडो’ वगैरे बोर्ड लावले होते. पुढे सहाचे दहासुद्धा झाले. मला फार गंमत वाटली. लोक तिकडे गाडय़ा थांबवून खरेदी करत होते. पण आम्हाला थांबायला वेळ नव्हता. पुढे जात राहिलो. दोन्हीकडे शेतांच्या हिरव्यागार रांगा पाहून मन प्रसन्न झाले. कशाची शेती आहे ते नीटसे लक्षात येत नव्हते. ऑलिव्हच्या बागा तेवढय़ा कळल्या. इथली शेतीही आखीवरेखीव, स्वच्छ, सुंदर. स्प्रींकलर्सने पाणी देण्याचे काम सुरू होते. कुठे कुठे मोठी फार्म हाऊस आणि त्यासमोर गाडय़ा, घोडे, गायी असेही दृश्य पहायला मिळाले. खरे तर हा मेन हायवे नव्हता. मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक असल्याने गुगलबाईने हा आतला रस्ता सांगितला होता. रात्री आठ वाजेपर्यंत उजेडच असल्याने हे सारे पाहता आले आणि रात्री उशिरा योजेमिटी व्ह्यू लॉजवर पोहोचलो.

सकाळी लक्षात आले की नावाप्रमाणे हॉटेलच्या खिडकीतून योजेमिटीला जाणाऱ्या रस्त्याच्या मागच्या डोंगरांचा सुंदर व्ह्य़ू दिसतोय. आणि जोडीला खळखळणाऱ्या पाण्याचे पाश्र्वसंगीत. योजेमिटी नॅशनल पार्कला जाण्यापूर्वी तिथे कुठले पॉइंटस् बघायचे ते ठरवून टाकले. इथले नॅशनल पार्क इतके मोठे असतात की प्रवेशिकाही आठवडय़ाची मिळते. हौशी पर्यटक तेवढा मुक्काम करून सर्व बघतात. आपल्याला वेळेअभावी ते शक्य होत नाही.

सर्वात आधी पाहोचलो ते योजेमिटी वॉटर फॉल्स पाहायला. आल्हाददायी म्हणतात तशी हवा, कोवळे ऊन आणि डोंगरातून जाणारा वळणावळणाचा रस्ता. अधूनमधून दिसणारे, रस्त्याबरोबरीने सोबत करणारे पाण्याचे प्रवाह. (इथे मला कुलु-मनालीची व्यास नदी आठवली) डोंगर म्हणजे सगळे खडकच. ओबडधोबड तरी देखणे. ग्रॅनाइट क्लीफ. उंच सुळके. प्रत्येक वळणावर वेगवेगळे. व्हिजीटर्स सेंटरला कधी पोहोचलो कळले नाही. तिथे शोधाशोध करून गाडी पार्क केली. आणि थोडे चालत निघालो धबधबा पाहायला. पर्यटकांच्या गर्दीपाठोपाठ जात राहिले की वेगळा गाइड लागत नाही. पाण्याचा आवाज, झाडांची दाटी, त्यामुळे सावली आणि समोर हे उंचच उंच पर्वत. आता दिसू लागला तो २४०० फूट इतक्या उंचीवरून  कोसळणारा धबधबा. ‘धबाबा लोटती धारा.. धबाबा तोय आदळे..!’ या समर्थाच्या काव्याची आठवण करून देणारा. या धबधब्याची खासियत ही की हा तीन टप्प्यांमध्ये पडतो. आणि ते सलग असं दिसत नाही.  त्याचा सगळ्यात मोठा टप्पा १४३० (४३६ मीटर) फुटांवर पडतो. त्याचे अप्पर, मिडल आणि लोअर असे तीन टप्पे आहेत. हायकिंग करून अगदी वरच्या टप्प्यापर्यंत जाता येते. त्यासाठी वेगवेगळे ट्रेल आहेत. आम्ही लोअर फॉलच्या ठिकाणी होतो. तिथे बहुतेक कुटुंबे छोटी मुले घेऊन आलेली होती. एका खडकावर उभे राहून, मागे धबधबा असे फोटो सेशन सुरू होते. सर्वात खाली पाणी पडते तिथे जाऊन भिजायची मजा हौशी मंडळी घेत होती. परंतु तिथेपर्यंत जाणारा मार्ग हा फार दगड गोटय़ांचा आणि उंचावरही होता. अलीकडे एक रेलिंग होते. आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनी तिथूनच पाहणे पसंत केले.

प्रवेश परवान्याबरोबर मिळालेला नकाशा काढून अजून काय काय बघायचं जवळपास असा विचार करत होतो. एखादा ट्रेल किंवा हाइक करायची इच्छा होती. अप्पर योजेमिटीसाठी फारच उंचावर जायला लागले असते. चढाई तर करायची होतीच. मग कोलंबिया रॉक हा पर्याय निवडला. डोंगर चढायचा म्हटले की मला तरी अगदी उत्साह येतो. धबधब्याच्या बाजूनेच रस्ता होता. दगड, पायवाट अशा ट्रेकला मजा येते. रस्ता असा झिग झ्ॉग चढत बरेच वपर्यंत आलो. इथे हवेत एकदम गारवा जाणवला. बरोबर आणलेले प्रोटीनबार खाल्ल्यावर जरा हायसं वाटलं. पाणी पुरवूनच प्यावं लागलं. कोलंबिया रॉक हे या व्ह्य़ू पॉइंटचे नाव. इथून संपूर्ण योजेमिटी व्हॅली दिसते. म्हणजे अगदी ज्याला १८० डिग्री व्ह्य़ू म्हणतात ते दृश्य. इथला फेमस हाफ डोम समोरच दिसतो. सर्वदूर ग्रॅनिटिक रॉक्स. खाली खोल दरी. नकाशात काढावेत तसे जमिनीचे तुकडे, वळणदार रस्त्यांच्या रेषा. आपण एवढय़ावर आलोय, खूप दमलोय, आपल्याला तहान, भूक लागलीय हे सगळे विसरायला लावणारे दृश्य होते. पकडून ठेवावासे वाटावे असा क्षण होता तो. आणि तो मोबाइल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू होती. हे दृश्य जिथून दिसते तिथे रेलिंग उभारले आहे. त्या कठडय़ाला धरूनच आपण उभे राहातो. तरी इतका प्रचंड वारा होता की घाबरून आपली रेलिंगवरची पकड नकळत घट्ट होते. वाऱ्यामुळे केस उडून चेहऱ्यावर उलटे येत होते. ते सावरून फोटो काढायचा तर हात सोडावा लागणार- सगळीच कसरत. कोलंबिया रॉकमुळे एक झालं. सगळीकडे जाता येणार नव्हतं तरी योजेमिटी व्हॅलीचा संपूर्ण नजारा देख लिया.

‘ग्लॅशियर पॉइंट तुम्हाला खूप आवडेल’ असे सून म्हणाली तेव्हा मला नीट अर्थबोध झाला नव्हता. सकाळपासून हे भले मोठे खडक, गॅ्रनिटिक रॉक्स सोबत करत होते. नागमोडी वळणांवरून एकापाठोपाठ जाणाऱ्या गाडय़ा. मध्येच कुठे व्हिस्टा पॉइंट, मग तिथे थांबून ते पाहणे असे करत करत अजून बऱ्याच उंचीवर पोहोचलोय हे आता लक्षात आलं. म्हणजे सकाळी होतो तिथून तीन हजार २१४  फुटांवर. आणि एकूण (समुद्रसपाटीपासून) सात हजार २०० फूट उंचीवर. इतक्या उंचीवरही सुरक्षित रस्ते आणि पार्किंगची सोय लक्षात येण्यासारखी. पार्किंगही दोन टप्प्यामध्ये होते. प्रत्येक ठिकाणी दिव्यांगांसाठी राखीव पार्किंग होतेच. याशिवाय हा पॉइंट पाहण्यासाठी खास पायऱ्या पायऱ्यांची स्टेडियम टाइप व्यवस्था. गाडी पार्क करून ग्लॅशियर पॉइंटला पोहोचलो. हा पॉइंट उजेडात आणि अंधारातही दाखवायची मुलाची इच्छा होती. तो योग जुळून आला. अजून सूर्यास्त व्हायला बराच वेळ होता. या पॉइंटवरूनही समोर दिसतो तो हाफ डोम. अगदी नावाप्रमाणे एका बाजूने पूर्ण गोलाकार आणि दुसरी बाजू स्ट्रेट कट घेतलेली. त्याच्या या विशिष्ट आकारामुळे आणि उंचीमुळे तो कायमच मनात ठसतो. त्याच्या आजूबाजूला असेच सारे लहान-मोठे उंचवटे. दूरवर एक धबधबाही दिसतो. हाफ डोमच्या मागेही बरेच डोंगर दिसतात. आणि खाली योजेमिटी व्हॅली. ग्लॅशियर- हिमनदी.. नदी कसली, ती तर लहान असते ना! हिमनद म्हणूया. खूप उंचावरून वितळलेला बर्फ खाली नेत हे कसे तयार झाले असेल या कल्पनेने आणि त्या भव्यतेने आपण अचंबित होतो. मला आपल्या पौराणिक मालिकेत दाखवलेले स्वर्गीय वातावरण आठवले. पडद्यावरचा तो डिजिटल इफेक्ट असेल, पण मी जे पाहत होते ते सत्य होते. इथेही शिवाचे अस्तित्व असावे असा मला भास झाला. काही म्हणा आपण जरा अशा गोष्टीत रमतो. पण आजूबाजूला पाहिल्यावर लक्षात आले की इकडे मंडळी मोठमोठय़ा दुर्बिणी लावून बसली आहेत. आता सगळे वाट पाहत होते रात्र होण्याची. हळूहळू कुडकुडायला लागले. इथे एवढय़ा उंचावर इतक्या सोयी आहेत, तर एक गरमागरम चहा देणारी टपरी असती तर काय मजा आली असती असा विचार माझ्या भारतीय मनात येऊन गेलाच. पण आता समोरचे दृश्य इतके सुंदर होते की मी मनातला चहाचा कप बाजूला ठेवला.

एवढय़ा थंडीतही अगदी ब्लँकेट ओढून, जागा पकडून सगळे बसले होते. आम्ही पण अगदी एकत्र बसलो. सूर्य अस्ताला जाऊ लागला तशी पर्यटकांची गर्दी वाढली. दुर्बीणवाले अ‍ॅडजेस्टमेंटमध्ये गुंतले. आकाशाचे रंग फिके फिके होऊ लागले. एरवी अंधाराची भीती वाटते, पण आता सर्वाना वाटत होते. अंधार लवकर व्हावा.. अजून अंधार काळा मिट्ट. आता अवतीभवती दिसणारी झाडं दिसेनाशी झाली. माणसांच्या आकृत्या नाहीशा झाल्या. जवळ बसलेल्यांचे चेहरेसुद्धा दिसेनासे झाले. शब्दश: अंधार गुडुप. आणि सर्वाचे डोळे आकाशाकडेच. आता कानावर वेगवेगळ्या भाषेतले आनंदी स्वर.. काय सांगताहेत सगळे? भाषा कळली नाही तरी भाव कळत होता. ते सगळेच म्हणत असावेत, ‘केवळ अप्रतिम!’ ‘हे बघ इकडे किती चांदण्या आल्यात!’ ‘सो मेनी स्टार्स’ सगळ्यांचे आनंदाचे चित्कार! आम्ही पण, ‘अरे, इकडे बघ अजून दिसताहेत. या बघ वाढतच चालल्या’ असे म्हणत त्या आकाशात अवतरलेल्या असंख्य चांदण्यांचे स्वागत करत होतो. मध्ये मध्ये असे फिस्कटलेले पांढरे पट्टे दिसू लागले आणि काय आश्चर्य थोडय़ा वेळाने तो पूर्ण पट्टाच चांदण्यांचा झाला. लखलख चंदेरी.. मागे अजून लुकलुकणाऱ्या चांदण्या जणू सांगत होत्या, थांबा अजून थोडा वेळ, आम्हीही आलोच. आणि आमची नजर काही हटेना त्यांच्यावरून. पाहता पाहता मोठा पट्टाच तयार झाला. त्या चांदण्यांचा.. वॉवऽऽ..  याच क्षणाची तर वाट पाहत होते सगळे. कुठे गेला तो अंधार? भीती? ही अवतरली ना आकाशगंगा – मिल्की वे. तिथे असलेल्या वेगवेगळ्या देशांमधल्या, वेगवेगळी भाषा बोलणाऱ्या सर्व लहानथोरांची तेव्हा एक आणि एकच भावना होती, ‘हरखून जाणे’ आणि एकाच वेळी ही गोष्ट सगळ्यांना मिळाली तर सगळ्यांना तेवढाच आनंद झाला होता. इतक्या चांदण्यांनी भरलेले आकाश मी प्रथमच पाहिले होते. थंडी खूप होती म्हणून नाहीतर त्या चांदण्यांच्या सोबतीने त्यांनाच त्यांची गाणी ऐकवत एक रात्र तिथे राहायला मला नक्कीच आवडले असते. ‘चांदण्या रात्रीचे ते स्वप्न’ विसरण्यासाठी नव्हतेच. ते मनात साठवून परत निघालो. रात्री घाट रस्ता उतरताना थोडी काळजी वाटत होती, पण उतरणाऱ्या बऱ्याच गाडय़ांची सोबत झाली.

योजेमिटीमधला ‘मारीपोसा ग्रोव्ह’ (Mariposa grove) हा व्हिस्टाप्रिंट पाहण्याबाबत आम्ही लकी ठरलो. कारण जुलै २०१५ पासून ते बंद होते- रीस्टोरेशनसाठी. आणि आता तीन वर्षांनी जूनमध्येच पर्यटकांसाठी खुले केले होते. सकाळी लवकरच तिथे पोहोचलो. आपल्या इथल्या थंडीतल्यासारखे हवामान. उबदार कोवळे ऊन. नवीन तयार केलेला रस्ता. व्हिजिटर सेंटरसुद्धा एकदम चकाचक होते. इथे तसे सगळेच स्वच्छ टापटीप असते, तरीही या ठिकाणच्या नवेपणामुळे पर्यटकांचा उत्साहही नवा वाटत होता. गाडी पार्क करून या नवलाईत सामील झालो. ठरावीक अंतरानंतर आत फिरण्यासाठी मातीचाच रस्ता होता. काय आहे हे मारीपोसा ग्रोव्ह? ग्रोव्हचा अर्थच झाडांचा समूह (group of trees). मारीपोसा हे नाव मारीपोसा कंट्री (Mariposa Country) वरून दिले आहे. गॅलन क्लर्क आणि मिल्टन मान यांनी प्रथम १८५७ मध्ये या ठिकाणाला भेट दिली. त्यांनीच हे नाव दिले आहे अशी माहिती मिळाली. अर्थात ते काही मूळचे रहिवासी नव्हेत. मारीपोसा ग्रोव्ह म्हणजे प्राचीन वृक्षांचा समूह. सिक्विया (Seaquoia) ट्री या उंचच उंच अशा ५०० वृक्षांच्या समूहाची व्हिजिटर सेंटरला सुरुवातीलाच माहिती मिळाल्यावर त्यांना पाहायची उत्सुकता वाढते. खरेतर या पॉइंटला पोहोचल्यावर समोरच इतकी झाडे पाहून आपल्याला कल्पना येते. त्या झाडांमधून आत फिरण्यासाठी मार्ग केला आहे आणि तिथे अजिबात सिमेंटचा वगैरे वापर नाही. मातीचाच रस्ता आहे. आपण या सिक्विया कुटुंबात प्रवेश करतो तेव्हा छोटी छोटी रोपे, जरा मोठी झाडे आपले स्वागत करतात. आणि मोठेमोठे वृक्ष जणू आशीर्वाद द्यायला उभे असतात. आजवर आपण अनेक मोठय़ा राजांचे राजवाडे, त्यांच्या वापरलेल्या वस्तू त्यांची मोठय़ा चित्रकारांनी काढलेली चित्रे असे कधी ना कधी पाहिलेले असते. इथे या प्राचीन वृक्षांचे साम्राज्य आहे. त्यांचा इतिहास, त्यांचे पूर्वजांचे अवशेष जतन केलेले. त्यांची माहिती, त्यांची चित्र. संपूर्ण परिसरात ते उंचच उंच वृक्ष पाहताना उत्सुकता वाढली. आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे सांगणारे माहितीपर बोर्ड जागोजागी आहेतच. एका झाडाची मोठी चकती (Slice) उभी करून ठेवली होती. ते झाड ८०५ वर्षांचे होते म्हणे. त्यावरच्या िरगज् वरून त्या झाडाचे वय समजते. एक उन्मळून पडलेला भला मोठा वृक्षही होता. गंमत म्हणजे त्याची मुळे जणू एका म्युरलसारखी दिसत होती. बऱ्याच ठिकाणी वीज पडून किंवा जंगलातल्या वणव्यांमुळे जळालेली झाडेही होती. आणि एकीकडे छोटी छोटी उगवलेली रोपटी. ऱ्हास आणि उत्पत्ती दोन्हीचे दर्शन झाले. या आणि अशाच उलथापालथीमधून वाचलेले, आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावणारे, आणि सर्व घडामोडींचे साक्षीदार आहेत या समूहातले सर्वात मोठे वृक्ष. ग्रिझली जायंट (Grizzly Giant) आणि दुसरा वावोना ट्री (Wawona tree).

ग्रिझली जायंट १९०० ते २४०० वर्षे जुना आहे. २१० फूट (६४ मीटर) उंच व ३० फूट परिघाचा खोड आणि बुंध्याचा विस्तार ९२ फूट. वावोना ट्रीसुद्धा साधारण एवढाच, पण त्याच्या बुंध्यातून बोगदा तयार केलाय आणि आपण त्यामधून जाऊ शकतो. इतके मोठे असूनही जगातल्या मोठय़ा वृक्षांमध्ये ग्रिझली जायंटचा पाचवा नंबर लागतो. त्या महाकाय वृक्षाजवळ पोहोचलो तेव्हा पर्यटकांची खूप गर्दी होती. फोटोसाठी थांबावे लागले. एकीकडून पाहून मन भरत नव्हते. मग देवळाला घालतात तशी प्रदक्षिणा घातली. खालून वर पाहताना त्याचे वरचे टोक (शेंडा) दिसत नव्हते. आणि त्याच्या फांद्या म्हणजे पुन्हा एकेक झाडच होते. या झाडांची मुळे खूप खोलवर न जाता जमिनीच्या वरच्या थरातच खूप दूरवर पसरतात, पोसली जातात हे पण विशेष. जायंट स्विक्वियांबरोबर खूप फोटो काढले. खरच किती वर्षे- वर्षांनुवर्षे इथे उभी आहेत ही झाडं. स्वत:चे, इथल्या पशुपक्ष्यांचे पर्यावरणाचे रक्षण करत. तेसुद्धा निरपेक्ष राहून. थोडे पुढे जाऊन वावोना ट्रीच्या बोगद्यातून बाहेर पडून मोरीपोसा ट्रेल पूर्ण केला. अधूनमधून खारूताई डोकावून जात होती. मला गाता येत नाही नाहीतर तुकोबांचा अभंग तिथल्या सर्वाना गाऊन दाखवला असता – ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’..

योजेमिटी पार्कच्या नकाशामध्ये खूप व्हिस्टा पॉइंट आहेत, ते सगळे पाहणे शक्य नव्हते. पण जे पाहिले ते नक्कीच अप्रतिम, अविस्मरणीय होते. उरलेल्या पॉइंटसाठी पुढच्या वर्षी परत जायचे असे ठरवून आलेय.

response.lokprabha@expressindia.com