गेली काही वर्षे उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतातील प्रमुख हिल स्टेशनना भेटी देताना तेथील वाढती गर्दी व गडबड गोंधळाने हैराण व्हायला झालं होतं. भारतात तशी मोजकीच प्रसिद्ध हिल स्टेशन्स आहेत त्यामुळे उन्हाळ्यात तेथे प्रचंड गर्दी होणं साहजिकच आहे. मग गर्दी टाळण्याचा उपाय सुचला तो म्हणजे हिमालयात पदभ्रमणाला (ट्रेकिंग) जाऊ या.
उत्तराखंड राज्यातील गढवाल विभागात असलेल्या केदारकंठ शिखरावर पदभ्रमण मोहिमेत भाग घेण्यासाठी रेल्वेने डेहराडून स्टेशनवर पोहचलो व तेथून बसने सात तासांच्या प्रवासानंतर उतर काशी जिल्ह्य़ातील सांकरी या छोटय़ा गावी पोहचलो. हे गाव सगळ्या बाजूंनी डोंगर दऱ्यांनी वेढलेलं आहे. या गावापर्यंत पोहचण्याचा प्रवाससुद्धा सोपा नव्हताच. कारण वळणावळणाच्या, चिंचोळ्या व बऱ्याच ठिकाणी कच्च्या रस्त्यावरून प्रवास करताना सगळ्याच प्रवाशांना त्रास झाला. रस्त्याशेजारून खळाळून वाहणाऱ्या यमुना नदीची साथ हाच काय तो बस प्रवासातील एकमेव विरंगुळा!
हिमालय पदभ्रमणात सांकरी हा महत्त्वाचा बेस कँप मानण्यात येतो. कारण याच गावातून केदारकंठ मोहिमबरोबरच हर की दून व रुपीन पास पदभ्रमण मोहिमेची सुरुवात होत असते.
सांकरी हे गाव समुद्रसपाटीपासून ६,४०० फूट उंचीवर आहे. या उंचीची शरीराला सवय व्हावी म्हणून एक दिवस येथे सरावासाठी (अॅक्लमटायझेशन) दिला गेला. दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष पदभ्रमणाला सुरुवात झाली. बहुतेक वाट ही चढणीचीच होती. त्यामुळे प्रत्येकाला दम लागत होता. दर अध्र्या तासाने पंधरा-पंधरा मिनिटांची विश्रांती घेत, साधारण चार तासांच्या पायपिटीनंतर पहिल्या मुक्कामाला पोहोचलो. तो होता जुडा तलाव उंची ९१०० फूट. सगळया बाजूंनी घनदाट जंगलांनी वेढलेले डोंगर व मध्येच बशी सारख्या खोलगट जागी हा छोटा तलाव होता, त्याच्या शेजारीच तंबू टाकून राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
त्यानंतरच्या दिवशी कमी पायपीट होती व लवकरच केदारकंठ बेस कॅम्प येथे मुक्काम ठोकला. उंची ११,२५० फूट. या ठिकाणी येताना रस्त्यातच पहिल्या बर्फाचं दर्शन झालं तसे सगळे खूश झाले. सूर्यास्त झाल्यावर येथे सोसाटय़ाचा थंडगार वारा सुटला व तापमान शून्य अंशाच्याही खाली गेले. प्रत्येकाने असतील तेवढे स्वेटर्स, थर्मल वेअर्स, कानटोप्या, हातमोजे घालूनही हुडहुडी काही कमी होईना. शेवटी शेकोटी पेटवून हुडहुडी कमी करण्याचा प्रयत्न केला. या कॅम्प साइटच्या जवळ दहा फुटावरच बर्फाच्या भिंती होत्या तर दूरवर ओळीने बर्फाच्छादित शिखरांचे विहंगम दर्शन होत होते.
आजचा दिवस सर्वात महत्त्वाचा होता. कारण आज मोहिमेचा सर्वोच्च बिंदू म्हणजे केदारकंठ शिखरावर चढाई करायची होती. उन्हाचा ताप वाढवण्यापूर्वी शिखर सर करता यावं म्हणून पहाटे साडेसहा वाजताच चालायला सुरुवात केली. शिखराकडे जाताना अनेक वाटा बर्फातून जात होत्या. त्यामुळे बर्फावरून चालताना बऱ्याच वेळा लोटांगणे घालण्याची वेळ आली. रस्त्यात अनेक छोटे-मोठे ओहोळ पार करावे लागले.
शेवटी सकाळी अकरा वाजता केदारकंठ शिखरावर सगळ्यांचे आगमन झाले. उंची १२ हजार ५०० फूट. शिखरावर पोहोचताच सगळ्यांनी एकच जल्लोष केला. शिखरावर गणपतीची मूर्ती व महादेवाची पिंड होती. सगळ्या आरत्या तेथे म्हटल्या गेल्या. बरोबर असलेल्या स्थानिक वाटाडय़ाने उदबत्ती लावली व प्रसाद वाटला.
केदारकंठ शिखरावरून ३६० अंशातून आजूबाजूच्या सगळ्या शिखरांचे मनोज्ञ दर्शन होत होते. वाटाडय़ाने गंगोत्री, यमनोत्री, बंदर पुच्छ, स्वर्ग रोहिणी, कैलास किन्नोर या सगळ्या शिखरांचा परिचय करून दिला शिवाय हर की धून व रुपीन पास पदभ्रमण मोहिमा कोणत्या मार्गाने जातात हेही दाखवले.
वाटाडय़ाने स्वर्ग रोहिणी शिखराविषयी गढवाल प्रांतात प्रचलित असलेली कथा सांगितली ती अशी – पांडव जेव्हा त्यांचे पृथ्वीवरील अवतार कार्य संपवून स्वर्गात गेले ते याच शिखरांवरून म्हणून या शिखराला स्वर्ग रोहिणी शिखर म्हणतात व हे शिखर आजपर्यंत कधीच सर करण्यात आलेले नाही.
परतीच्या प्रवासात धुंदा गावाजवळ एका रमणीय ठिकाणी तंबू टाकण्यात आले होते. या तंबूच्या समोरच दोन ठिकाणांहून धबधबे कोसळत होते व पुढे त्यांचे रूपांतर छोटय़ा नदीत होत होते. सभोवरच्या हिरवळीवर असंख्य छोटी छोटी पिवळी फुले फुललेली दिसत होते. स्थानिक वाटाडय़ाने या पिवळ्या फुलांना दूध फुलं असे नाव असल्याचे सांगितले कारण याचे देठ खुडले की त्यातून दुधासारखा पांढरा द्रव निघतो.
हिमालयात बऱ्याचदा एका दिवसात तीनही ऋतू अनुभवता येतात याची प्रचीती तेथे आली. रात्री व पहाटे प्रचंड थंडी, उन्हं चढल्यावर घाम काढणारी गर्मी व दुपारी चारनंतर ढग जमा होऊन पाऊससुद्धा आला.
शेवटच्या दिवशी पदभ्रमण मोहिमेत हिमालयातील सगळ्या महत्त्वाच्या वृक्षांच्या भेटी झाल्या. पाइन, देवदार. चिनार, सुरूसारखे सदाहरित वृक्षांसोबत जंगली ऱ्होडोडोड्रॉनच्या फुलांच्या असंख्य झुडपांनी डोळ्यांना भरपेट मेजवानी दिली. निळी, पांढरी छोटी फुलं तर अगणित दिसली. स्थानिक वाटाडय़ाने माहिती दिली की जुलै- ऑगस्ट महिन्यात या ठिकाणी कमरेएवढय़ा उंचीची असंख्य फुलझाडे फुलतात. तेव्हा ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ च्या तोडीचे दृश्य तेथे दिसते.
सांकरीच्या जवळ आल्यावर सफरचंद, लिचीची झाडं पहायला मिळाली. आतापासून छोटी छोटी हिरवट सफरचंद लगडलेली पहाणं हाही एक न विसरता येण्याजोगा अनुभव होता.
पाच दिवस भ्रमणध्वनीला रेंज नाही, आंघोळ नाही, वृत्तपत्र, टी.व्ही. कशाचेही दर्शन नाही. वीज नाही. नैसर्गिक विधी बाहेर करायचे. तंबूत नऊ वाजताच स्लीपिंग बॅगमध्ये झोपायचे हा थरारक अनुभव प्रत्येकाने एकदातरी अवश्य घेऊन पाहावा, असे सुचवावेसे वाटते. आमच्या या मोहिमेत सहा वर्षांच्या मुलांपासून ते ६३ वर्षांच्या आजोबांपर्यत ५७ लोकांचा सहभाग होता. कोणालाही कसलाच त्रास न होता शहरी वेगवान जीवनशैलीमुळे प्रत्येकाच्या मनावर चढलेली काजळी साफ करण्याचे बहुमोल काम हिमालयातील पदभ्रमण मोहिमेने साध्य केल्याचे निश्चितपणे म्हणता येईल.
वंदना आव्हाड –