भारतातर्फे या शिखरावर पहिले पाऊल टाकणाऱ्या १९६५ च्या पहिल्या मोहिमेस यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त या मोहिमेचा हा वेध..
माऊंट एव्हरेस्ट! २९ मे १९५३ या दिवशी एडमंड हिलरी आणि तेनझिंग नोर्गे या दोन साहसवीरांनी एव्हरेस्टवर पहिले पाऊल टाकले आणि साऱ्या विश्वाच्या पटलावर हा शब्द एक आव्हान बनून पुढे आला. खरेतर या दिवसाच्या अगोदर किमान शंभर वर्षांपासूनच मानवाने या सर्वोच्च शिखराचा ध्यास घेतला होता. हा ध्यास या पहिल्या यशानंतर पुढे आणखी वाढला. २९,०३५ फूट उंचीच्या या शिखराच्या माथ्याला डोके टेकवण्याच्या भावनेतून देशोदेशीचे गिर्यारोहक झटू लागले होते. या प्रकारची इर्षां भारतीयांमध्येही सळसळत होती. यातूनच १९६०, १९६२ आणि १९६५ असा सलग तीन मोहिमांनंतर ६५ च्या मोहिमेत भारताला या सर्वोच्च माथ्याला स्पर्श करण्याचे पहिले यश गवसले. १९६५ च्या या यशाला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.
खरेतर पहिला एव्हरेस्टवीर तेनझिंग नोर्गे यांच्या यशानेच भारतीय गिर्यारोहणात नवी ऊर्मी तयार झाली होती. या ऊर्मीतूनच भारताच्या वतीने १९६० साली पहिली एव्हरेस्ट मोहीम निघाली. कर्नल ग्यानसिंग हे या मोहिमेचे नेते होते. बराच गाजावाजा करून निघालेल्या या मोहिमेला मात्र हिमवादळामुळे माघार घ्यावी लागली. पुढे १९६२ मध्ये ‘एव्हरेस्ट’ वर पुन्हा नवी मोहीम काढण्यात आली. या मोहिमेचे नेतृत्व मेजर जॉन डायस यांच्याकडे होते. या मोहिमेने तब्बल २८,६२० फुटांपर्यंत मजल मारली. पण हिमवादळामुळे त्यांनाही माघार घ्यावी लागली. या मोहिमेत सहभागी असलेल्या मोहनसिंग कोहली यांच्या नेतृत्वाखालीच मग १९६५ साली एव्हरेस्टच्या दिशेने तिसरी मोहीम निघाली.
एकूण २१ गिर्यारोहकांचा या मोहिमेत समावेश होता. त्याच्या सोबतची साधने, साहित्य, अन्नधान्य साठा हे तब्बल २८ टन वजनाचे होते. हे सर्व वाहून नेण्यासाठी एक-दोन नव्हे तर ८०० पोर्टर्स कामाला लावले होते. सुमारे एक महिन्याच्या अथक चालीनंतर हा संघ आणि त्यांच्या बरोबरचा हा लवाजामा एव्हरेस्टच्या तळावर पोहोचला.
१७,८०० फूट उंचीवर बेस कॅम्प लावला गेला. नवांग गोंबू आणि कॅप्टन चिमा यांची पहिली तुकडी २८ एप्रिल रोजी एव्हरेस्ट शिखराच्या खांद्यापर्यंत म्हणजे ‘साऊथ कोल’ जवळ पोहोचली, पण हवामान बिघडल्याने त्यांना परत खाली उतरावे लागले.
हवामान सामान्य झाल्यावर या गिर्यारोहकांनी पुन्हा चढाईला प्रारंभ केला आणि १८ मे पर्यंत त्यांनी पुन्हा ‘साऊथ कोल’पर्यंत मजल मारली. १९ मे रोजी त्यांनी अखेरचा तळ लावला आणि २० मे रोजी भारताच्या वतीने गेलेल्या मोहिमेतून गोंबू आणि चिमा या जोडीने एव्हरेस्टवर पहिले पाऊल टाकले. पुढे २२ मे, २४ मे आणि २९ मे रोजी उर्वरित गिर्यारोहकांनीही या सर्वोच्च शिखराच्या माथ्याला स्पर्श केला. यामध्ये २९ मे रोजी कॅप्टन अहलुवालिया, हरीश रावत आणि शेर्पा फू दोर्जे हे तीन गिर्यारोहक एकाचवेळी शिखर माथ्यावर पोहोचले. एकाच वेळी तीन जणांनी माथ्याला स्पर्श करण्याची घटना हा त्यावेळी एक विक्रमच होता. याशिवाय एकाच मोहिमेतून एक ना दोन तर तब्बल ९ जणांनी शिखर सर करण्यातूनही भारताने एक नवा विक्रम रचला होता.
भारताच्या या यशाने त्यावेळी संपूर्ण देशभर उत्साहाची लाट उसळली होती. लोकांनी रस्त्यावर येऊन हा विजय साजरा केला होता. देशातील सर्वच वृत्तपत्रांनी या घटनेला मोठी प्रसिद्धी दिली. भारताच्या तत्कालिन पंतप्रधानांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवत या विजयी संघाचे विमानतळावर जाऊन स्वागत केले. पुढे या मोहिमेवर आधारित एक चित्रफीत तयार करण्यात आली. प्रसिद्ध संगीतकार शंकर-जयकिशन यांनी या चित्रफितीला संगीत दिले होते. ही चित्रफीत संपूर्ण देशभर दाखविण्यात आली. या विजयोत्सवामध्ये ८ सप्टेंबर १९६५ हा दिवस मोठा संस्मरणीय ठरला. भारताच्या दोन्ही सभागृहात या गिर्यारोहकांच्या संघास निमंत्रित करण्यात आले. संसदेच्या ‘सेंट्रल हॉल’मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. इंदिरा गांधी यांनी या वेळी केलेल्या भाषणामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सहा मोठय़ा घटनांमध्ये या एव्हरेस्ट विजयाची नोंद घेतली.
भारताच्या गिर्यारोहण विश्वाचा पायरव करणाऱ्या, या जगाला नवे वळण, आयाम, दिशा देणाऱ्या या मोहिमेला या वर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षांत भारतीय गिर्यारोहणाने यशाचे अनेक टप्पे पार केले. चढाईचे नवे मानांकन प्रस्थापित केले, पण या साऱ्या यशामध्ये या ‘१९६५’ च्या पावलांचे धागेदोरे आजही सापडतात!
आजही आठवणी ताज्या आहेत..
आमच्या एव्हरेस्ट मोहिमेला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. आजही या साऱ्या आठवणी ताज्या वाटतात. आमच्या या मोहिमेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त यंदा आमच्या त्या वेळच्या संघातले आम्ही आठजण या मोहिमेची माहिती देत भारतभ्रमण करीत आहोत. या सदस्यांमध्ये अगदी ७३ ते ९२ वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत. देशभर आजच्या पिढीला आमच्या त्या मोहिमेविषयीच्या आठवणी सांगणे खूप रोमांचकारी अनुभव आहे. आज हा छंद सर्वत्र वेगाने वाढतो आहे, विकास पावतो आहे. पुणे तर या खेळासाठी साऱ्या देशाचा केंद्रबिंदू झाला आहे. गिर्यारोहणासाठी लागणारे आवश्यक वातावरण, मोहोवणारा भूगोल आणि पूरक गोष्टी पुण्यात मिळत आहेत. यामुळे या खेळाची पुढची प्रगती आता पुण्यातून दिसेल.
कॅप्टन मोहनसिंग कोहली (निवृत्त)
(पहिल्या यशस्वी भारतीय मोहिमेचे नेते)