दसरा सगळय़ांसाठीच खास असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचे एक वेगळे स्थान असते. आम्हा सह्याद्रीतल्या प्रस्तरारोहकांसाठी एक नव्या हंगामाची या निमिताने सुरुवात होते. कडक उन्हाचे चटके आणि पावसाचे थेब अंगावर घेऊन पुन्हा एकदा आम्हा सगळय़ांना अंगाखांद्यावर खेळवायला सह्याद्रीतील कडे-सुळकेही तयार असतात. प्रस्तरपूजा झाली की, येणारा पहिला रविवार एका तरी सुळक्याच्या माथ्यावर घालवायचा याचे वेध लागतात. ‘बाण हायकर्स’ तर्फे आमचीही अशीच मोहीम निघाली. यावेळीही आम्ही एक सुळका निवडला. माथेरानच्या कुशीतील. या सुळक्याचे नाव लुईसा!
माथेरान म्हटले की, सगळय़ांना केवळ मौजमजेची जागा आठवते. पण आम्हाला या मोहिमेत या स्थळाचा वेध केवळ त्या सुळक्यासाठी होता. माथेरानच्या या डोंगररांगांच्या परिसरात येताच अनेक डोंगर पर्वत खुणावू लागले. कलावंतीण, प्रबळगड, इर्शालचा सुळका असे बरेच ओळखीचे चेहरे दिसू लागले. इथे पोहोचलो त्या वेळी रात्र झाली होती. अवकाशातील ताऱ्यांसोबत रात्र घालवली आणि भल्या सकळीच मोहिमेच्या तयारीला लागलो.
हा लुईसा सुळका व बाजूचा डोंगर याच्यामध्ये अडकलेल्या एका दगडापासून आरोहण मार्गाची सुरुवात होते. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल १५० फूट ‘रॅपिलग’ (दोरीच्या साहाय्याने डोंगर उतरणे) करून खाली जावे लागते. त्यासाठी झाडाला दोर बांधून आम्ही हे ‘रॅपिलग’ केले. एका वेळी तिघेजण जेमतेम उभे राहतील अशी ती जागा. ७० फुटांच्या सुळक्याचा सुरुवातीचा २० फुटी टप्पा हा सरळ कातळ मग वर माती मिश्रीत भाग असा. सुरक्षा दोरीची मदत घेऊन आम्ही चढाईला सुरुवात केली. पहिल्या २० फुटात कसब लागणारी चढाई पार करून पहिला टप्पा गाठला. इथेच पूर्वी ठोकलेला एक खिळा दिसला. पण त्याची स्थिती पाहता तो कधी आपले प्राण सोडेल असा होता. गेली अनेक वष्रे उन, वारा पावसाचा मारा सोसून तो जीर्ण झाला होता. पण पुढे इतके काही अवघड नाही या विचाराने नवीन खिळा मारण्याच्या भानगडीत न पडता त्याच खिळ्यात दोर ओवून आम्ही पुढे सरसावलो. तिकडे अजून २ खिळे तशाच अवस्थेत दिसले. दोघांचा आधार घेतला खरा पण दोघांवर किती विश्वास ठेवायचा याची शंकाच येत होती. इथून पुढे मात्र धोक्याची चढाई सुरू झाली. खडी चढाई त्यावर मातीचा घसारा. सुरक्षा दोर आणि चढाईतील काळजी घेत मार्गक्रमण सुरू केले. घसरत, पडत, कपारींचे आधार घेत काही वेळातच सुळक्याच्या माथ्यावर पाऊला पडले. या हंगामातला पहिला सुळका सर झाला. सुळक्यावरून दिसणारे दृश्य मनाला वेड लावणारे होते. माझ्या मागून आमच्या संघातील विश्रामने देखील सुळक्यावर पाऊल ठेवले. खाली मार्गावर स्वातीने आम्हाला मदत केली. सुळक्याच्या माथ्यावर भगव्या झेंडय़ासोबत शिवरायांची मूर्ती देखील होती. एका साहसानंतर हे असे घडणारे दर्शन खूप बळ देणारे असते.

Story img Loader