आडवाटा चढायचा नाद जडला, की वेगवेगळय़ा गडकोटांची वारी सुरू होते. सातारा जिल्हय़ात असे अनेक अपरिचित गडकोट दडले आहेत. यातील आज या जुळय़ा भावंडांची दुर्गवारी.
पुणे-बंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाट ओलांडला, की पूर्वेकडे रस्त्याला समांतर अशी एक डोंगररांग गेलेली दिसते. या रांगेवरच भुईंजजवळच्या किकली गावाच्या माथ्यावर चंदन-वंदन ही गडजोडी कधीची विसावलेली आहे. खरेतर पर्वताच्या या जोडीनेच त्यांच्याकडे लक्ष जाते. शेजारी शेजारी असलेल्या दोन पर्वतांवर गडकोट थाटण्याचा प्रकार आपल्याकडे पुरंदर-वज्रगड, लोहगड-विसापूर, राजमाचीचा श्रीवर्धन-मनरंजन आदी ठिकाणी दिसतो, त्यातीलच ही आणखी एक जोडी, चंदन-वंदन!
चंदन-वंदनच्या भेटीला जायचे म्हटले तर सातारा जिल्हय़ातील भुईंजहून किकली गावापर्यंत यायचे. हे अंतर आहे पाच ते सहा किलोमीटरचे! यासाठी भुईंज किंवा पुढील पाचवडहून एसटी बस नाहीतर रिक्षाची सोय आहे. किकली हे शंभर-दीडशे उंबरठा असलेले गाव. पण गावात शिरण्यापूर्वीच उजव्या हाताचे भैरवाचे (महादेव) चिरेबंदी मंदिर लक्ष वेधून घेते. आत शिरल्यावर याचे महत्त्व पुढच्या किल्ल्याहून अधिक असल्याचे सहज जाणवते. हेमाडपंती शैलीतील हे यादवकालीन मंदिर! प्रवेशद्वार, मुखमंडप, कक्षासन, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची रचना! यातील मंदिराचे भरजरी खांब आणि त्यावरील शिल्पकाम तर केवळ देखणे असे. हे मंदिर पाहायचे आणि मग पुढे चंदन-वंदनच्या वाटेला भिडायचे.
या गडांवर जाण्यासाठी गावातून किंवा शेजारच्या बेलमाचीतून एक ढोरवाट जाते. गडाच्या पूर्व बाजूच्या बनवडी गावातूनही एक वाट गडावर चढते. झाडाझुडपांतील या सर्व वाटा तासाभरात आपल्याला या जोडकिल्ल्यांमधील खिंडीत घेऊन येतात. या खिंडीत आल्यावर किकलीच्या बाजूने पाहिल्यास उजवीकडे वंदन, तर डावीकडे चंदन! यात मग आधी नम्र होत ‘वंदन’ करावे, म्हणजेच वंदन किल्ल्याकडे निघावे.  वंदन चंदनपेक्षा उंचीने जास्त! जणू या दोघांमधील मोठा भाऊ! गडाच्या मध्यावरील ही वाट आणखी थोडी वर चढत वंदनकडे निघते. एकापाठोपाठ दोन दरवाजे. एकेकाळचे भक्कम, पण आता थकलेले! या थकलेल्या शरीरांचे बाजूकडील दोन्ही बुरूज मात्र आजही खणखणीत! त्यावर श्री गणेश आणि षोडशदल कमळाचे शिल्प कोरलेले. गडाखालच्या गावातील लोकांनी त्याला शेंदूर लावून देव केलेले. या दोन दरवाजांतील वरचा पहिल्याहून ज्येष्ठ! त्याचा सोपान चढून आत शिरलो, की डाव्या हातालाच एका इमारतीवर फार्सी लिपीतील शिलालेख दिसतो. त्याच्या तळाशी मोडी लिपीतीलही एक ओळ आहे. बहुधा हा दरवाजा, त्याच्या बांधकामाविषयीच तो काहीबाही सांगू पाहतो. पण फार्सी येत नाही आणि तो कुणा तज्ज्ञाने वाचलेला नाही, त्यामुळे आजतरी ‘काला अक्षर भैस बराबर’! कोणीतरी तज्ज्ञ माणसाने यावर नजर टाकावी आणि या मुक्या ओळींना बोलते करावे. इसवी सन १६०० मध्ये इब्राहिम आदिलशाह याने गडावर बरीच बांधकामे केली. बहुधा त्याच वेळी हा दरवाजा आणि त्यावरचा हा शिलालेख बसवला गेला असावा. या दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांसाठी खोल्या किंवा अस्सल ऐतिहासिक भाषेत ‘अलंगा’ बांधलेल्या दिसतात. पुढे आणखी काही पायऱ्या चढून माथ्यावर आलो, की ओळीने अनेक पडलेल्या इमारतींचे चौथरे दिसतात. स्थानिक लोक याकडे ‘ब्राह्मणवस्ती’ म्हणून बोट दाखवतात. एवढी बांधकामे पाहिल्यावर गडावर कधीकाळी बराच राबता असल्याचे वाटते. पण आज इथे माणूस दर्शनाला दुर्मिळ झाला आहे. नाही म्हणायला एखादे गुराख्याचे पोर दिसते आणि मग त्यालाच साथीला घेत गडदर्शन सुरू होते. गडाच्या मध्यावर एक छोटी टेकडी आहे. या टेकडीलगतच गडकऱ्याचा पडलेला वाडा आहे. जुन्या दफ्तरामध्ये त्याचा उल्लेख ‘सरकारवाडा’ असा आला आहे. या वाडय़ाभोवतीही काही जुनी बांधकामे आहेत. यातच एक तीन खोल्यांची इमारत अद्याप ताठ मानेने उभी आहे. याशिवाय वाटेतच जागोजागी पाण्याची मोठी तळीही दिसतात. पण यातील अनेकांनी पाण्याची साथ कधीच सोडली आहे. उरलेली गाळाच्या व्यथेत रुतली आहेत. हे सारे पाहात पश्चिमेला आलो, की एका विस्तीर्ण तळय़ाकाठी मशीद दिसते. मुस्लीम राजवटीतच ती उभी राहिली असावी. पाण्याने इथल्या तळय़ाला आणि मुस्लीम बांधवांनी मूळ स्वरूपातील या मशिदीला अद्याप जिवंत ठेवले आहे. आजचे तिचे ऐतिहासिक रूपच कायम राहावे, एवढीच मनोमन इच्छा! या मशिदीच्याच मागे एक स्नानगृह आणि काही थडगी दिसतात.  गडाला चहूबाजूने ताशीव कडे असल्याने जिथे आवश्यक आहे त्याच ठिकाणी तट-बुरुजांची चिलखते चढवली आहेत. गडावर मारगिरीच्या जागा फारशा दिसत नसल्या तरी याच वंदनवर असलेल्या एका प्रसिद्ध तोफेचा नाश करण्यासाठी सन १८५७ मध्ये कॅप्टन रॉसची नजर वंदनकडे वळल्याची नोंद एका ठिकाणी आहे.
तासा-दीड तासात वंदन पाहून झाला, की पाठीमागच्या चंदनकडे निघावे. आल्यावाटे खिंडीतून चढून चंदनवर जाता येते. पण ही वाट उभ्या कातळाला छाती लावणारी. तेव्हा अशी सवय नसणाऱ्यांनी गडाला वळसा घालत मळलेल्या वाटेने चंदनवर यावे. या गडाला एकच दरवाजा आहे. तो ओलांडला, की आपण माथ्यावर येतो. इथे महादेवाचे एक मंदिर आणि त्याशेजारी एक भलामोठा वटवृक्ष आहे. इथूनच पुढे पठाराकडे जाऊ लागलो, की वाटेत एक आश्चर्य आडवे येते. वाटेच्या दोन्ही बाजूंना भल्यामोठय़ा आकाराच्या दगडांच्या शिळा एकावर एक रचून ठेवलेल्या आहेत. या दगडांचे आकार-रूप-वजन पाहिले, की हे अजस्र काम कोणी केले याचे आश्चर्य वाटू लागते. मानवी कुवतीबाहेरच्या या अशा स्थळाजवळच मग पुराणातील कथाही जन्म घेतात. पांडवांचे या भागातील वास्तव्य, त्यांचा पराक्रम कानी पडतो आणि मग या प्रचंड शिळांच्या मनोऱ्यालाही चेहरा प्राप्त होतो. पण दुसरीकडे इतिहासकार ग्रॅन्ड डफ या भल्यामोठय़ा शिळांपासूनच गडाचा इतिहास सांगायला सुरुवात करतो. चंदन-वंदनची निर्मिती ही राजा भोजची, तेव्हा ही शिळांची रचाईही त्याच्याच हातची असे सांगत तो इतिहास सांगू लागतो.
असो! हे आश्चर्य पाहावे आणि पठारावर यावे. इथेही वंदनप्रमाणे घरा-वाडय़ांचे अवशेष दिसतात. एक कोरडे तळे तहान वाढवते, पण मग पुढे काही अंतरावरच अन्य एक टाके त्याच्याकडील पाण्याने ती शमवतेदेखील. गडावरील पाण्याचे हे दुर्भिक्ष्य आणि चहा-न्याहारीचीही नसलेली सोय लक्षात घेऊन येताना पुरेशी काळजी घेत इकडे यावे.
तासा-दीड तासात चंदनही फिरून होतो. मग सुरू होते त्याचा भवताल शोधणे. पूर्वेकडून जरंडेश्वर, अजिंक्यतारा, सज्जनगड करत पश्चिमेच्या वैराट, पांडव, कमळ, केंजळगडावर नजर स्थिरावते. तळाच्या हिरव्या शेतीवाडीतून किसन वीर साखर कारखाना आणि बनवाडीचे छोटेसे धरण उठून दिसते. पश्चिम किनार स्वच्छ असेल तर धोम-बलकवडी धरणाचे चमचमणेही अनुभवता येते. उंचीचे हे माहात्म्य मग गडाच्या भूतकाळात घेऊन जाते.
चंदन-वंदन ही राजा भोजची निर्मिती असली तरी गडावरची बहुतेक बांधकामे ही आदिलशाहीनंतरची आहेत. विजापूरकरांकडे असलेला हा गड इसवी सन १६७३ मध्ये स्वराज्यात आला. पुढे १७०१ मध्ये औरंगजेबाची टोळधाड या गडावरही आली. पण हे सावट पुढे काही वर्षांतच १७०८ मध्ये छत्रपती शाहूमहाराजांनी पुसून टाकत गड पुन्हा स्वराज्यात आणला. यानंतर तो अगदी १८१८च्या मराठे-इंग्रजांमधील शेवटच्या लढाईपर्यंत मराठय़ांकडेच होता. या लढाईत गडावर इंग्रजांचे निशाण चढले. इंग्रजांच्या पारतंत्र्याबरोबरच महाराष्ट्रातील अन्य गडकोटांच्या वाटेला जी उपेक्षा-दुर्दशा आली, त्यामध्येच चंदन-वंदनचे नशीबही सापडले. पुढे इंग्रज गेले. स्वातंत्र्याचीही आता साठी उलटली तरी गडाची ही उपेक्षा अद्याप सुरूच आहे. कोणीतरी महादेवाच्या दर्शनाला, नाहीतर कबरीवर चादर चढवायला गडावर येतो, पण आमच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेल्या गडाशी हितगुज करायला फारसे इकडे कोणी येत नाही. अशी पावले ज्या वेळी या गडाची वाट चढू लागतील, त्या वेळी चंदन-वंदनलाही त्याच्या उभ्या आयुष्याचे चीज झाल्यासारखे वाटेल!
अभिजित बेल्हेकर – abhijit.belhekar@expressindia.com

Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
kalyan MNS citizens road agaitationTruck crushes mother, child
कल्याणमध्ये ट्रकने आई, मुलाला चिरडले; मनसेसह नागरिकांचे रस्ता रोको
bjp devendra fadnavis stand on dhananjay munde resignation as minister post
धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद भाजपवर अवलंबून
dhananjay munde
मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक; भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Manoj Jarange Patil: “… तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
member registration campaign BJP
वर्धा : भाजपसाठी ‘ ५ ‘ तारीख महत्वाची; नेते, पदाधिकारी कामाला लागले
youth pistols Marathwada marathi news
सत्ता, श्रीमंती मिरवण्यासाठी कंबरेला पिस्तूल, बीडसह संपूर्ण मराठवाड्यात लाखोंची ‘हौस’
Story img Loader