नाशिक आणि ठाणे जिल्ह्य़ांएवढे दुर्ग आपल्याकडे अन्य कुठल्या जिल्ह्य़ात नसावेत. यात नाशिक प्रांतातील किल्ल्यांना तर त्यांच्या संख्येबरोबरच स्थानआकाराचेही वैविध्य आहे. सह्य़ाद्रीच्या मुख्य धारेपासून स्वतंत्र पोटशाखा होत धावणाऱ्या सेलबारी, डोलबारी, चणकापूर, दुंधेश्वर, त्रिंबक आदी डोंगररांगांवर या उंच गिरिशिखरांच्या दुर्गानी निव्वळ गोंधळ मांडला आहे. एकेक पर्वत – दुर्ग निव्वळ आकाशाला भिडलेला, त्याचे ते उंच कातळाचे रुप पाहतानाच जणू उरात धडकी भरावी आणि पायातील अवसान गळावे. या भूगोलाच्या आश्रयानेच मग कधी सातवाहनापासूनचा इतिहास इथे घडला आणि आमच्या पुराणकथाही या पर्वतांना चिकटल्या. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरीचा पर्वतही याच माळेतील. कुणा लेखी तो इतिहासातील अभेद्य दुर्ग तर कुणासाठी तो अंजनीसूत हनुमानाचे जन्मस्थान!
नाशिकहून २३ किलोमीटरवर हा अंजनेरी दुर्ग. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी गावच्या हद्दीत. या वाटेवरीलच अंजनेरीचे प्रसिद्ध ‘मुद्रा संग्रहालय’ ओलांडले, की त्यापुढे ४ किलोमीटरवर या अंजनेरी गडाकडे जाण्याचा फाटा लागतो. इथपर्यंत येण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर पर्यंत सतत धावणाऱ्या एस टी बस सोईच्या. या फाटय़ावर उतरले की लगेच एक वाट ‘हनुमान जन्मस्थान अंजनेरी’ अशी पाटी दाखवत डावीकडच्या डोंगररांगेवर निघते. काही अंतरावर एका टेकडीवर अंजनेरीची एक वस्ती. या वस्तीला खेटूनच ही वाट चार वळणे घेत थेट अंजनेरीच्या पायथ्यापर्यंत पोहोचते. स्वत:चे वाहन असेल तर थेट या पायथ्यापर्यंत येता येते.
नाशिकच्या पश्चिम अंगाला सह्य़ाद्रीची एक रांग लांब-रुंद-उंच पावले टाकत गेलेली आहे. ‘त्र्यंबकेश्वर’ असे या डोंगररांगेचे नाव. अंगावर येणाऱ्या या डोंगररांगेवर त्रिंबक उर्फ ब्रह्मगिरी, वाघेरा, सोनगीर, खैराई, रांजणगिरी, भंडारदुर्ग, हरिहर अशा अनेक दुर्गशिखरांचे सुळके आकाशात घुसलेले आहेत. यातलेच एक अंजनेरीचे ते अजस्त्र रुप. आपल्या पुढय़ात जणू दोन्ही बाहू सरसावून उभे असते!
अंजनेरी, उंची १३०० मीटर किंवा ४२६५ फूट! मुख्य डोंगररांगेला चिकटलेली दक्षिण बाजू सोडल्यास तीनही बाजूंना केवळ उभा कातळ. या अंजनेरीच्या अलीकडे त्याला खेटून आणखी एक पर्वत नव्वद अंशाचा कोन करून उभा. त्याच्या शिरी पुन्हा सुळके. यातील पहिले दोन, ‘सासू’ आणि ‘नवरी’ च्या नावाने, तर या दोन्हींपेक्षा उंच असलेला ‘नवरदेव’ नावाने परिचित! आमच्या लोककथांनी या पर्वत रचनांना जागोजागी दिलेली ही अशी नावे. मग त्याचा दाखला देत इथेही ती वऱ्हाड लुप्त झाल्याची कथा ऐकण्यास मिळते. आपण आपली ती कथा ऐकायची आणि आकाशात उंच जागी स्थिरावलेल्या या सुळक्यांकडे गूढ नजरेने पाहत पुढे निघायचे.
आदल्याच दिवशी पडून गेलेल्या पावसाने सकाळी सारे आकाश स्वच्छ, निळेभोर झाले होते. त्याच्या या निळाईच्या पाश्र्वभूमीवर अंजनेरी आणि त्या अलिकडच्या या नवरा-नवरीच्या सुळक्यांना अधिकच उठाव आलेला होता. त्यांचे ते राजबिंडे रुप पाहतच अंजनेरीचा पायथा गाठला.
वाटेतल्या वस्तीपासून सुरू झालेली ही वाट चांगलीच मळलेली. कुठल्याशा पर्यटन योजनेतून दुतर्फा वृक्षारोपण, बसण्यासाठी ओटे, विश्रांतीसाठी राहुटय़ाही उभारलेल्या होत्या. आपल्याकडे असे चित्र आश्चर्याचा धक्का देणारेच म्हणावे.
अंजनेरीच्या अगदी पायथ्याशी आंब्याची तीन मोठाली डेरेदार झाडे. मे-जूनच्या महिन्यात त्याला शेकडो गावठी आंबे लगडलेले असतात. या झाडांखालीच थोडी विश्रांती घ्यायची आणि गडाला भिडायचे. अंजनेरीच्या पूर्व अंगाकडून सुरू होणारा हा पायरीमार्ग त्याला वेढा घालत दक्षिण दिशेने वर चढतो. गडाची ही उभी चढण पायऱ्यांमुळे काहीशी सुसह्य़ वाटते. धापा टाकतच चढाईच्या शेवटच्या टप्प्यात यावे तो समोर खोदलेली एक नाळच दिसते. जुन्नरच्या हडसर किल्ल्याची आठवण करून देणारी. या नाळेत पायऱ्या खोदलेला प्राचीन मार्ग होता. परंतु नुकतेच काही वर्षांपूर्वी या मार्गावर ‘सिमेंट काँक्रिट’च्या पायऱ्या ओतल्याने हा मार्ग आता बुजला गेला आहे.
दोन्ही अंगांचे, अंगावर येणारे कडे झेलत वर चढताना एकदम गूढ देशी आल्याचा अनुभव येतो. आकाशात शिरलेल्या त्या कडय़ांवर नजर ठेवत त्या वळणदार नाळेतून वर यावे तो डाव्या हाताला अचानक एक खोदीव दालन डोळे मिचकावत पुढे येते. एवढय़ा दूर उंच जागी मानवनिर्मित इतिहासाचा हा पहिला थांबाच मन सुखावून टाकतो.
पाश्र्वनाथाचे लेणे! कातळाला समांतर कोरलेले हे लेणे. या लेण्यात दोन दालने. बाहेरच्या दालनात भैरव आणि हनुमानाचे शिल्प, तर छतावर चांगले अध्र्या मीटर व्यासाचे कमळपुष्प कोरलेले. गर्भगृहाचे प्रवेशद्वारही नागशिल्प, कीर्तिमुख आणि अन्य भौमितिक आकृत्यांनी सजवलेले. पुन्हा दोन्ही अंगांना द्वारपालांचीही रचना.
मिट्ट काळोखाला भेदत आतील दालनात शिरलो, की सुरुवातीला काहीच दिसत नाही. पण मग या अंधाराला सरावलेल्या डोळ्यांना हळूहळू इथले शिल्पसौंदर्य दिसू लागते. मधोमध पद्मासनातील पाश्र्वनाथाचे अर्धा मीटर उंचीचे शिल्प आणि दोन्ही बाजूंना अन्य दहा मूर्ती. अंधाऱ्या गर्भगुंफेतील या शिल्पमेळय़ाशेजारी एक संस्कृत शिलालेख आहे, जो याची थोडीफार माहिती देतो, ‘सौन्देव राजाच्या मंत्र्याने इसवीसन ११४१ मध्ये या कामासाठी देणगी दिली.’ राजाश्रयातून खोदली जाणारी ही शैलगृहे आणि किल्ल्यांचे अतुट नाते, ते इथेही दिसून येते.
अंजनेरी किल्ल्याचा इतिहास शोधताना मूळात त्याच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावाचा भूतकाळ विचारात घ्यावा लागतो. अंजनेरी हे प्राचीन काळापासून एक राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे केंद्र होते. यादवांच्या काळात तर या परिसराचे महत्त्व आणखी वाढले. या प्राचीन कालखंडाचे अवशेष आजही गावात आढळतात, सापडतात. अंजनेरीत हिंदू आणि जैनांची प्राचीन सोळा मंदिरे आहेत. यातील अनेक मंदिरे आजही त्यांचा तो अभिजात कलेचा ठेवा जतन करून उभी आहेत. अशा या प्राचीनकाळी भरभराटीला आलेल्या अंजनेरी नगरीच्या आश्रय, आधारासाठीच तर हा किल्ला निर्माण झाला. त्यामुळे या किल्ल्यावर या नगरीची, तेथील राजकीय – धार्मिक व्यवस्थेची मोठी छाप पडली.
पाश्र्वनाथाचे लेणे ओलांडले, की ही नळीची वाटही संपते आणि आपण गडावर पोहोचतो. गड सर केला असे वाटत असतानाच आपली चढाई मात्र त्याच्या माचीपर्यंतच झाल्याचे लक्षात येते. विस्तिर्ण पठाराची माची आणि त्याच्या दक्षिण अंगाला पुन्हा बालेकि ल्ला अशी या अंजनेरीची रचना.
या पठारावरील प्रवेशाजागीच गडाच्या दरवाजाचे काही अवशेष दिसतात. त्याला ओलांडत पठारावर येताच एवढावेळ कोंडलेला तो वारा एकदम अंगाला झटा देऊ लागतो. पावसाळ्यात आले, की या वाऱ्याबरोबर पाऊस आणि ढगांचे लोटही चारही बाजूने घेरू पाहतात. या साऱ्याला तोंड देतच पुढची वाट काढायची.
अंजनेरीच्या या पठारावर ऐतिहासिक बांधकामांचे काही अवशेष दिसतात. बहुतेक सारी जोती! या साऱ्यातच मधोमध अंजनीमातेचे मंदिर आहे. या मंदिराच्या पुढय़ातच पाण्याचे टाके. पण ऐन पावसाळ्यातही त्याने पाण्याची साथ सोडलेली. मूळ मंदिर आजही व्यवस्थित आणि ऐसपैस! गडावर मुक्काम करण्यासाठी तर उत्तम! आतमध्ये अंजनी मातेची मूर्ती आणि तिच्या पुढय़ात नतमस्तक झालेला बालहनुमान!
अंजनी मातेच्या या मंदिरानंतर बालेकिल्ल्याच्या दिशेने निघताच सपाटी जाऊन झाडी सुरू होते. पावसाळय़ात झाडांबरोबरच ढगही गर्दी करू पाहतात. ढगांच्या या दाटीतून पुढे सरकत असतानाच असंख्य रानफुलेही लक्ष वेधून घेऊ लागतात. सोनकी, कवल्या, नागफणी आदी पावसाळी रानफुलांचा हा बहर. यातील जागोजागी फुललेल्या पांढऱ्या – जांभळ्या रंगातील नागफणीच्या फुलांनी तर जणू आकाशीचे चांदणेच खाली उतरल्यासारखे वाटत होते.
ढग आणि रानफुलांनी धुंद झालेली ही वाट बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी येते. वाटेत विस्तिर्ण असे हनुमान तळे लागते. ढग-रानफुलांनी त्यालाही सौंदर्य बहाल केलेले असते. त्याच्या काठावर अनेक ऐतिहासिक घरांची जोतीही दिसतात. या बांधकामासाठी वापरलेल्या चुन्याच्या घाणीचे चाकही इथे पडलेले आहे.
इथे पायथ्याशी एक छोटासा अध्यात्मिक मठ कार्यरत आहे. अनेक वृक्षवेलींच्या छायेतील हा आश्रम, सारवलेले अंगण-प्रांगण, भगव्या वस्त्रातील शिष्यगणांची धावपळ, गाय -वासरांची धांदल हे सारेच चित्र मन प्रसन्न करत असते. या आश्रमामागेच अंजनेरीवरील आणखी एक नवल दडले आहे- सीता गुंफा!
कातळात खोदलेले हे लेणे. प्रवेशद्वाराच्या बाजूस द्वारपालाच्या भूमिकेत एक कुटुंब. छोटय़ाशा या लेण्यात राम, लक्ष्मण, हनुमान, भैरव, महिषासुरमर्दिनी आदी देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. परंतु या शिल्पांचा कलात्मक दर्जा पाहता ती नंतरच्या कालखंडात कोरलेली असावीत असे वाटते. अंजनीमातेने याच गुहेत हनुमानाला जन्म दिला अशी श्रद्धा आहे. मग एखादी स्थानिक व्यक्ती इथेच आपल्याला ती हनुमान जन्माची कथा ऐकवते आणि मग या इतिहास-भूगोलाला पुराणाचीही जोड मिळते.
अंजनेरी किल्ल्यातील हे दुसरे प्राचीन खोदकाम पाहिल्यावर त्याच्या इतिहासाबद्दलची उत्सुकता आणखी वाढते. अभ्यासकांच्या मते राष्ट्रकूट – चालुक्यांच्या काळापासून हा गड नांदता असावा. या भागात राज्य करणाऱ्या गवळी राजांची ही राजधानी होती. ही गोष्ट साधारण दीड हजार वर्षांपूर्वीची. त्यांच्या वीरसेन अभीर नावाच्या राजाचा उल्लेखएका शिलालेखात येतो. याशिवाय अंजनेरी परिसरात मिळालेल्या दोन ताम्रपटातही या परिसरात, किल्ल्यावर इसवीसन ७१० मध्ये हरिश्चंद्रवंशीय घराणे राज्य करत होते याचे उल्लेख आले आहेत. पुढे मुस्लीम सत्तांच्या काळातही अंजनेरीचे उल्लेख येतात. शिवकाळात मोरोपंत िपगळे यांनी इसवीसन १६७० मध्ये त्रिंबकगडाबरोबर अंजनेरीही जिंकल्याचा इतिहास आहे.
अंजनेरीची उंची, त्याला मिळालेल्या विशाल सपाटीमुळे पुढे हा गड हवापालटासाठी, उन्हाळी सुटीत राहण्यासाठीही वापरल्याचे दिसते. पेशवाईत राघोबादादा पेशवे यांनी गडावरील या मुक्कामासाठी एक वाडाच बांधला होता. मराठय़ांनंतर इंग्रज अधिकारीही गडावर राहण्यासाठी येत होते.
गडाचा हा इतिहास लक्षात ठेवत गडाच्या बालेकिल्ल्यावर स्वार व्हावे. पुन्हा ती खडी चढाई. बालेकिल्ला म्हणजे आणखी एक पठार. वर मध्यभागी खालच्याप्रमाणेच अंजनीमातेचे मंदिर. इथली मूर्ती मात्र पाहण्यासारखी. अंजनीमातेच्या मांडीवर तो बालहनुमान बसला आहे. हनुमानाचे हे असे रूप सहसा कुठे पाहण्यास मिळणार नाही.
या सर्वोच्च माथ्यावरून फिरू लागलो, की दूरदूरवरचा प्रदेश नजरेत येतो. आगे्नयेस रांजणगिरी, भंडारदुर्ग, हरिहर, घरगड किंवा गडगडा दुर्ग, पश्चिमेला बलंदड ब्रह्मगिरीचा तो त्र्यंबकगड, त्याच्या पुढय़ातील ते तीर्थक्षेत्राचे त्र्यंबक गाव, उत्तरेला गोदावरीचे रम्य खोरे, पूर्वेला तळात छोटेसे अंजनेरी गाव. पाऊसकाळी आता दिसणारे हे चित्र पुन्हा थोडय़ावेळात ढगाआड होऊ लागते. ढगांचा हा पदर एकेका गिरिशिखराला पोटात घेत आपल्यांपर्यंतही पोहोचतो आणि मग क्षणार्धात सारेच हरवून जाते.
सकाळचे ते स्वच्छ आकाशाच्या निळाईत पाहिलेले अंजनेरीचे रूप खरे, की आताचे हे लुप्त होणारे, हरवणारे..निसर्गाचे हे थोरपणच त्या दाट धुक्याच्या पदराखाली घट्ट होऊन मनी ठसते.

Radhakrishna Vikhe criticize Municipal Corporation on issue of water usage and recycling
जलसंपदामंत्र्यांच्या नाशिक महापालिकेला कानपिचक्या; पाणी वापर, पुनर्वापराचा मुद्दा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
nashik on monday 19 year old girl assaulted at Anant Kanhere Maidan
नाशिक-पुणे मार्गावर पिस्तूलचा धाक दाखवत लूट, सहा लाखांची औषधे पळवली
name of a Bangladeshi was found in the voter list of Narayangaon Gram Panchayat
नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथे पकडलेल्या ३ जणांनी काढले होते नारायणगाव येथे आधारकार्ड
thieve with koyta roaming arround in New Nashik
नवीन नाशिकमध्ये कोयताधारींचा धुडगूस
mhada nashik lottery
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी मार्चमध्ये सोडत, २० टक्के योजनेतील घरांसाठी दोन ते तीन दिवसांत जाहिरात
nashik Crowd management preparations for Kumbh Mela are based on Ramani Commissions reports
नाशिकच्या कुंभमेळ्यातील गर्दी व्यवस्थापनासाठी रमणी अहवालाचा आधार
nashik gas leakage latest news in marathi
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
Story img Loader