अन्नपूर्णा हे जगातील सर्वोच्च असे दहाव्या क्रमांकाचे शिखर! उंची ८०९१ मीटर! गिर्यारोहणाच्या दृष्टीने अत्यंत अवघड मानले जाणारे. नेपाळमधील ही देवभूमी. या शिखराच्या तळावर जायचे आणि त्या देवतेचे दर्शन घ्यायचे हा अनेक भटक्यांचा आवडता ट्रेक! या शिखराचा, त्याच्या भवतालाचा वेध डॉ. संदीप श्रोत्री यांनी घेत त्यावर ‘साद अन्नपूर्णेची’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे येत्या रविवारी (दि. १३ जुल) महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड, मुंबई येथे गिरिमित्र संमेलनामध्ये प्रकाशन होत आहे.
भन्नाट जैवविविधतेने नटलेले घनदाट जंगल! हिमालयातील सुंदर पक्षिवैभव, कस्तुरीमृगापासून ते हिमबिबटय़ापर्यंत सर्व प्राणिसृष्टीचे निर्भय वास्तव्य,
खोल दरीतून वाहणारी ‘मोदी खोला’ नावाची नदी, तिच्या काठाने वसलेली छोटी रमणीय गावे, त्यामध्ये राहणारी गुरुंग आणि मगर जातीची हिंदू लोकसंस्कृती आणि डोंगरउतारावर त्यांनी केलेली पायऱ्या-पायऱ्यांची शेती आणि मागे गगनाला गवसणी घालणारी हिमशिखरे.
हे वर्णन आहे अन्नपूर्णा खोऱ्याचे! हिमालयातील सर्वात उंच अशा महालंगूर रांगेमध्ये ही अन्नपूर्णेची शिखरे वसली आहेत. ज्यातच एक आहे जगातील सर्वोच्च अशा दहाव्या क्रमांकाचे. उंची ८०९१ मीटर! गिर्यारोहणाच्या दृष्टीने अत्यंत अवघड मानले जाणारे शिखर. नेपाळमधील ही देवभूमी. या शिखराच्या तळावर जायचे आणि त्या देवतेचे दर्शन घ्यायचे हा अनेक भटक्यांचा आवडता ट्रेक! ४२३० मीटर उंचीवरचा हाच तळ गाठण्यासाठी आम्हीही निघालो होतो.
इथे जाण्यासाठी आमचा हा प्रवास काठमांडू-पोखरामार्गे सुरू झाला. पोखरामधून अन्नपूर्णा शिखरांच्या दक्षिणेकडील पायथ्याला जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. फेदी (लांद्रूक माग्रे), नयापूल (साउली बझार माग्रे) आणि नयापूल (घोडेपानी-पुनहिल माग्रे) आपण या जगातील नितांत सुंदर ‘शान्ग्रीला’ मध्ये जाऊ शकतो. तीनही मार्ग ‘चोमरोंग’ या गावामध्ये एकत्र येतात. तिथून मात्र मत्स्यपुच्छ पर्वताच्या पायथ्याशी स्पर्श करीत ‘अन्नपूर्णे’च्या दर्शनाला जावे लागते.
आम्ही २२ एप्रिलला ‘फेदी’ गावापासून चालायला सुरुवात केली. ‘डाम्फुस’ गावी आमचा मुक्काम होता. या गावातून पहाटे अन्नपूर्णा आणि मत्स्यपुच्छ शिखरांचे दर्शन खूप विलोभनीय होते. डाम्फुस ते लांद्रूक हा दुसरा टप्पा तब्बल २० किलोमीटरचा होता. चढउतार नाही, सदाहरित जंगल आणि रुंद पायवाट यामुळे आम्ही निवांत चालत होतो, पण तोल्का गावापर्यंत आलो आणि हवा बदलली, काळे ढग जमा झाले. भन्नाट वारा आणि ढगाच्या गर्जना सुरू झाल्या. आम्ही सावधपणे लांद्रूक गावी मुक्कामी आलो. तिसरा दिवस आमचा फक्त पायऱ्या मोजत उतरण्याचा आणि चढण्याचा होता. पण त्यामध्ये विरंगुळा म्हणून अनेक रंगाचे पक्षी दिसले. वाटेतच ‘जिन्हू दांडा’ गावी गरम पाण्याचे कुंड आहे. आजचा मुक्काम चोमरोंगला होता. उंची २१७० मीटर! जणू एका खोलगट बशीमध्ये वसलेले हे गाव! येथे गिरिभ्रमरांची गर्दी उसळलेली होती. पुढचा दिवस उगवला तो सुवर्णकांतीने उजळलेले अन्नपूर्णेचे दक्षिण शिखर दाखवत. छत्रपतींचा जयघोष करीत आम्ही बाहेर पडलो. पायऱ्या आमचा पिच्छा सोडत नव्हत्या, समोरच दिसणारे सिनुवा गाव अगदी हाकेच्या अंतरावर असले, तरी आम्हाला २६० मीटर खाली उतरून पुन्हा ३७० मीटर चढायचे होते. मागे वळून बघितले तर चोमरोंग, घान्द्रूक गाव दिसत होते.
अन्नपूर्णा राखीव जंगलाचा गाभा म्हणजे संरक्षित क्षेत्र सुरू झाले होते. ऱ्होडोडेण्ड्रोन आणि पाईन वृक्षांचे दाट जंगल होते. दुतर्फा बांबू होते. ऱ्होडोडेण्ड्रोन आणि इतर झाडांच्या फांद्यांवर मॉस, लायकेन अक्षरश लोंबत होती. विविध ऑर्कीडची फुले झाडांच्या बुंध्याला लटकलेली होती. डोबान मुक्कामी पोहोचलो. पोहोचताच कस्तुरीमृग आणि दुर्मिळ सिरो प्राण्याचे दर्शन झाले.
पाचव्या दिवशी आम्हाला देऊराली गाठायचे होते. उंची ३२३० मीटर. वाटेत पुन्हा जंगल लागले. या वाटेवरच वराह देवतेचे मंदिरही दिसते. एका ठिकाणी एक महाप्रचंड पाषाणाखालून पायवाट जाते. तिला ‘िहकू गुंफा’ म्हणतात. हा सारा मार्ग धोकादायक, केव्हाही कोसळू पाहणाऱ्या दरडीतून जाणारा. तो आम्ही सावधपणे पार केला. आता शेवटचा टप्पा. ‘अन्नपूर्णा बेस कॅम्प’पर्यंत म्हणजेच ४१३० मीटपर्यंत पोहोचायचे होते. थोडे अंतर गेल्यावरच पहिले पाऊल पडले ते हिमनदीवरच. दोन्ही हातात काठय़ा, डोळ्याला काळे गॉगल, अंगावर पोंचू अशा अवतारात आमची गाडी त्या पांढऱ्याशुभ्र समुद्रातून निघाली.
‘व्हाइट आउट’ झाले होते. थोडय़ा वेळात हिमवृष्टी सुरू झाली. संपूर्ण बर्फमय अशा त्या दरीमध्ये उंचीवर एक निळ्या छपराची इमारत दिसत होती. तोच आमचा शेवटचा सर्वोच्च थांबा होता. दुपारी साडेतीन वाजता आम्ही सर्व जण त्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचलो. बाहेर हिमवृष्टी सुरू होती. काहीही दिसत नव्हते. आम्ही जेवण घेतले आणि ‘स्लीिपग बॅग’मध्ये झोपून गेलो.
२८ एप्रिलची पहाट उजाडली. हिमवृष्टी थांबली होती. वातावरण स्वच्छ झाले होते. पहाटे साडेतीन वाजताच मी त्या पवित्र ठिकाणी, त्या देवतेच्या म्हणजेच ‘अन्नपूर्णा’च्या पुढय़ात उभा राहिलो. भारलेल्या अवस्थेमध्ये. ..हिमवृष्टीत बुडणारे पाय, तापमान शून्याखाली दहा अंश. मंद वारा आणि संपूर्ण शांतता. आसपास सगळीकडे बर्फाचेच साम्राज्य होते. निरभ्र आकाशात ग्रह-ताऱ्यांचा सडा पडला होता. मागे माशाच्या शेपटीचा आकार असलेले ‘मत्स्यपुच्छ’ (फिशटेल) शिखर आकाशात घुसलेले आणि माझ्यासमोर साक्षात अन्नपूर्णा माता उभी होती. मी तिच्या मंदिरात, अगदी गाभाऱ्यात होतो. तिची ती अतिविशाल ‘हिममूर्ती’ निव्वळ ताऱ्यांच्या प्रकाशात आपल्या शुभ्रधवल हिमवस्त्रांमुळे त्याही क्षणी तेजस्वी दिसत होती. तिचा उजवीकडील एक बाहू दक्षिण अन्नपूर्णा. मागे उजवा दुसरा हात निलगिरी पर्वतांच्या तीन शिखरांच्या रूपात. डावा खालचा हात ‘टेंट’ शिखरावरून थेट आमच्या मागे मत्स्यपुच्छ शिखरापर्यंत आलेला आणि डावा अजस्त्र बाहू गंगापूर्णा, अन्नपूर्णा तीन, चार आणि दोन या अतिउंचीच्या शिखरांवरून दूरवर पसरलेला.
..सभोवताली असीम शांतता आणि पुढय़ात ही अतिभव्य धवलता. थोडय़ाच वेळात भास्कराचे ते दूतही या अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेण्यासाठी धावत आले. तेज आणि पृथ्वी या दोन पंचमहाभूतांच्या मिलनातून तो रंगांचा सोहळा रंगला आणि तो पाहत मी देखील ईश्वर लीन झालो.