पावसाळा सुरू झाला, की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रानफुलांचा बहर सुरू होतो. यांचा शोध घेत अनेक भटक्यांची पावले रानवाटा हिंडू लागतात. यंदा या रानफुलांमध्ये काही ठिकाणी टोपली कारवीची भर पडली आहे. अंबोली परिसरात यंदा फुललेल्या या निळय़ा-जांभळय़ा फुलांच्या वाटांवरची भटकंती.
ठिकठिकाणची पानं-फुलं ही निसर्गप्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय असतात. पण जेव्हा एखाद्या वनस्पतीच्या फुलण्याला निसर्गचक्राचे गणित असेल, तर त्या वेळी हा केवळ कौतुकाचाच विषय नाही, तर तो अभ्यासाचाही विषय ठरतो. अशी वनस्पती बघायला मग पर्यटकांचीही रीघ लागते. सध्या अंबोलीच्या पठारावर अशीच एक वनस्पती मोठय़ा प्रमाणात फुलली आहे. निळय़ा-जांभळय़ा रंगातील हा बहर पाहण्यासाठी पर्यटकांपासून ते अभ्यासकांपर्यंत अनेकांचे पाय या भागाला लागत आहेत. सृष्टीचे हे विलोभनीय दृश्य महाराष्ट्रातील पर्यटकांचा आकर्षणबिंदू ठरला आहे.
अंबोली महाराष्ट्राचे थंड हवेचे ठिकाण. कोल्हापूरपासून साधारण १२० किलोमीटर तर कोकणातील सावंतवाडीहून ३० किलोमीटरवर हे निसर्गरम्य स्थळ. या परिसरात खूप पाऊस पडतो. महाराष्ट्रातील एक चांगले जंगल या परिसरात वसलेले आहे. अशा या अंबोली परिसरात यापूर्वी २००० साली ही टोपली कारवी मोठय़ा प्रमाणात फुलली होती. पुढे २००७ मध्ये ती काही प्रमाणात फुलली होती. पण त्या वेळी म्हणावा असा बहर नव्हता. यामुळे अभ्यासकांची थोडीशी निराशा झाली होती. पण यंदा २०१५ साली या वनस्पतीने पुन्हा अंबोलीला निळे-जांभळे करून टाकले आहे. सध्या या परिसरातील नांगरतास धबधब्याच्या समोरील डोंगर, कावळेसाद पॉइंट समोरचा डोंगर या कारवीने फुलला आहे. आता काही दिवसातच चौकुळचे पठारही फुलून जाईल. हे सारे पाहण्यासाठी वनस्पती अभ्यासकांपासून ते पर्यटकांपर्यंत अनेकांची पावले आता अंबोलीकडे वळत आहेत.
सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील वनसंपदेत कारवी ही एक महत्त्वाची वनस्पती. साऱ्या डोंगरांना आच्छादन घालण्याचे काम ही कारवी करते. हिच्या अनेक प्रजाती आहेत. यातील टोपली कारवीचा बहर सध्या अंबोलीच्या पठारावर मोठय़ा प्रमाणात फुललाय. टोपली किंवा माळ किंवा बकरा अशी या कारवीची विविध नावे. प्रामुख्याने ती पश्चिम घाटमाथ्यालगत सर्वत्र डोंगरउतारावर, पठारावर दाटीने उगवते. या कारवीच्या अनेक प्रजाती आहेत त्यांच्या बहराचा कालावधीही वेगवेगळे आहेत. प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ रीची व तालबोट यांनी या टोपली कारवीवर संशोधन केले असून ती दर सात वर्षांनी फुलते अशी नोंद केली आहे.
कारवीचे हे झाड जमिनीलगत एखाद्या झुडपाप्रमाणे वाढते. या वनस्पतीच्या फांद्या या मुळाच्या गड्डय़ातून सरळ, ताठ व उपशाखा विरहित, घुमटासारख्या आकाराने वाढतात. यामुळे या वनस्पतीचा आकार एखाद्या पालथ्या टोपलीसारखा दिसतो. म्हणून काही भागात या वनस्पतीला ‘टोपली कारवी’ असे संबोधतात. उघडय़ा उतारावरील माळावर ही वनस्पती उगवत असल्यामुळे तिला काही ठिकाणी ‘माळ कारवी’ अशाही नावाने ओळखले जाते.
या वनस्पतीला पावसाळय़ाच्या सुरुवातीला अथवा मृग नक्षत्रात नवी पालवी येते आणि ती खाण्यासाठी बकऱ्याची झुंबड उडते. कदाचित बकऱ्यांचे आवडते खाद्य असल्यामुळे किंवा पठारावरील या झुडुपांचा आकार चरणाऱ्या बकऱ्यांसारखा दिसत असल्याने यातून या वनस्पतीला ‘बकरा’ हेही नाव दिले गेले आहे.
अंबोली-चौकूळ परिसरातील बहुसंख्य गुराखी पावसाळ्यात गोठय़ामध्ये गाई-म्हशींच्या अंगाखाली अंथरण्यासाठी या वनस्पतीचा वापर करतात. याचे कारण म्हणजे खड्डे पडलेल्या जागेत आणि पावसामुळे ओल असलेल्या गोठय़ात ही वनस्पती अंथरल्याने मलमूत्र साचलेल्या खड्डय़ांमधून जंतूसंसर्ग टाळता येतो आणि गुरांना या वनस्पतीची ऊब मिळते. दुसरे असे, की या वनस्पतींवरच गाई-म्हशींचे मलमूत्र मिसळते. यातून मग चांगले सेंद्रिय खत या शेतक ऱ्यांना उपलब्ध होते. या वनस्पतीला पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारी कोवळी पालवी शेळय़ा, गाई, म्हशींचे मुख्य खाद्य आहे.
पर्यावरणदृष्टय़ा ही वनस्पती महत्त्वाची आहे. या वनस्पतीची मुळे जमिनीत खोल कंदासारखी पसरलेली असतात आणि एकमेकांजवळ दाटीवाटीने उगवत असल्याने उतारावरील मातीची धूप कारवीमुळे रोखली जाते. यामुळे पर्यावरणामध्ये कारवीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मध्यंतरी या वनस्पतीपासून नैसर्गिक रंग निर्मितीकरता प्रयत्न झाले होते, पण सुकल्यानंतर ही वनस्पती वजनाला हलकी असल्यामुळे आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानांकनात फारच कमी प्रतवारी आल्यामुळे ही वनस्पती आर्थिक स्तरावर मागे राहिली.
कारवी फुलली, की सारे डोंगर निळे-जांभळे दिसतात. हे दृश्य अवर्णनीय असते. कारवीच्या या फुलांवर विविध प्रकारचे कीटक, फुलपाखरे, मधमाशा रुंजी घालताना दिसतात. कीटक असल्यामुळे अनेक कीटकभक्षी प्राणी व पक्षीही इथे दिसण्याची शक्यता असते. याचबरोबरीने या फुलोऱ्याच्या माळावर जमिनीत उगवणारी ऑर्किड, वार्षिक-द्वैवार्षिक उगवणाऱ्या वनस्पतींच्या फुलांचे ताटवे पाहण्याचीही संधीही मिळू शकते. सध्या अंबोली परिसरातील डोंगर या निळय़ा-जांभळ्या कारवीच्या फुलांनी बहरून गेले आहेत. या लाटा डोंगरदऱ्या भटकणाऱ्यांना वेगळय़ा जगात घेऊन जात आहेत.
ल्ल डॉ. बाळकृष्ण गावडे