सह्याद्रीतील अनेक डोंगर सुळक्यांना नवरा, नवरी, वऱ्हाड अशी नावे आहेत. हे सुळके गिर्यारोहकांना सतत आव्हान देत असतात. पुणे जिल्ह्य़ातील लोणावळय़ाजवळील भांबुर्डे गावाला खेटून असलेले असेच काही सुळके अनेक दिवस आम्हाला खुणावत होते. मग एके दिवशी आम्ही सहा मित्र तयारीनिशी या डोंगररांगेच्या पायथ्याशी दाखल झालो.
‘बाण हायकर्स’च्या या मोहिमेत माझ्यासह लक्ष्मण होळकर, विश्राम मरगज, सोनाली होळकर, केदार बनसोडे आणि स्वाती सावे असे आम्ही ६ जण सहभागी झाले होतो. भांबुडर्य़ाच्या या डोंगररांगेत नवरी, नवरा आणि करवली हे तीन सुळके आहेत. या नावांना साजेशीच त्यांची देहयष्टी. राकट देहाचा मधोमध ‘नवरा’, त्याच्या डाव्या बाजूला नाजूक ‘नवरी’ तर उजवीकडे लहान मुलगी वाटावी अशी ‘करवली’. यातील ‘नवरा’च्या शिखराचा वेध आम्ही घेणार होतो. साधारण ६०० फूट उंचीचा हा मूळ डोंगर. तो चढून गेल्यावर त्याच्या डोक्यावर ही सुळक्यांची रचना. यातील ‘नवऱ्या’ची उंची २०० फूट. पण ती गाठतानाही सुरुवातीला घसरडी माती, मग कातळाचा भाग, मग पुन्हा मातीचा घसारा आणि त्यावर हा सुळका. अशी ही विचित्र रचना होती. कुठल्याही चढाईत अशी कातळ आणि मातीच्या घसाऱ्याची सरमिसळ रचना आली तर चढाई खूप अवघड होते. चढाईचे दोर बांधणे अवघड जाते. अँकर्स मिळत नाहीत. अपघाताचा धोका संभवतो. आम्ही यातून मार्गक्रमण करत कातळाचा आधार घेत वर जायला सुरुवात केली. हात-पाय ठेवू तिथून माती निसटू लागली. दगड अंगावर येऊ लागले. काही ठिकाणी या भुसभुशीत मातीत हात-पाय आत जात होते. अखेर एका ठिकाणी दोर बांधण्यासाठी जागा मिळाली आणि आमचा वर जाण्याचा मार्ग तयार झाला. मग या घसरडय़ा भागातून मार्ग काढत आम्ही पुन्हा कातळावर आलो. आता प्रस्तरारोहणाचा खरा थरार सुरू झाला. शंभर फुटांची ही उर्वरित चढाई होती. मी आणि लक्ष्मणने दोर बांधत ती कातळ चढाई सुरू केली. खालून खुणावणाऱ्या त्या ‘नवऱ्या’च्या अंगावर हात-पाय रोवत आम्ही शिरोभागाकडे जाऊ लागलो. काही वेळातच आमच्या दोघांचीही पावले या नवरदेवाच्या माथ्यावर पडली आणि आमच्या नोंदीत आणखी एक शिखर जमा झाले.
ल्ल दिवाकर साटम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा