ट्रेकिंग, गिर्यारोहण, गिरिभ्रमण, आऊटिंग, नेचर ट्रेल..अशी नावे जरी उच्चारली तरी ट्रॅकसूट, बूट, हॅट असा जामानिमा केलेली आणि सॅक, दोर, तंबू असा पाठीवरचा संसार घेऊन डोंगरदऱ्या तुडवणारी जमात डोळय़ांपुढे येते. शहरांच्या गल्लीनाक्यावरून, स्टेशनच्या फलाटावरून आणि अगदी डोंगरपायथ्याच्या एखाद्या गावातून ही फिरस्ती जमात चालू-फिरू लागली, की पाहणाऱ्या प्रत्येकाचेच लक्ष वेधून घेते. त्यांचे ते निराळे कपडे, पाठीवरच्या ओझी बाळगलेल्या सॅक आणि जणू युद्धाला निघाल्याप्रमाणे खांद्यावर अडकवलेले ते दोर, या साऱ्यांबाबत पाहणाऱ्या प्रत्येकालाच कमालीचे कुतूहल असते. कुणी या साऱ्याला डोळय़ांत साठवते, कुणी त्या दोरांना स्पर्श करू पाहते, तर कुणी ही हौस आणि वेड पांघरत या साधन-साहित्य विश्वात शिरू लागते. भटक्यांचे हे सारे विश्व आणि त्याचा हा संसारच निराळा. खडतर वाटांवर आणि अवघड जागांवर चालणारा, मदत करणारा, सांभाळून घेणारा. अशा या संसारातील हे कपडे, बूट, टोप्या, सॅक, तंबू, दोर आणि अन्य तांत्रिक साधने असतात तरी कशी, त्यांचा उपयोग काय, ती वापरायची कशी या साऱ्यांचीच माहिती या ‘बॅकपॅक’मधून आपल्या भेटीला. अगदी त्यांच्या कि मतीपासून ते दिमतीपर्यंत!
फिरस्ता
‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email – abhijit.belhekar@expressindia.com