शुक्रवारी (दि. ८) जागतिक महिलादिन साजरा होत आहे. वेगवेगळी क्षेत्रे काबीज करणाऱ्या महिलांना गिर्यारोहणाचा प्रांतही आता नवा नाही. किंबहुना धाडसाच्या, आव्हान पेलण्याच्या या वाटेवर काही महिलांनी पुरुषांच्याही पुढे एक पाऊल टाकल्याची काही उदाहरणे दिसून येत आहेत. महिलांच्या याच साहसवाटांचा आढावा घेणारा हा लेख
खरंतर लेखाचे शीर्षक मी देणार होते ‘गिर्यारोहण आणि महिला.’ त्याचं कारण की या दोन्हीत बराच अंतराय होता. एकूणच भारतीय पुरुषांच्या प्रांतातही ते अंतर नक्कीच आहे. मग स्त्रियांच्या मध्ये असेल तर त्यात काय नवल! अध्यात्माच्या क्षेत्रात हिमालयातील भ्रमंतीची प्राचीन परंपरा आहे. पण क्रीडा म्हणून गिर्यारोहणाचा स्वीकार अजूनही मोठय़ा प्रमाणात आपल्याकडे झालेला नाही. त्यापुढे जाऊन मी म्हणेन की गिर्यारोहण, गिरिभ्रमंतीही एक जीवनशैलीच आहे. पाश्चात्त्यांनी या जीवनशैलीचं अनुसरण फार पूर्वीपासून म्हणजे १८ व्या शतकापासून केले. भारतामध्ये त्याची ओळख १९५३ साली झाली. निमित्त होतं ते हिलरी आणि तेनसिंग यांनी केलेली सर्वोच्च शिखर ‘एव्हरेस्ट’ची चढाई. यानंतर १९६५ साली भारतीयांची पहिली एव्हरेस्ट मोहीम यशस्वी झाली आणि त्यानंतर तब्बल १९ वर्षांनी म्हणजे १९८४ साली भारतीय महिलांसाठी इंडियन माऊंटिनियरिंग फाऊंडेशननं (आयएमएफ)आयोजित केलेल्या एव्हरेस्ट मोहिमेत बच्चंद्री पाल हिनं भारतीय महिला गिर्यारोहकांचा झेंडा एव्हरेस्टवर रोवला.
ज्या प्रमाणात पुरुषांच्या बरोबरीनं इतर क्षेत्रात स्त्रिया उतरल्या, यशस्वी झाल्या त्या तुलनेत गिर्यारोहण क्षेत्रांत एकूणच भारतीयांचं, त्यातही स्त्रियांचे प्रमाण अल्पच राहिले. थरच्या वाळवंटात सुचेता कडेठाणकरनं जाऊन नवीन पायवाट घातली. शीतल महाजननं पॅराजंपिंग क्षेत्रात वाऱ्यासारखी भरारी घेतली. गिर्यारोहण, साहसी क्रीडा क्षेत्रांतही एव्हरेस्टवर बच्चंद्री पाल हिनं झेंडा रोवला. त्यानंतर पुन्हा २५ वर्षांनी सैन्यदलांतील मेजर आश्विनी आणि त्यांच्या मागोमाग अवघ्या १९ वर्षांच्या कृष्णा पाटील या दोन मराठी महिलांनी महाराष्ट्रातील ‘महिलांचं’ अपूर्व असं प्रतिनिधित्व केलं.
या क्षेत्रांत महिला कमी का? तर गिर्यारोहणात निसर्गाची प्रतिकूलता असते. अत्यंत शारीरिक कष्ट असतात, या क्रीडाप्रकारासाठी खर्चही भरपूर लागतो. या क्रीडेसाठी खूप वेळ द्यायला लागतो आणि या क्रीडेमध्ये जीवाची जोखीमही असते. म्हणजे अतिउंचीवर तुम्ही जीवन-मृत्यूच्या अंधुक सीमारेषेवरच वावरत असता. हा असा क्रीडाप्रकार आहे की तुम्हाला त्यांत पूर्णपणे झोकून द्यायला लागतं. आयुष्यातील काही वर्षांमधला बराच काळ यासाठी दिला तरच मोठय़ा मोहिमा तुम्ही यशस्वी करू शकता. तुमचं वय लहान असेल, तुम्हाला संसार, मुलंबाळं असं व्यवधान नसेल तर तुम्ही हे करू शकता. पण संसारात पडलांत की प्राधान्यक्रम बदलतो, तुमच्या निष्ठांना फाटे फुटतात. लग्नाआधी जेव्हा मी एकटी गिर्यारोहण करायची तेव्हा मी त्यात पूर्ण झोकून दिलं होतं. पण लग्नानंतर आणि विशेषत: मुलं घरी ठेवून तुम्ही गिर्यारोहणाला जाता तेव्हा तुम्ही स्वत:ला झोकून देऊ शकत नाही. मुंबईच्या ललिता पाटील या अत्यंत धडाडीच्या क्रीडापटू आणि गिर्यारोहक. त्यांनी महाराष्ट्रातील पहिली महिलांची गिर्यारोहण संस्था १९७३ साली स्थापन केली. त्यावेळी ती विनापाश होती. संसाराचं व्यवधान तिच्यामागे नव्हतं. त्यामुळे आयुष्यातील महत्त्वाची वर्षे म्हणजे ३५ व्या वर्षांपासूनची २५ वर्षे तिनं ही महिलांची गिर्यारोहण संस्था कार्यरत ठेवली. बऱ्याच मोहिमा या संस्थेतर्फे तिनं आखल्या. १९७५ च्या सुमारास आमच्या समकालिन उत्तरकाशीची चंद्रप्रभा ऐतवाल ही कुशल गिर्यारोहक होती. आयएमएफ आयोजित बऱ्याच मोहिमेत तिचा सहभाग होता. १९८४ च्या भारतीय महिलांच्या मोहिमेतही तिचा समावेश होता. गिर्यारोहणाच्या क्षेत्राला वाहून घेतल्यामुळे तिनं स्वत:चा संसार मांडला नाही. ठाण्याची विजया गद्रे ही मुंबईच्या महिला गिर्यारोहण संस्थेची सेक्रेटरी होती. गिर्यारोहणासाठी तिनंही संसाराचं बंधन स्वीकारलं नाही. के. सरस्वती हीही मुंबईची महिला, अनुभवी गिर्यारोहक पण तिनंही आपल्या आवडीआड येणारा संसार नको ही भूमिका घेतली.
तरुणपणीची, उमेदीची काही वर्षे या छंदासाठी देणारी जोडपी आपल्याकडे अभावानेच आहेत. लग्न आणि त्यानंतर मुलं-संसार हे भारतीय मनोवृत्तीत रूजलेलं आहे. पाश्चात्त्यांची विचारसरणी, मनोभूमिका आपल्यापेक्षा पूर्ण वेगळी आहे. ‘मेरी होये’, ‘गर्लिन्डे काल्टेनब्रूनर’ या स्त्रियांनी सुरुवातीला एकटे राहणे पसंत केले. ‘मेरी होये’चा मृत्यू पर्वतांतील एका धोक्याच्या जागी कमरेचा संरक्षक पट्टा निसटून झाला. गर्लिन्डे या ऑस्ट्रियाच्या अत्यंत कुशल गिर्यारोहिकेनं एक भीमपराक्रम केला. जगांतील १४ सर्वोच्च म्हणजे ८ हजार मीटर उंचीची शिखरे ती शेर्पाच्या मदतीशिवाय आणि कृत्रिम ऑक्सिजन न घेता चढून गेली. ते साल होत २०११. त्यावेळी ती ४१ वर्षांची होती. तिनं आपला गिर्यारोहक मित्र राल्फशी २००७ साली लग्न केलं. पण मुलाबाळांचा व्याप नको हे तिनं ठरवूनच ठेवलं होतं. स्पेनची महिला ‘एदुर्नी पासाबान’हीचाही पराक्रम विलक्षण आहे. २०१० साली जगातील सर्वोच्च १४ शिखरं चढून जाणारी ती पहिली महिला ठरली. त्यावेळी तिचं वय होतं ३७ वर्षे. (एदुर्नीनं कृत्रिम ऑक्सिजन आणि शेर्पा यांची मदत घेतली होती. पण गर्लेन्डे स्वबळावर चढली हे तिचं वेगळेपण होतं.)
१९८४ साली बच्चंद्री पाल ही एव्हरेस्ट चढणारी जगातली पाचवी महिला ठरली. त्यावेळी ती २९ वर्षांची होती. बच्चंद्री ही ‘उत्तराखंड’मधील एका खेडेगावातील शेतकऱ्यांची मुलगी. तिला शिक्षणाची आवड होती. त्यामुळे शिकली. तिला साहसी खेळाची आवड होती. रायफल शूटिंगमध्ये तिनं प्रावीण्य मिळवलं होतं. ती धाडसी होती. १२ व्या वर्षी गावाजवळच अवघड शिखर मैत्रिणीबरोबर चढली पण तोवर रात्र झाली. त्यामुळे शिखरावरच रात्र काढण्याचं धाडस तिनं दाखवलं. गिर्यारोहणाचं तिनं प्रशिक्षण घेतलं. आयएमएफच्या एव्हरेस्ट मोहिमेमुळे तिला संधी मिळाली. एव्हरेस्ट चढणारी ती पहिली भारतीय महिला म्हणून टाटा स्टील कंपनीनं तिला नोकरीत उच्च पद दिलं. क्रीडा अधिकारी म्हणून ती तिथे उत्तम कामगिरी करीत आहे. गिर्यारोहण छंदाची वाढ करण्यात तिचा फार मोठ्ठा वाटा आहे. पण तिनंही संसाराचं बंधन घालून घेतलं नाही. मात्र पर्वतांत मार्गदर्शक म्हणून येणाऱ्या अनेक गरजू लोकांच्या मुलांना तिनं स्वत:कडे ठेवून त्यांचं शिक्षण केलं. त्यांचा भविष्यकाळ घडविला. संन्तोष यादव या आयटीबीपीत ऑफिसर असलेल्या तरुणीनं एव्हरेस्ट शिखर दोनदा चढण्याचा विक्रम केला. आता लग्न करून ती माताही झाली आहे. आणि प्रवासी संस्था चालवते.
आणखी एक विलक्षण हकीगत अशी की २० मे २०११ या दिवशी प्रेमलता आग्रवाल या बच्चंद्री पालच्या संस्थेतील ४८ वर्षांच्या महिलेनं एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवले. भारतीय महिलांमध्ये ती ‘वयोज्येष्ठ’ आहे. विशेष म्हणजे या प्रेमलता अग्रवाल संसारी आहेत. दोन मुलींची माता आहे. जमशेदपूरला टाटा स्टिल कं. मध्ये त्या कार्यरत आहेत. जमशेदपूरलाच एका टेकडी चढण्याच्या स्पर्धेत त्यांचा पहिला नंबर आला आणि इथंच त्यांच्या व्यवसायाला नवे वळण मिळाले. त्यांनी गिर्यारोहणाचा प्राथमिक आणि प्रगत दोन्ही प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थरच्या वाळवंटातील ४० दिवसांची मोहीम उंटाच्या पाठीवरून पूर्ण केली. हिमालय – नेपाळमधील आयलंड शिखर त्या चढून गेल्या. आणि व्यावसायिक ग्रूपच्या मदतीनं त्या चक्क ४८ व्या वर्षी एव्हरेस्ट चढून गेल्या. एका संसारी बाईनं उशिरा सुरुवात करून फार मोठ्ठा पराक्रम केला आहे. ही गोष्ट आहे फक्त २ वर्षांपूर्वीची २०११ च्या मे मधली. या स्वत: योगाच्या अनुयायी आहेत. शारीरिक शिक्षण देतात ‘योग’ शिकवतात.
बऱ्याच महिलांना गिर्यारोहण छंदाचं आकर्षण वाटतं. पण आपलं वय आड येईल अशी शंका त्यांना येते. त्यांच्यापुढे हे उदाहरण अत्यंत प्रेरणादायी आहे. आवड आहे ना नक्की? मग हिमालयातील एक – एक महिन्याचं प्राथमिक आणि प्रगत शिक्षण पूर्ण करा. याची फी परवडेल अशी सवलतीच्या दरातील असते. मग हे शिक्षण घेऊन एखादी हिमालयातील लहान शिखरांची मोहीम जिला फार खर्च येत नाही. अशी तुम्ही करू शकाल. ‘गिरिप्रेमी’सारखी संस्था तुम्हाला नक्की मदत करील. १९८० साली महिलांची मोहीम घेऊन आम्ही ‘मुलकिला’ शिखरावर गेलो होतो. त्यावेळी ‘पुणे माऊंटेनियर्स’ या संस्थेच्या सुधीर बर्वे आणि महाजन सर यांनी आम्हाला सर्वतोपरी मदत केली होती. मोहिमेचं नेतृत्व मी केलं खरं पण पुढची-मागची सर्व जबाबदारी टीममधील मुलींनी पार पाडली. आता काळ बदलला आहे. आता शेर्पा वा अन्य व्यावसायिक गिर्यारोहण मार्गदर्शक पर्वतीय मोहिमेत तुम्हाला सर्व सहाय्य करतात. त्यामुळे तुमचं प्रशिक्षण झालं असेल आणि तुम्ही पैस गोळा करू शकलात तर तुम्ही मोहिमेवर जाऊ शकाल. कृष्णा पाटीलला एव्हरेस्ट मोहिमेसाठी कर्ज काढावे लागले. पण तिची एव्हरेस्ट मोहीम यशस्वी झाली. तिनं स्वत:ची क्षमता सिद्ध केली आणि आता तिला भरपूर आर्थिक साहाय्य मिळते आहे. त्याचमुळे ७ खंडांतील ७ पैकी ४ शिखरं ती सर करू शकली. नृत्यांत व्यवसाय करू पाहणारी कृष्णा पाटीलच्या आयुष्यानं एकदम नवीन वळण घेतलं. लहान वयात गिर्यारोहणाचा भरपूर अनुभव तिला बरीच वर्षे मिळू शकणार आहे. तिची उरलेली शिखरंही लवकरच ती काबीज करेल यात शंका नाही. तेव्हा आता संधी अनंत आहेत, काळही अनुकूल आहे. गिर्यारोहण हा मनाची क्षितिजं रुंदावणारा छंद आहे. गिर्यारोहणांत आपत्तीशी लढण्याची झुंजार वृत्ती तुमच्यामध्ये येते. आपल्या आयुष्यातील अनेक संकटांशी लढायचे साहस तुम्हाला या छंदात प्राप्त होतं. निसर्ग आणि भवतालाचं आणि आपल्या मर्यादांचं भान या छंदामुळं लाभतं. पण पुन्हा एक लक्षात ठेवा की प्रत्येकजण प्रशिक्षणानं गिर्यारोहक होईल असे नाही. तुमच्या रक्तांत निसर्ग साहसाची ओढ असेल तर प्रशिक्षणानं आणि अनुभवानंच तुम्ही गिर्यारोहक होऊ शकाल आणि हिमालयातील अथांग शांतता, विशाल उंच पर्वतराजीच्या सौंदर्यात तुम्ही विहार करू शकाल.
आव्हान पेलताना !
शुक्रवारी (दि. ८) जागतिक महिलादिन साजरा होत आहे. वेगवेगळी क्षेत्रे काबीज करणाऱ्या महिलांना गिर्यारोहणाचा प्रांतही आता नवा नाही. किंबहुना धाडसाच्या, आव्हान पेलण्याच्या या वाटेवर काही महिलांनी पुरुषांच्याही पुढे एक पाऊल टाकल्याची काही उदाहरणे दिसून येत आहेत. महिलांच्या याच साहसवाटांचा आढावा घेणारा हा लेख

First published on: 06-03-2013 at 12:44 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bearing the challenge