उपक्रम
दिवाळी आली, की सगळय़ांनाच दीपोत्सवाची ती प्रकाशमय चित्रे दिसू लागतात. घरे, मंदिरे, सार्वजनिक इमारतींवर सर्वत्र ही दिव्यांची आरास होत असतानाही भटक्यांनाही त्यांचे गडकोट खुणावू लागतात. मग हे भटकेही त्यांच्या त्यांच्या सॅकमध्ये एखादी तरी पणती घेऊन जातात आणि त्या तटबुरुजांमध्येही दिवाळी जागवतात. रायगडमधील ‘रुरल अँड यंग फाउंडेशन’आणि मुंबईतील शिवशौर्य संस्थेतर्फेही अशीच गडावरची दिवाळी आयोजित केली जाणार आहे.
या दीपोत्सवासाठी अलिबागजवळील कुलाबा या जलदुर्गाची निवड करण्यात आली आहे. ‘रुरल अँड यंग फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेकडून गेली ३ वष्रे हा ‘कुलाबा दीपोत्सव’ उपक्रम राबविला जातो. दिवाळीच्या पूर्वसंध्येला अनेक दुर्गप्रेमी इथे जमतात. किल्ल्याचा परिसर स्वच्छ करतात आणि मग रात्री शेकडो दिव्यांच्या प्रकाशात सारा गड जागा केला जातो.
यंदाही ८ नोव्हेंबर रोजी या मोहिमेचे आयोजन केले आहे. या दिवशी दुपारी या जलदुर्गावर पोहोचायचे. मग स्वच्छता मोहीम आणि संध्याकाळी दीपोत्सव असा हा कार्यक्रम आहे. दीपोत्सव करून रात्रभर किल्ल्यातच मुक्काम करायचा आहे. समुद्रामध्ये असलेल्या या किल्ल्यात रात्रभर मुक्काम हा एक विलक्षण अनुभव आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या पहिल्या ५० शाळकरी मुलांसाठी हा ट्रेक पूर्णपणे मोफत ठेवला आहे.
आपण दिवाळीत आपल्या दारात दिवे लावून आपले घर, आपला परिसर उजळून टाकतो, पण आपली अस्मिता, ओळख अन् अभिमान ज्या कि ल्ल्यांनी जपला, आपली संस्कृती आणि देश, धर्माचे रक्षण केले अशा किल्ल्यांची अवस्था दयनीय झाली आहे. एकेकाळी ज्यांनी देदीप्यमान इतिहास पाहिला, आज ते अंधारात शेवटची घटका मोजत आहेत. त्यांचे स्मरण म्हणून ही एक पणती लावण्यासाठी निघू यात.
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी अमित मेंगळे (९३२०७५५५३९) किंवा सुशील साईकर (९९२१९०१०१०) यांच्याशी संपर्क साधावा.

Story img Loader