गडकोटांच्या राज्यात फिरणाऱ्यांना प्रमोद मांडे हे नाव आता चांगलेच परिचयाचे आहे. महाराष्ट्रभर फिरून सर्व दुर्गाचा अभ्यास ज्या मोजक्या अभ्यासकांनी केला आहे, त्यामध्ये मांडेंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या या राज्यव्यापी दुर्गभ्रमंती आणि अभ्यासातून साकारलेला एक दुर्गकोश म्हणजे- ‘गडकिल्ले महाराष्ट्राचे’!
महाराष्ट्राला ‘दुर्गाच्या देशा’ असे म्हटले जाते. या राज्यात पाचशेच्या वर किल्ले असावेत असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. पण हे सर्व किल्ले राज्यभर अनेक दुर्गम जागी, खेडोपाडी असे विखुरलेले आहेत. या सर्व किल्ल्यांना भेटी देणे, त्यांचा अभ्यास करणे हे तसे एखाद्या गिरिदुर्गाएवढेच महत्त्वाचे काम आहे. या पाश्र्वभूमीवर मांडेंनी हे दुर्गाचे राज्य स्वत: पायदळी तुडवले, त्यांचा अभ्यास केला आणि एक सुसूत्र पद्धतीने जनतेसमोर आणले आहे- ‘गडकिल्ले महाराष्ट्राचे’!
मोठय़ा आकारातील तब्बल साडेचारशे पानांच्या या ग्रंथात महाराष्ट्रातील ३९१ किल्ल्यांची एकत्रित माहिती आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने अशी एकत्रित माहिती असणारा हा एकमेव ग्रंथ म्हणावा लागेल. या पुस्तकाची आणि त्यातील किल्ल्यांच्या या माहितीची रचना महाराष्ट्राच्या स्वाभाविक विभागानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा पद्धतीने केली आहे. या प्रत्येक विभागात पुन्हा जिल्हावार या किल्ल्यांचे गट केलेले आहेत. या एकेका जिल्हय़ानुसारच हे किल्ले आपल्या भेटीला येतात. किल्ल्यांची ही माहिती देताना पुन्हा त्यामागे काही दिशा, विचार आहे. अगदी सुरुवातीला तो भाग, मग तो जिल्हा, मग त्या जिल्हय़ाचा नकाशा, नंतर त्या किल्ल्याच्या परिसराचा नकाशा आणि प्रत्यक्ष किल्ल्याचा नकाशा असे आपण त्या किल्ल्यापर्यंत पोहोचतो. त्या विशिष्ट किल्ल्याची माहिती घेतानाही मग त्या किल्ल्याकडे जाण्याचे मार्ग, अन्य माहिती, दुर्गदर्शन आणि इतिहासाची थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. याला उत्तम छायाचित्रांची जोड आहे.
मांडे यांनी किल्ल्यांची मांडणी करतानाही त्यातील जलदुर्ग, किनारीदुर्ग, गिरिदुर्ग, वनदुर्ग, स्थलदुर्ग, गढी, सराई अशा प्रकारांची त्या त्या ठिकाणी नोंद केलेली आहे. त्या त्या किल्ल्यांच्या परिसरातील अन्य पर्यटनस्थळांची माहितीही इथे जोडलेली आहे. या साऱ्यातून सारा महाराष्ट्रच जोडला जातो, त्याचे एकत्रित दर्शन घडते.
गडकोट म्हटले, की अनेकजण रायगड, राजगड, सिंहगड, पुरंदर, सिंधुदुर्ग यांच्यापलीकडे जात नाहीत. पण अशांना मग सेगवा, आसावा, काळदुर्ग (जि. ठाणे), मदगड, कोंढवी (जि. रायगड), साठवली, बारवाई (जि. रत्नागिरी), नारायणपूर, कोंढवळ, मंदाने (जि. नंदुरबार), रायकोट (जि. धुळे), तोंडापूर, नशिराबाद, पाल, रसलपूर (जि. जळगाव) अशा एक ना दोन अनेक किल्ल्यांचा पहिल्यांदाच परिचय होतो. यातील अनेक नावेच काहींनी पहिल्यांदा ऐकलेली असतात. या पाश्र्वभूमीवर गडांची ही सूची वाचतानाच उडायला होते.
या पुस्तकामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्हय़ांतील दुर्गसंपदा एकावेळी पुढय़ात उभी राहते. यातून नाशिकसारख्या जिल्हय़ात सर्वात जास्त तर वाशिमसारख्या जिल्हय़ात एख्याद्या किल्ल्याचाही शोध घ्यावा लागणे या गोष्टी कळतात. स्थलदुर्ग, जलदुर्गापेक्षाही आमच्याकडे गिरिदुर्ग संख्येने अधिक असल्याचे समजते. सराई, गढय़ांचा मामला खरेतर उत्तरेत मोठय़ा प्रमाणात असल्याचे आजवर आपण मानतो. पण याच महाराष्ट्रात खेडोपाडी या गढय़ांचे अस्तित्व मोठय़ा प्रमाणावर असल्याचे मांडेंचे हे पुस्तक वाचले की लक्षात येते. एवढय़ा मोठय़ा आकाराचे हे पुस्तक, पण त्याची छपाई, बांधणी आणि मुख्य म्हणजे त्यासाठी वापरलेला कागद हा उत्तम दर्जाचा वापरल्याने या मोठय़ा ग्रंथाचा चेहराही सजलेला आहे.
महाराष्ट्र हा दुर्गाचा देश. या देशाएवढे दुर्ग अन्यत्र कुठेही दिसणार नाहीत आणि या देशाएवढे दुर्गप्रेमही अन्यत्र कुठे सापडणार नाही. आजही सुटीचा दिवस आला, की हजारो पावले या राज्यभर विखुरलेल्या दुर्गाच्या वाटांवर स्वार होतात. त्या प्रदेशात, विश्वात रमून जातात. अशा सर्वच दुर्गप्रेमींसाठी, भटक्यांना उपयोगी पडणारा असा हा दुर्गकोश आहे.
(‘गडकिल्ले महाराष्ट्राचे’, लेखक- प्रमोद मांडे, प्रकाशक- प्रफुल्लता प्रकाशन, संपर्क- गुलाबराव सपकाळ ९४२२५०४०३०)
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा