‘एव्हरेस्ट’ या एका शब्दाचे गारुड इतके आहे की, आजपर्यंत ते आम्हाला स्वस्थ बसू देत नाही. ‘गिरिप्रेमी’च्या पुणे ‘एव्हरेस्ट २०१२’ व ‘ल्होत्से – एव्हरेस्ट २०१३’ या मोहिमांमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित झाले. भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम, एकाच शहरातून एकाच नागरी संस्थेमधून तब्बल अकरा एव्हरेस्टवीर होणे, महाराष्ट्रातील सर्वात वयाने लहान एव्हरेस्टवीर इत्यादी, इत्यादी. पण खरेतर माझ्या दृष्टीने या सर्व मोहिमांचे यश ‘गिर्यारोहण’ हा शब्द महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला यामध्ये आहे. हा एक असा वेगळा धाडसी क्रीडाप्रकार आहे की, ज्यामध्ये कोणत्याही वयाची व्यक्ती सहभागी होऊ शकते. इथे स्पर्धा नाही. इथे आपल्या क्षमता मर्यादेपलीकडे ताणून स्वत:ला एका वेगळ्या रूपात ओळखून घेण्याचे कौशल्य सापडते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘माणूस’ घडवण्याचे काम या छंदातून घडते.
‘एव्हरेस्ट’च्या चढाई दरम्यान अनेक प्रसंगात जीवन-मृत्यूचे थरारक नाटय़ माझ्या साहसवेडय़ा गिर्यारोहकांनी अनुभवले. या सर्वोच्च चढाईमधून जे अकरा एव्हरेस्टवीर झाले आहेत. ते आज सगळे एका वेगळ्या जीवनाचा अनुभव घेत आहेत. त्याच्यामधले माणूसपण वेगवेगळ्या घटकामधून अनुभवायला मिळत आहे. मग ते उत्तराखंड मधील ढगफुटी असो किंवा नुकताच नेपाळमध्ये झालेला महाभंयकर भूकंप असो. प्रत्येक ठिकाणी या गिर्यारोहकांनी आपले कर्तव्य समजून समाजासाठी जे काम स्वत:चा जीव धोक्यात घालून केले व करीत आहेत त्या सर्वाची बीजे गिर्यारोहणाच्या अगळ्या वेगळ्या जीवनशैली मध्ये रुजली आहेत.
भारतातून ‘एव्हरेस्ट’ची पहिली यशस्वी मोहीम सेनादलाच्या शूरवीर गिर्यारोहकांनी १९६५ साली केली. नऊ गिर्यारोहकांनी या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवला. या मोहिमेचे नेतृत्व कॅप्टन एम. एस. कोहली यांनी केले होते. या संघामधले एव्हरेस्ट वीर मेजर एच. पी. एस. अहलुवालिया यांची कहाणी सर्वासाठीच प्रेरणा देणारी आहे. एव्हरेस्टवीर झालेल्या अहलुवालिया यांना अनेक मान सन्मान मिळाले. पुढे १९७१ च्या भारत-पाक युद्धामध्ये त्यांच्या मणक्याला गोळी लागून गंभीर दुखापत झाली. इंग्लंडमधल्या दीर्घ उपचारांमध्ये या गिर्यारोहकाच्या मनामध्ये विचार आले की, आज मी एक सनिक व एव्हरेस्टवीर असल्यामुळे या ठिकाणी हे महागडे उपचार घेऊ शकत आहे. पण माझ्या देशामध्ये असे कितीतरी गरीब लोक आहेत की, ज्यांना हे उपचार उपलब्ध नसल्यामुळे अत्यंत वेदनादायक आयुष्य जगायला लागत आहे.
इंग्लंडवरून परत भारतामध्ये आल्यावर या शूरवीर गिर्यारोहकाने निश्चय केला की, मणक्याच्या दुखापतीवरील आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल आपल्या देशामध्ये गोरगरिबांना परवडेल अशा स्वरूपामध्ये सुरू करायचे. ‘व्हीलचेअर’मध्ये असलेला, स्वत:चे हात-पाय हलवू न शकणारा हा माणूस झपाटल्यासारखा कामाला लागला. त्यांच्या या अथक प्रयत्नातून १९९७ साली नवी दिल्ली येथे भारतातील पहिले ‘इंडियन स्पायनल इन्जुरिअस सेंटर’ सुरू झाले.
मेजर अहलुवालिया म्हणतात ‘जर तुमचे विचार चांगले असतील, तुमचे हेतू प्रामाणिक असतील आणि हे सर्व दुसऱ्यांना मदत करण्यासाठी असेल तर पसे तुमच्याकडे येतील, तुम्हाला कोणतेही कार्य अशक्य नाही. ‘व्हीलचेअर’वर हतबल शारीरिक अवस्थेमध्ये असलेल्या मेजर अहलुवालियांची झेप, जिद्द इतकी प्रचंड आहे की, आज वयाच्या ७५ व्या वर्षी ते अहोरात्र समाजसेवेच्या व्रतामध्ये अखंड कार्यरत आहेत. आयुष्यामध्ये अशाप्रकारे लढण्याची ही ताकद, दुर्दम्य इच्छाशक्ती, ध्यास या सर्व गिर्यारोहकांनी या साहसी क्रीडा प्रकारातून प्राप्त केला आहे. याचे प्रमाण आहेत मेजर अहलुवालिया सर.
या निमित्ताने ‘एव्हरेस्ट’वर चढाई करणाऱ्या पहिल्या भारतीय महिलेबद्दल अर्थात ‘बचेंद्री पाल’च्या काही गोष्टींचा उल्लेख करावाच लागेल.
उत्तराखंडमधील नाकुरी या छोटय़ाशा खेडय़ामध्ये गुरांच्या मागे जाणारी ही धाडसी महिला १९९४ साली जगातील सर्वोच्च शिखरावर पोहेचली. तिच्या असामान्य कामगिरीची दखल घेत जगातील सर्वात बलाढय़ अश्या ‘टाटा’ उद्योगसमूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी ‘टाटा अॅडव्हेन्चर फाउंडेशन’ या भारतातील पहिल्या खासगी धाडसी क्रीडांच्या प्रशिक्षण संस्थेची स्थापना करून एव्हरेस्टवीर बचेंद्री पाल हिला या संस्थेची प्रमुख केले. आज बचेंद्री पाल यांच्या प्रेरणेने अरुणिमा सिन्हा, प्रेमलता अगरवाल या सारख्या धाडसी गिर्यारोहक महिला या क्षेत्राला लाभल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या अथक कामगिरीमधून आज उद्योगक्षेत्रामधील विविध पातळीवरील हजारोंना गिर्यारोहणाच्या माध्यमातून स्वयंविकासाचे धडे देखील मिळत आहेत.
‘एव्हरेस्ट दिना’च्या निमित्ताने आपल्या देशातील अशा अनेक एव्हरेस्टवीरांचे स्मरण करावसे वाटते. त्यांच्या स्फूर्तिदायक गाथा सर्वांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे असे वाटते. कारण अशा धाडसी लोकांच्या कामामधून सशक्त समाजनिर्मिती होत आहे. ‘माणूसपण’ घडत आहे. या सर्व शूरवीर एव्हरेस्टवीरांना सलाम!
उमेश झिरपे (एव्हरेस्ट मोहिमेचे नेते)