गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने आयोजित पाचव्या दुर्ग साहित्य संमेलनामध्ये यंदा दुर्गविषयक विविध परिसंवाद, चर्चासत्र, मुलाखत, व्याख्याने, दुर्गदर्शन, प्रदर्शन, स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हे संमेलन येत्या २० ते २२ फेब्रुवारी रोजी सिंहगड पायथ्याशी ‘गप्पांगण’ येथे होत आहे.
महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे माजी संचालक आणि ज्येष्ठ पुरातत्त्व शास्त्र तज्ज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे निमंत्रक आणि ज्येष्ठ दुर्गयात्री जयप्रकाश सुराणा हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
या तीनदिवसीय सोहळय़ात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, समारोप सोहळय़ासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संमेलनात दुर्ग आणि निसर्ग (सहभाग – डॉ. श्रीकांत इंगळहळ्ळीकर, डॉ. आनंद पाध्ये, डॉ. सतीश पांडे, डॉ. हेमंत घाटे) आणि दुर्ग आणि शिल्प (सहभाग – महेश तेंडुलकर, सदाशिव टेटविलकर, डॉ. गो. बं. देगलुरकर) या दोन विषयांवर परिसंवाद रंगणार आहेत. पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या ‘दहा दिवस दहा दुर्ग’ या मोहिमेतील सहभागी ज्येष्ठ दुर्गरोहींशी आणि ‘सिंहगडाचे वारस’ या विषयांतर्गत नरवीर तानाजी मालुसरे, नावजी बलकवडे आणि लोकमान्य टिळक यांच्या वंशजांशी चर्चेचे खास कार्यक्रम यंदाच्या संमेलनात आहेत. दरवर्षी दुर्ग साहित्य संमेलनामध्ये गोनीदांच्या दुर्गविषयक एका कादंबरीचे त्यांचे कुटुंबीय अभिवाचन करतात. यंदाच्या संमेलनामध्ये गोनीदांच्या ‘पवनाकाठचा धोंडी’ या कादंबरीचे अभिवाचन केले जाणार आहे. या कार्यक्रमात डॉ. विजय देव, डॉ. वीणा देव आणि रूचिर कुलकर्णी सहभागी होणार आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची दुर्गविषयक मुलाखत हे यंदाच्या संमेलनाचे खास आकर्षण आहे. तसेच ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे गनिमी काव्याचे युद्ध’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. संमेलनाच्या निमित्ताने दुर्गविषयक छायाचित्र, चित्रकला, सिंहगड चढणे आणि दुर्गविषयक प्रश्नमंजूषा आदी स्पर्धा, तसेच पुरंदर ते सिंहगड अश्वारोहण मोहिमेचे आयोजन केले आहे. याशिवाय संमेलनस्थळी सह्याद्रीवरील चित्र-छायाचित्र आणि गिर्यारोहणातील साहित्यावर आधारित अशी तीन प्रदर्शने भरविली जाणार आहेत.
दुर्ग अभ्यासक शिल्पा परब-प्रधान यांच्याबरोबर सिंहगड दर्शन, नवोदित लेखकांचा मेळावा, दुर्गविषयक माहितीपटांचे सादरीकरण हेही संमेलनाचे आकर्षण आहे. या संमेलनाच्या निमित्ताने ‘सिंहगड’ या विषयावरील विशेषांकाचे प्रकाशनही या वेळी करण्यात येणार आहे. या संमेलनातील सहभागासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी प्रदीप जोगदेव (९३७१९१७७६८) किंवा विशाल देशपांडे (९८८१७१८१०४) यांच्याशी संपर्क साधावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सदाशिव टेटविलकर यांना पुरस्कार
दुर्ग साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दरवर्षी दिला जाणारा ‘दुर्ग साहित्य पुरस्कार’ यंदा ठाण्याचे ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांना जाहीर झाला आहे. रोख ११ हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार त्यांना संमेलनात प्रदान करण्यात येईल. टेटविलकर यांनी महाराष्ट्रातील गडकोट आणि अन्य ऐतिहासिक स्थळांवर प्रदीर्घ लेखन केले आहे. त्यांची ‘गडकिल्ल्यांच्या जावे गावा’, ‘दुर्गयात्री’, ‘दुर्गसंपदा ठाण्याची’, ‘ठाणे किल्ला’, ‘विखुरल्या इतिहास खुणा’, ‘दुर्गलेणी दीव, दमण, गोव्याची’, ‘महाराष्ट्रातील वीरगळ’ आदी पुस्तके प्रकाशित आहेत.

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fort literature fest on sinhagad in maharashtra