गिर्यारोहण विश्वात ‘गिरिप्रेमी’ संस्थेचे नाव सर्वत्रच आदराने घेतले जाते. ‘गिर्यारोहण’ त्यातून व्यक्तिमत्त्व विकास आणि अशा व्यक्तिविकासातून समाजविकास, या सूत्राने गेली अनेक वर्षे ही संस्था या क्षेत्रात कार्यरत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेत संस्थेने गेल्या दोन वर्षांत सर्वोच्च शिखर ‘एव्हरेस्ट’ आणि त्यापाठोपाठ ‘ल्होत्से- एव्हरेस्ट’ अशा दोन मोहिमांमध्ये अभूतपूर्व असे यश मिळवले. चार गिर्यारोहकांपुरते चालणारे ‘गिर्यारोहण’ समाजाभिमूख केले. गिर्यारोहणाचा हा प्रवास असाच पुढे उत्तुंग करत संस्थेने नव्या मोहिमेच्या दिशेने यंदा पाऊल टाकले आहे, – माऊंट मकालू!
गिर्यारोहण विश्वात ‘गिरिप्रेमी’ संस्थेचे नाव सर्वत्रच आदराने घेतले जाते. ‘गिर्यारोहण’ त्यातून व्यक्तिमत्त्व विकास आणि अशा व्यक्तिविकासातून समाजविकास, या सूत्राने गेली अनेक वर्षे ही संस्था या क्षेत्रात कार्यरत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेत संस्थेने गेल्या दोन वर्षांत सर्वोच्च शिखर ‘एव्हरेस्ट’ आणि त्यापाठोपाठ ‘ल्होत्से- एव्हरेस्ट’ अशा दोन मोहिमांमध्ये अभूतपूर्व असे यश मिळवले. चार गिर्यारोहकांपुरते चालणारे ‘गिर्यारोहण’ समाजाभिमूख केले. गिर्यारोहणाचा हा प्रवास असाच पुढे उत्तुंग करत संस्थेने नव्या मोहिमेच्या दिशेने यंदा पाऊल टाकले आहे, – माऊंट मकालू!
खरेतर दोन वर्षांपूर्वी ‘एव्हरेस्ट’ चे घवघवीत यश मिळवल्यावर संस्थेला सामान्यपणे पुढील काही वर्षे हारतुरे आणि सत्कार सोहळय़ात मश्गूल होता आले असते. पण ‘गिरिप्रेमी’ने या यशाचे भांडवल यासाठी न वापरता पुढील मोहिमेची ताकद म्हणून कामाला आणण्याचे ठरवले आणि एक नवा संकल्प सोडला. जगात ८००० मीटरपेक्षा जास्त उंचीची १४ हिमशिखरे आहेत. ज्यांना गिर्यारोहणाच्या भाषेत ‘एट-थाऊजंडर्स’ असे म्हणतात. या सर्वच्या सर्व १४ शिखर माथ्यांना स्पर्श करणारे आज जगात हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच गिर्यारोहक आहेत. भारतात तर आजमितीस असा एकही गिर्यारोहक नाही. या १४ शिखरांनाच साद घालण्याचा विडा ‘गिरिप्रेमी’ने उचलला आहे. या अंतर्गतच गेल्यावर्षी एव्हरेस्टनंतर जगातील सर्वोच्च अशा चार क्रमांकाच्या ‘ल्होत्से’ शिखरावर संस्थेच्या आशिष माने या गिर्यारोहकाच्या रुपाने पाऊल उमटले. आता यापुढचा टप्पा म्हणून यावर्षी ‘माऊंट मकालू’च्या दिशेने संस्थेने नवी मोहीम उघडली आहे.
मकालू जगातील पाच क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. ८४८१ मीटर उंची असलेले हे शिखर नेपाळ आणि चीन देशांच्या हद्दीत आहे. हिमालयाच्या महालंगूर भागात एव्हरेस्टपासून १९ किलोमीटर अंतरावर त्याचे स्थान आहे. चढाईसाठी अत्यंत अवघड श्रेणीतील असलेल्या या हिमशिखराच्या ‘वाटे’ला आजवर खूपच कमी गिर्यारोहक गेले आहेत. इतिहासात एव्हरेस्टच्या जोडीनेच मकालू सर करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. पण सुरुवातीची अनेक वर्षे या शिखराने गिर्यारोहकांना जवळपासही फिरकू दिले नाही. अखेर या प्रयत्नांना यश येण्यास १९५५ साल उजाडले. या वर्षी लिओनल टेरी आणि जॉन कुझी या दोन फ्रेंच गिर्यारोहकांनी हे शिखर पहिल्यांदा सर केले. यानंतरही पुढे अन्य देशांच्या गिर्यारोहकांनी या शिखरासाठी आपले दोर बांधले, पण यश फारच थोडय़ा पावलांना मिळाले. भारताच्या यशासाठी तर अगदी काल परवाच्या २००९ सालची वाट पाहावी लागली. त्या वर्षी कर्नल निरज राणा यांच्या नेतृत्वाखाली दार्जिलिंगच्या ‘हिमालियन माऊंटेनिअरिंग इन्स्टिटय़ूट’ची मोहीम या शिखरावर गेली आणि भारताच्यावतीने पहिले यश त्यांना प्राप्त झाले. यानंतर आता यंदा ‘गिरिप्रेमी’ने या मकालूचे दार ठोठावले आहे.ही ‘मकालू’कडे झेपावणारी पहिली भारतीय नागरी मोहीम आहे.
येत्या २६ मार्च रोजी प्रस्थान करणाऱ्या या मोहिमेत ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली आशिष माने, आनंद माळी, भूषण हर्षे आणि अजित ताटे हे गिर्यारोहक सहभागी होत आहेत. झिरपे यांनी यापूर्वी एव्हरेस्ट, ल्होत्सेसह एकूण १२ मोठय़ा मोहिमांमध्ये नेतृत्व केले आहे. आशिषने यापर्वी २०१२ मध्ये एव्हरेस्ट आणि २०१३ मध्ये ल्होत्से शिखर सर केलेले आहे. आनंद, भूषणने २०१३ मध्ये एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. अजित ताटे हे या मोहिमेचा तळ सांभाळणार आहेत.
खरेतर या सर्व सदस्यांनी गेल्यावर्षीची मोहीम पूर्ण होताच मकालूसाठीची तयारी सुरू केली आहे. गिर्यारोहणासाठीचा आवश्यक सराव, शारीरिक तयारी आणि मानसिक बळ प्राप्त करण्यावर हे सदस्य गेले वर्षभर कष्ट घेत आहेत. एका बाजूला शारीरिक-मानसिक क्षमता विकसित करत असताना आवश्यक तो निधी उभारण्यासाठीही त्यांची धावपळ चालू आहे. या मोहिमेसाठी एकूण ५० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. यातील मोठा खर्च हा नेपाळ सरकारची रॉयल्टी, गिर्यारोहण साधन-सामुग्रीसाठी येणार आहे. यासाठी समाजातील दानशूर, साहस-क्रीडाप्रेमींमधून मदत उभी करण्यात येत आहे. ज्या इच्छुकांना या सहासयात्रेला आर्थिक बळ देण्याची इच्छा आहे, त्यांनी ९८५०५१४३८० किंवा ९८९०६२०४९० या क्रमांकावर अथवा http://www.giripremi.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
खरेतर भारतातील गिर्यारोहण अद्याप बाल्यावस्थेत आहे. या विषयाबाबत आमचा समाजच अनभिज्ञ आहे. मग अशावेळी त्याचे योग्य धडे, शिक्षण, मार्गदर्शन आणि मुख्य म्हणजे कुटुंबापासून ते समाजापर्यंतचे मोठे पाठबळ हे अद्याप आपल्याकडे रडत-खडतच आहे. अशातच ‘गिरिप्रेमी’ सारखी संस्था सह्य़ाद्री आणि हिमालयातील मोहिमांबरोबर सर्वोच्च अशा त्या ‘१४ शिखरां’चा वेध घेते. एव्हरेस्ट, ल्होत्सेच्या यशापाठी मकालूच्या दिशेने तिसरे पाऊलही टाकते. सारेच अतक्र्य-अशक्य! त्यांच्या याच प्रयत्न, चिकाटी आणि जिद्दीला शुभेच्छांसह सलाम!
कसा आहे मकालू पर्वत
मकालू हा जगातील सर्वोच्च असा पाचव्या क्रमांकाचा हिमपर्वत आहे. ‘पिरॅमिड’ आकाराच्या या पर्वतावरील चढाई त्याच्या आकारामुळेच अत्यंत अवघड समजली जाते. धारदार रेषेतील मार्ग, ७० ते ८० अंशातील खडी चढाई आणि अंतिम टप्प्यातील कठीण बर्फ आणि खडक मिश्रित भाग यामुळे मकालूचे आरोहण कठीण श्रेणीतील मानले जाते. याशिवाय अत्यंत वेगाने वाहणारे थंडगार वारे, उणे ४० अंशापर्यंतचे तापमान, शेवटच्या टप्प्यात कोसळणारे हिमकडे ही मकालू मोहिमेतील मोठी आव्हाने आहेत.
abhijit.belhekar@expressindia.com