‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट, ल्होत्से पाठोपाठ यंदा जगातील सर्वोच्च अशा पाचव्या क्रमांकाच्या मकालू शिखरावर तिरंगा फडकवला. यंदाचे हे यश एकाच मोहिमेत सलग दुसऱ्या प्रयत्नानंतर मिळालेले असल्याने त्याने इतिहास घडविला आहे. गिर्यारोहण विश्वात विलक्षण ठरलेल्या या मोहिमेविषयी..
गेल्याच आठवडय़ात ‘मकालूची हूल’ हा लेख लिहिल्यावर तेच शिखर आणि त्याच गिर्यारोहकांविषयी पुन्हा काही लिहावे लागेल असे खरेतर कुणाच्याही कल्पनेत नसावे. पण बहुधा ही त्या मकालू आणि त्याला जिंकून घेणाऱ्या गिर्यारोहकांचीच इच्छा असावी. ज्यामुळे त्या उत्तुंग शिखरावर ८३०० मीटपर्यंत झेप घेऊन माघार घ्यावी लागलेल्या या मावळय़ांनी तीनच दिवसांत पुन्हा नवी मोहीम उघडली आणि तो अशक्य असा हिमपर्वत सरही केला. सारेच अतक्र्य, विलक्षण, अचाट! मकालूबरोबर साऱ्या गिर्यारोहण विश्वाचे लक्ष वेधून घेणारे!
मकालू जगातील पाच क्रमांकाचे सर्वोच्च शिखर! ८४८१ मीटर उंची असलेले हे शिखर नेपाळ आणि चीन देशांच्या हद्दीत आहे. हिमालयाच्या महालंगूर भागात एव्हरेस्टपासून १९ किलोमीटर अंतरावर त्याचे स्थान आहे. चढाईसाठी अत्यंत अवघड श्रेणीतील असलेल्या या हिमशिखराच्या ‘वाटे’ला आजवर खूपच कमी गिर्यारोहक गेले आहेत. छातीवरची खडी चढाई, या चढाईसाठी प्रतिकूल अशी खडक आणि बर्फमिश्रित पर्वतभूमी आणि अत्यंत प्रतिकूल हवामान ही याची वैशिष्टय़े आहेत. हिमालयाच्या मुख्य रांगेपासून हा पर्वत सुटा असल्याने बिघडणाऱ्या हवामानाचे सर्वात जास्त तडाखे या मकालूला बसतात. वेगाने वाहणारे अती थंड वारे, सततची हिमवृष्टी आणि उणे ३५ ते ४० डिग्री सेल्सियस तापमान या साऱ्यांमुळे मकालूची चढाई ही कायम आव्हानांनी भरलेली असते.
यातच नेपाळचा हा भाग अतिमागास आहे. एव्हरेस्ट, ल्होत्सेप्रमाणे इथे शेर्पा, पोर्टर, अद्ययावत बेसकॅम्प अशी कुठलीही मदत नाही. जे काही करायचे ते सारे स्व:ताच्या जीवावर, बळावर. हा सारा भाग दुर्गम असल्याने संपर्क-दळणवळण यंत्रणाही इथे जवळपास नाही म्हटले तरी चालेल. अन्य भागातून मदतीला घेतले जाणारे चार-दोन शेर्पा आणि गिर्यारोहकांची जिद्द हीच इथली ती काय रसद! या शिदोरीवरच ‘गिरिप्रेमी’ने यंदाची त्यांची ही मकालू मोहीम सुरू केली होती.
उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या या मोहिमेत आनंद माळी, आशिष माने चढाई करत होते, तर अजित ताटे तब्बल १९,००० फुटांवरचा तळ सांभाळत होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ातच ‘गिरिप्रेमी’चा हा संघ मकालूच्या पायथ्याशी दाखल झाला होता. सराव, वातावरणाशी जुळवून घेणे या प्रक्रियेत सुरुवातीचे काही दिवस गेल्यावर आशिष माने आणि आनंद माळी यांनी १४ मे रोजी पहिल्या चढाईसाठी दोर बांधले. कॅम्प १, २, ३, समीट कॅम्प असे एकेक टप्पे पार पडल्यावर १७ मेच्या पहाटेपर्यंत ते शिखरमाथ्याच्या अगदी जवळ पोहोचले. केवळ दीडशे मीटरची चढाई शिल्लक होती. तासाभरात ती करत शिखर सर होणार होते, याचवेळी त्यांच्याकडील दोर संपला आणि मोहिमेवर मोठा आघात झाला. केवळ दोराअभावी दोन शेर्पा आणि या दोन्ही गिर्यारोहकांना माघारी फिरावे लागले.
गेले वर्षभर सुरू असलेली तयारी, घेतलेले कष्ट, तब्बल ऐंशी लाखांपर्यंतचा खर्च सारे काही केवळ दोर कमी पडल्याने ‘बर्फा’त जमा होणार होते. निराश मनाने हे सारे गिर्यारोहक तळावर परतले. पण त्याचवेळी त्यांचा नेता उमेश झिरपे याने दुसऱ्या मोहिमेचा बेत मांडला. पहिल्यांदा ही कल्पना उपस्थित साऱ्यांनीच धुडकावून लावली. कारणही तसेच होते. आठ हजार मीटरपेक्षा जास्त चढाई केल्यावर लगेच तेवढी चढाई करणे हे गिर्यारोहणात तसे अवघड मानले जाते. काही शेर्पाचा अपवाद वगळता ही मजल फारशी कुणाला गाठता आलेली नव्हती. आठ हजार मीटर पेक्षा उंचीवर जाणे, तिथे वास्तव्य करणे हे मानवी शरीरासाठी धोकादायक असल्याचे वैद्यकशास्त्र सांगते. या पाश्र्वभूमीवर हे गिर्यारोहक जीवाची बाजी लावत ही उंची गाठत असतात. तिथे लगोलग दुसऱ्यांदा या उंचीवर जाण्याचा फारसा कुणी विचारही करत नाही. यामुळे सलग दुसऱ्या प्रयत्नाबाबत विरोधी सूरच जास्त होता.
दुसरीकडे एका मोठय़ा मोहिमेमुळे थकलेली शरीरे, ढासळलेले मनोबल, अवघड आव्हान, संपलेले साहित्य आणि शेर्पाचे असहकार्य या साऱ्यांच गोष्टी पुन्हा नकाराकडे नेणाऱ्या होत्या. अखेर सामानाची बांधाबांध आणि तळाची आवराआवर सुरू झाली. पण अखेरचा प्रयत्न म्हणून उमेशने पुन्हा जोर लावला. वरिष्ठ-अनुभवी शेर्पाशी बोलणे झाले आणि शेर्पानी होकार दिला. पुढे मग गिर्यारोहकांची तयारी सुरू झाली. शिखरमाथ्याच्या एवढे जवळ जाऊन केवळ दोर अपुरा पडल्यामुळे माघार घ्यावी लागण्याचे दु:ख त्यांनाही सतावत होते. त्यांची ही व्यथाच त्यांची प्रेरणा, जिद्द आणि शक्ती बनली. शेवटी ठरले आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी मकालूला पुन्हा दोर बांधले गेले.
मकालूच्या चढाईसाठी २५ मे हा आणखी दिवस चांगला असल्याचे तोवर हवामान विभागाकडून समजले होते. यामुळे चढाईच्या दिवसांचा हिशेब धरता हाताशी केवळ एक दिवसाचा वेळ होता. धावपळ करत काठमांडूहून सामान मागवले गेले. ते वेळेत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरची मदतही घेण्यात आली. रेशनिंग, अति उंतीवरील अन्नपदार्थ, कृत्रिम प्राणवायूच्या नळकांडय़ा (ऑक्सिजन सिलिंडर) हे सारे वेगाने जमा झाले आणि केवळ तीन दिवसांची विश्रांती घेत मोहीम पुन्हा सुरू झाली.
गुरुवारी (२२ मे) तळ सोडला गेला. मग पुन्हा कॅम्प १, २, ३ असे सुरू झाले. मकालूचा पाठलाग पुन्हा सुरू झाला. सारे बळ आणि एकवटलेले मनोबल घेऊन गिर्यारोहक पुन्हा ती अवघड चढाई करू लागले. कॅम्प ३ पर्यंत ते पोहोचले आणि बिघडलेल्या हवामानाने त्यांना कोंडीत पकडले. प्रचंड वेगाने वाहणारे थंड वारे आणि जोडीला सततची हिमवृष्टी या साऱ्यांनी मोहिमेतील एक संपूर्ण दिवस तंबूत बसून गेला. बाहेरचे काहीही दिसते नव्हते. अशातच शुक्रवारची संध्याकाळ पुन्हा हवामान स्वच्छ करत आली आणि या गिर्यारोहकांनी पुन्हा चढाई सुरू केली.
मनोबल कितीही उच्च असले, तरी गेले महिनाभर १९ हजार फुटांवर केलेले वास्तव्य, सलग दुसरी चढाई यामुळे आता त्यांना थकवा जाणवू लागला होता. एकेक पाऊल टाकण्यास बळ एकवटावे लागत होते. हे करत असतानाच बरोबरच्या कृत्रिम प्राणवायूच्या साठय़ावरही सारखे लक्ष ठेवावे लागत होते. शेवटी यात आशिषने आघाडी घेतली. आनंदने त्याला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. अखेर शुक्रवारी संध्याकाळपासून सलग तेरा तास चढाई केल्यावर रविवारी पहाटे दोनच्या सुमारास आशिषने मकालूच्या माथ्याला स्पर्श केला. माथा गाठला पण या वेळी सर्वत्र अंधार होता. शिखर सर केल्याच्या पुराव्यासाठी माथ्यावरची विशिष्ट कोनातील छायाचित्रे आवश्यक असतात. तेव्हा त्यासाठी त्याला पुढे तब्बल दोन तास त्या उत्तुंग उंचीवर तिष्ठत राहावे लागले. या उंचीवर काही काळ थांबले तरी हिमदंशाचा धोका असतो. मग तो टाळण्यासाठी शरीराची सतत हालचाल सुरू ठेवत त्याने हा काळही काढला. पहाटे चार वाजले आणि याचवेळी २५ मेच्या सूर्योदयाची किरणे सर्वत्र पसरू लागली. मग त्या सूर्योदयाच्या साक्षीनेच आशिषने मकालूवर तिरंगा फडकवला. त्याच्या या विजयी क्षणाने मकालूवर एक इतिहास घडला होता. गेली अनेक वर्षे भल्या-भल्या गिर्यारोहकांना हूल दाखवणाऱ्या मकालूने ‘गिरिप्रेमी’ला यशाचे शिखर दाखवले होते.
सलग तिसरे यश
गिर्यारोहण विश्वात ‘गिरिप्रेमी’ संस्थेचे नाव सर्वत्रच आदराने घेतले जाते. ‘गिर्यारोहण’ त्यातून व्यक्तिमत्त्व विकास आणि अशा व्यक्तिविकासातून समाजविकास, या सूत्राने गेली अनेक वर्षे ही संस्था या क्षेत्रात कार्यरत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेत संस्थेने गेल्या दोन वर्षांत सर्वोच्च शिखर ‘एव्हरेस्ट’ आणि त्यापाठोपाठ ‘ल्होत्से- एव्हरेस्ट’ अशा दोन मोहिमांमध्ये मोठे यश मिळवले आहे. २०१२ साली ‘एव्हरेस्ट’चे घवघवीत यश संपादन केल्यावर त्याचवर्षी संस्थेने एक नवा संकल्प जाहीर केला होता. जगात ८००० मीटरपेक्षा जास्त उंचीची १४ हिमशिखरे आहेत, ज्यांना गिर्यारोहणाच्या भाषेत ‘एट-थाउजंडर्स’ असे म्हणतात. या सर्वच्या सर्व १४ शिखर माथ्यांना स्पर्श करणारे आज जगात हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच गिर्यारोहक आहेत. भारतात तर आजमितीस असा एकही गिर्यारोहक नाही. या १४ शिखरांनाच साद घालण्याचा विडा ‘गिरिप्रेमी’ने उचलला आहे. या अंतर्गतच सर्वोच्च एव्हरेस्ट, नंतर गेल्यावर्षी जगातील सर्वोच्च अशा चार क्रमांकाचे ‘ल्होत्से’ आणि यंदा ‘माउंट मकालू’वर संस्थेने पाऊल टाकले आहे. सलग तीन वर्षांत आठ हजार मीटर पेक्षा अधिक उंचीची तीन शिखरे सर करणारी ‘गिरिप्रेमी’ही भारतातील एकमेव हौशी गिर्यारोहण संस्था ठरली आहे.
मकालूची अवघड वाट
इतिहासात एव्हरेस्टच्या जोडीनेच मकालू सर करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. पण सुरुवातीची अनेक वर्षे या शिखराने गिर्यारोहकांना जवळपासही फिरकू दिले नाही. अखेर या प्रयत्नांना यश येण्यास १९५५ साल उजाडले. या वर्षी लिओनल टेरी आणि जॉन कुझी या दोन फ्रेंच गिर्यारोहकांनी हे शिखर पहिल्यांदा सर केले. यानंतरही पुढे अन्य देशांच्या गिर्यारोहकांनी या शिखरासाठी आपले दोर बांधले, पण यश फारच थोडय़ा पावलांना मिळाले. भारताच्या यशासाठी तर अगदी काल परवाच्या २००९ सालची वाट पाहावी लागली होती. त्या वर्षी कर्नल नीरज राणा यांच्या नेतृत्वाखाली दार्जिलिंगच्या ‘हिमालियन माउंटेनिअरिंग इन्स्टिटय़ूट’ची मोहीम या शिखरावर गेली आणि भारताच्या वतीने पहिले यश त्यांना प्राप्त झाले. यानंतर आता यंदा ‘गिरिप्रेमी’ने या मकालूचे दार ठोठावले आणि पहिल्याच मोहिमेत सलग दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी यशही मिळवले.
जिद्दीचे यश
अत्यंत अवघड अशा मकालू शिखराचा माथा गाठण्यासाठी अनेक गिर्यारोहक अनेक वर्षे प्रयत्न करत असतात. पण तेच यश ‘गिरिप्रेमी’ने पहिल्याच मोहिमेत प्राप्त केले आहे. यामागे चांगला संघ, त्यांची तयारी, जिद्द आणि असंख्य पाठिराख्यांना जाते. गिर्यारोहण हा तसा हौशी खेळ आहे. या खेळासाठी दुर्दम्य आत्मविश्वास, प्रबळ मानसिक शक्ती आणि शारीरिक क्षमता आवश्यक असते. या साऱ्यांच्या जोरावर मग ठरवलेली ध्येय्य गाठता येतात. दुसरीकडे या अशा खेळासाठी मोठय़ा प्रमाणात निधीचीही आवश्यकता असते. भारतात चांगले गिर्यारोहक असताना पैशाअभावी अनेक गिर्यारोहक, संस्था मागे पडतात. पाश्चात्त्य देशात अशा मोहिमांच्या मदतीसाठी तो देश, तिथले उद्योगसमूह मोठय़ा प्रमाणात पुढे येतात. आपल्याकडे असे चित्र खूपच अभावाने दिसते. आमच्या यंदाच्या मोहिमेसाठी आम्हाला काही उद्योजकांनी मदतीचे हात दिले, पण तरीही मोहिमेसाठी आवश्यक निधी आम्ही जमवू शकलो नाही. शेवटी खर्चात बचत करत मोहीम सुरू करावी लागली. यातच मोहिमेचा पहिला प्रयत्न वाया जाणार असे दिसू लागल्याने सर्वच निराश झाले होते. या पाश्र्वभूमीवरच आमच्या गिर्यारोहकांनी मोठय़ा जिद्दीने पुन्हा नव्याने चढाई केली आणि शिखरमाथा गाठला.
– उमेश झिरपे
एव्हरेस्ट, ल्होत्से पेक्षाही अवघड
दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च एव्हरेस्ट, गेल्या वर्षी ल्होत्से शिखर केले पण मकालू हे या दोन्हीपेक्षाही अवघड असे शिखर आहे. याची चढाई अंगावर येणारी आहे. दुसऱ्या प्रयत्नावेळी तर सारे बळ पणाला लावावे लागत होते. शिखरमाथा गाठल्यावर वेळेपूर्वीच पोहोचल्याचे लक्षात आले. सर्वत्र अंधार होता. माथा गाठल्याच्या यशाने आनंद होत होता पण त्याचवेळी भोवतालचा अंधार आणि उंचीने भीतीही वाटत होती. सूर्योदयाची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मग अशावेळी होणाऱ्या हिमदंशापासून बचाव करण्यासाठी ८४८१ मीटर उंचीवर सलग दोन तास शरीराची हालचाल सुरू ठेवली होती. मकालूच्या या उंचीवर घालवलेला हा वेळ आयुष्यभर लक्षात राहील
आशिष माने