ज्या दृश्याने थक्क व्हायला होते. त्यामध्ये गुंतायला होते. चार क्षण विसावायला, हरवायला होते. अशा कुठल्याही जागेला ‘पर्यटन स्थळ’ म्हणायला हरकत नाही. मग हे स्थळ एखादे निसर्गनवल, एखादी इतिहासभूमी नाहीतर एखादा मानवनिर्मित आविष्कार काहीही असू देत. सांगायचे कारण असे, की एकदा पुणे-नाशिक रस्त्यावरील आळेफाटय़ाहून नगरच्या दिशेने जात असताना अणे घाटात अशाच एका अनगड स्थळाने डोळे आणि पाय रोखले. त्या घाटात, दरीत खाली उतरलो आणि त्या निसर्गनिर्मित आविष्कारापुढे थक्क व्हायला झाले.
ही गोष्ट आहे, एका नैसर्गिक रचनेची, भौगोलिक आविष्काराची! पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण-नगर रस्त्यावर आळेफाटय़ाच्या पूर्वेला गुळुंचवाडी गावाजवळ हे निसर्गनवल दडलंय. पुण्याहून आळेफाटा ९६ किलोमीटर तर आळेफाटय़ाहून साधारण १८ किलोमीटरवर हे गुळुंचवाडी गाव. हे गाव ओलांडताच लगेच अणे घाट सुरू होतो. या घाटाची दोन-चार वळणे घेताच डाव्या हाताला दरीत एक दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाचे कुतूहल चाळवते.
या डोंगराच्या एका शिरेवरच एक भलामोठा नैसर्गिक बोगदा तयार झालेला दिसतो. एखाद्या पुलाच्या कमानीप्रमाणे त्याची ही रचना. उत्सुकतेपोटी हे स्थळ पाहण्याची इच्छा होते. ती दरी उतरत खाली जावे आणि त्या भौगोलिक आविष्काराच्या पुढय़ात उभे राहावे. केवळ दर्शनानेच एक क्षण उडायलाच होते. निसर्गाचे हे कोडे अजब रसायन वाटू लागते.
कुणी, कशी आणि कधी तयार केली ही रचना? त्या कमानीवर नजर टाकत असतानाच हे असे असंख्य प्रश्न सतावू लागतात. सुरुवातीचा काही काळ केवळ हे आश्चर्य बघण्यातच जातात. मग हळूहळू या कोडय़ाचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न सुरू होतो. हा शोध घेण्यासाठी थोडेसे भू-शास्त्राकडे वळावे लागते. आपला भू-प्रदेश हा विविध प्रकारच्या खडकांच्या स्तरांनी तयार झाला आहे. यातील काही स्तर हे कठीण तर काही मऊ-मुदू प्रकारातील आहेत. या भू-स्तरांवर निसर्गातील ऊन, वारा, पाऊस आणि पाणी हे बाह्य़घटक सतत परिणाम करत असतात. हजारो वर्षांच्या या संघर्षांत (घर्षण) मृदू खडकाचे भूस्तर नष्ट होतात. क्वचित प्रसंगी त्यांचे रूप-आकारही बदलतात. निसर्गाने तयार केलेले हेच आकार – चेहरे मग आमच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. गुळुंचवाडीच्या या शिलासेतूमागेही हेच कारण.
घडले असे, की गुळुंचवाडीच्या या बोगद्याजवळूनच वरच्या बाजूने एक ओढा खाली येतो. एरवी कोरडय़ा असणाऱ्या या भागात पावसाळय़ात मात्र या ओढय़ातून साऱ्या डोंगराचे पाणी खाली वाहत येते. ते इथे या बोगद्याच्या डोंगररांगेला येऊन अडते. मग अशा वेळी कित्येक वर्षांपासून या पाण्याने वाट मिळवण्यासाठी या डोंगराशी संघर्ष सुरू केला. पाण्याच्या या संघर्षांतून डोंगराच्या पोटातील मृदू खडकाच्या स्तराची झीज होत गेली. छताच्या व तळाच्या बाजूचा कठीण खडक तसाच राहिला. पाण्याने स्वत:ला वाट तयार करून घेतली. पुढे हजारो वर्षे हे पाणी या जागेतून असेच वाहत – घर्षण करत राहिले आणि ज्यातून मग तयार झाला हा नैसर्गिक बोगदा!
गुळुंचवाडीचा हा बोगदा तब्बल २१ मीटर लांब, ९ मीटर रुंद आणि २ ते ६ मीटर उंचीचा आहे. या अदूभुत बोगद्याखालून जाताना निसर्गाच्या या चमत्कारात अडकायला होते. या बदलांचे आश्चर्य वाटू लागते. विज्ञानाची ही रहस्ये मनाला भुरळ पाडतात. बरोबरच्या एखाद्या गावक ऱ्याशी हा सारा अनुभव जोडावा तर तो आपला त्याचे श्रेय पांडवांना देऊन रिकामा होतो. ‘‘कौरव-पांडव युद्धात पांडवांपैकी कुणाच्या तरी एकाच्या बाणाचा नेम चुकला अन् इथं डोंगराला भोक पडलं!’’ त्याची ही कथा ऐकत आपण आपले गालातल्या गालात हसायचे आणि या भू-शास्त्रीय आविष्काराला एका लोककथेचीही जोड द्यायची!
पावसाळय़ात इथे आले, की या बोगद्याखालून ओढय़ाचे पाणी एका छोटय़ा धबधब्याचे रूप घेऊन धावत असते. आता या पाण्यावर पुढे एक पाझर तलावही बांधला आहे. या बोगद्यातून पाणी खळाळू लागले, की भोवतालच्या हिरवाईवर या नवलाला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते. एरवीही कधी आलो तर या बोगद्याच्या शांत सावलीत बसून अणे घाटातून होणारी वाहतूक पाहण्यातील बालसुलभ भावावस्था अनुभवावी वाटते. मध्येच या कमानीत शिरणारा वारा सूं-सूं आवाज करत वाहू लागतो. तर संध्याकाळी मावळतीचे रंग या कमानीला न्हाऊ घालू पाहतात. अमेरिकेतील ती ‘गोल्डन आर्च’ही अशीच केशरी रंगात न्हाणारी. एक क्षण तिचीच आठवण झाली. अगदी त्या सारखी नसली, तरी त्या पठडीतील हे निसर्गनवल! फरक एवढाच, की ‘गोल्डन आर्च’च्या वाटय़ाला अमाप प्रसिद्धी आली. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक तिथे आपली हजेरी लावतात. तर आमच्या या गुळुंचवाडीच्या बोगद्याच्या वाऱ्याला मात्र त्या गावचा खेडूतही उभा राहत नाही. गुळुंचवाडीच्या कमानीच्या मनातले हे दु:ख जाणून घेत तिच्या शरीरावरून प्रेमाने एक हात फिरवला आणि घाटवाटेने पुढच्या प्रवासाला निघालो.
अभिजित बेल्हेकर
abhijit.belhekar@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा