तसा मी भटकाच. ते ‘ट्रेकर’ का काय म्हणतात ना तोच! पण आम्ही या महाराष्ट्रातले शूर मावळे मग काय अश्वारोहण तर आमच्या रक्तातच भरलेले. याच आवडीमुळे ‘दिग्विजय हॉर्स रायडिंग अ‍ॅकॅडमी’ आणि गुणेश पुरंदरे यांच्या संपर्कात आलो आणि नुकतीच पुण्याजवळच्या परिसरात आम्ही घोडेस्वारी करून आलो.
तिकोना हा पुणे जिल्ह्य़ातील पवन मावळातील एक गिरिदुर्ग. याच्याकडे येण्यासाठी मुळशी तालुक्यातील पौड किंवा मावळातील कामशेतहून रस्ता आहे. या अशा गडाच्या सान्निध्यात जूनच्या पहिल्या आठवडय़ात आम्ही आमची ही मोहीम नुकतीच राबविली.
या मोहिमेसाठी एकूण दोन तुकडय़ा करण्यात आलेल्या होत्या. १ ते ६ जूनच्या दरम्यान ही घोडदौड होती. यामध्ये गुणेश पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील साने, अथर्व ठाकूर आणि मी स्वत: यांनी मोहिमेची सूत्रे सांभाळली. तर कुलभूषण बिरनाळे, मुकुंद राणे, अंकित बजाज, रौनक, तेजस शिंदे, श्रिया पुरंदरे, सिया आखाडे, आर्या बोरा, युक्ता गुप्ते आदींनी सहभाग घेतला.
या दोन्ही तुकडय़ा आदल्या दिवशीच गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या होत्या. भल्या सकाळीच आम्ही आवरायचो. या वेळी आमची ही लगबग तो तिकोनाही कौतुकाने पाहायचा. मग मांड टाकून आम्ही घोडदौडीसाठी बाहेर पडायचो. गडाच्या कुशीतून, डोंगर-टेकडय़ांवरून, झाडा-वनातून, ओढय़ा-नाल्यातून, भवतालच्या खेडय़ातून आमचा हा प्रवास चाले. सह्याद्री त्याचा हा भवताल, तिथला निसर्ग, भूगोल, स्थानिक माणसे, शेतीवाडी असे सारे निरखत आम्ही ही घोडदौड करत होतो. वाटेतील रानमेवा खात होतो. दुपार झाली, की वाटेत तिथे कुठले गाव लागेल तिथेच आम्ही सर्व मंडळी जेवणासाठी विसावायचो. एखाद्या गडाच्या परिसरातून आमची सुरू असलेली ही घोडसवारी पाहून या स्थानिक गावक ऱ्यांनाही मोठे कौतूक वाटायचे. दुपारी आमची विश्रांती झाली, की आम्ही पुन्हा बाहेर पडायचो. आमच्या या रपेटीमध्ये मध्येच कुठे रस्त्यात आडवी झाडे यायची, मग ती दूर करावी लागायची. कुठे रस्ता संपायचा तर कुठे नको असणारा डांबरी रस्ता पुढय़ात यायचा. एकदा तर वाटेत एक शेतच आडवे आले. भाताची रोपे लावली होती. घोडी तशीच पुढे घालावी तर महाराजांचे वाक्य आठवले, ‘रयतेच्या भाजीच्या देठासही धक्का न लावणे’ .. मग काय घोडी पुन्हा माघारी वळवली आणि वळसा घेऊन पुन्हा मार्गावर आलो, संध्याकाळ झाली, की आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या काशीगच्या तलावावर जमायचो. त्या पाण्याच्या सहवासात तो गड अनुभवयाचो. मुक्कामी आलो, की मग घोडय़ांचे दाणा-पाणी करायचे, दिवसभराच्या त्यांच्या कष्टाबद्दल त्यांच्यावर प्रेमाने हात फिरवायचा आणि मग गप्पांमध्ये लुप्त होऊन जायचे.
हा असा घोडेस्वारीचा अनुभव, आम्हाला खूप काही शिकवून गेला. फिरता फिरता तो अगदी शिवकाळातच घेऊन गेला. घोडय़ांबरोबर निसर्गात राहण्याचा एक वेगळाच अनुभव मिळाला. पुढील कामासाठी एक नवी ताकद उमेद मिळाली. ..ते म्हणतात ना ‘माइंड फ्रेश’ झालं. अगदी त्यापेक्षाही भारी वाटलं. ..शब्दात सांगणं कठीण आहे. ..आता ‘दिग्विजय’च्या पुन्हा नव्या मोहिमेची अशीच वाट पाहतो आहे.

Story img Loader