कालपर्यंत ‘गिर्यारोहण’ हा खेळ केवळ हौसेच्या आणि ध्यासाच्या पातळीवर सुरू होता. आजही काही प्रमाणात तो तसाच चालू आहे. परंतु गेल्या दोन वर्षांत ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या ‘एव्हरेस्ट’ आणि ‘ल्होत्से-एव्हरेस्ट’ मोहिमेला यश मिळाल्यावर आता उद्योजकही या खेळात केवळ पाठिंबाच नाहीतर सहभाग घेण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या यंदाच्या या ‘मकालू’ मोहिमेच्या निधीचे ‘शिवधनुष्य’ या उद्योजकांनी केवळ  पेललेच नाहीतर यातील अनेकजण  या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’, ‘अन्नपूर्णा बेस कॅम्प’, आयलंड शिखर आणि टेंट शिखर मोहिमांच्या निमित्ताने ‘गिरिप्रेमी’च्या बरोबर मार्गक्रमण करणार आहेत.
जगातील सर्वोच्च अशी दोन शिखरे सर केल्यानंतर सलग तिसऱ्या वर्षी ‘गिरिप्रेमी’तर्फे ‘मकालू’ या जगातील पाचव्या सर्वोच्च शिखरासाठी दोर बांधले आहेत. या नव्या मोहिमेत थरार, धाडस, चिकाटी आणि वेड सारे काही सामावलेले आहे. यासाठी ‘गिरिप्रेमी’कडे गेल्या अनेक वर्षांचा अनुभव, नित्य सरावाचे बळ, उच्च शारीरिक-मानसिक मनोबलाची साथ हे सारे काही जमेला असले तरीही नव्या मोहिमेसाठी लागणाऱ्या ५० लाख रुपयांच्या खर्चाचा डोंगर संस्थेच्या पुढय़ात उभा होता. इथेच त्यांच्या मदतीला हे उद्योगजगत आले आहे.‘गार्डियन कॉर्पोरेशन’चे मनीष साबडे यांनी या मदतीसाठी पुढाकार घेतला. मग ‘क्युबिक्स इंडिया’चे विजय जोशी, ‘हावरे ग्रुप’चे सुरेश हावरे, ‘फिल्ट्रम’च्या पूनम किलरेस्कर, एलआयसी, जनता सहकारी बँक, पुणे महानगरपालिका, पुणे विद्यापीठ, इंडस हेल्थ क्लब, विद्या व्हॅली स्कूल, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, पाळंदे कुरिअर अशा एकेक उद्योजक-संस्था पुढे येत गेल्या आणि पाहता पाहता ५० लाख रुपयांचा निधी उभा होत गेला. अद्यापही काही रक्कम अपुरी आहे. ती उभी करण्यासाठी संस्थेची धावपळ सुरू आहे. ज्या इच्छुकांना या साहसयात्रेला आर्थिक बळ देण्याची इच्छा आहे, त्यांनी ९८५०५१४३८० किंवा ९८९०६२०४९० या क्रमांकांवर अथवा ६६६.ॠ्र१्रस्र्१ी्रे.ूे या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
‘मकालू’ मोहिमेसाठी ध्वजप्रदान
‘गिरिप्रेमी’च्या बहुचर्चित ‘मकालू’ मोहिमेसाठी जाणाऱ्या गिर्यारोहकांना नुकताच भारतीय तिरंगा आणि भगवा ध्वज प्रदान करण्यात आला. भारताचे माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते मोहिमेचे नेते उमेश झिरपे, आनंद माळी, आशिष माने, अजित ताटे आणि भूषण हर्षे या गिर्यारोहकांना शिखर माथ्यावर लावण्यासाठीचा ध्वज प्रदान करण्यात आला. या वेळी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अरविंद खळदकर उपस्थित होते. दरम्यान, या मोहिमेस शुभेच्छा देण्यासाठी ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’, ‘अन्नपूर्णा बेस कॅम्प’, आयलंड शिखर आणि टेंट शिखर अशा अन्य मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमांमध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून उद्योजकांपर्यंत अनेक सदस्य सहभागी झाले आहेत. या सदस्यांनाही मान्यवरांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला.

Story img Loader