कुणी ‘कालिंदी’, कुणी ‘सतोपंथ’ तर कुणी ‘एव्हरेस्ट’ अशा एकाहून एक उत्तुंग शिखरांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. खऱ्या गिर्यारोहकाची, साहसवीराची सारी शक्ती, चिकाटी, धैर्य पणाला लागले. पण यशाचे शिखर दिसू लागलेले असतानाच त्या पर्वतानेच त्यांना कवेत घेतले. ज्या हिमशिखरांचा त्यांनी आयुष्यभर वेध घेतला त्याच्याच कुशीत त्यांनी शेवटचा श्वास घेतला. जिद्द, पराक्रम, साहसाच्या या वाटेवर नवे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या अशाच काही साहसवीरांचे नुकतेच स्मरण करण्यात आले. निमित्त होते आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचे!

दरवर्षी ११ डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाच्या निमित्ताने अनेक गिर्यारोहण संस्थांकडून विविध कार्यक्रम-उपक्रमांचे आयोजन केले जाते. पुण्यातील ‘गिरिप्रेमी’ संस्थेतर्फे यंदा या दिवसाच्या निमित्ताने साहसाच्या या वाटेवर हौतात्म्य पत्करलेल्या गिर्यारोहकांचे स्मरण करण्यात आले. तन, मन, धन या साऱ्यांचे भान हरपून केवळ उत्तुंगतेच्या ध्यासातून त्या-त्या शिखरांकडे धावलेल्या आणि या आव्हानांचा सामना करतानाच धारातीर्थी पडलेल्या वीरांचे हे स्मरण!
नंदू पागे (१९८६ सतोपंथ मोहीम), भरत मांगरे (१९८६ सतोपंथ मोहीम), डॉ. मीनू मेहता (१९८६ सतोपंथ मोहीम), डॉ. डी. टी. कुलकर्णी (१९९२ एव्हरेस्ट मोहीम), अरुंधती जो (कालिंदी मोहीम), विजय महाजन (कालिंदी मोहीम), मंगेश देशपांडे (२००९ थिनचिंगखांग मोहीम), रमेश गुळवे (२०१२ एव्हरेस्ट मोहीम) या त्या वीरगाथा! प्रत्येकाची मोहीम निराळी, वाट निराळी, शिखर निराळे आणि आव्हानही निराळे ..पण त्याला कवेत घेता-घेता त्यांनी जणू या खेळावरच आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या याच धाडस, साहस, पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी ‘गिरिप्रेमी’ने या प्रत्येकाच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या या साहसगाथा जिवंत केल्या.
यामध्ये या साहसवीरांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यात आली. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या कामगिरीचे स्मरण आणि जतन व्हावे म्हणून या आशयाच्या तयार केलेल्या मानपत्राचे वितरण झाले. साहस वाटेवरची ही पावले आज नाहीशी झाली तरी हा समाज त्यांच्या त्या अत्त्युच्च धैर्याचे स्मरण करतो आणि त्याचा मान राखतो हीच यामागची भावना, ‘गिरिप्रेमी’ने आपल्या या आगळय़ा-वेगळय़ा कार्यक्रमातून प्रगट केली.
गिर्यारोहण खेळात जय-विजय, यश-अपयश अशी स्पर्धा कधीच नसते. इथे असतो तो भवतालच्या निसर्गाचा आणि त्यात दडलेल्या मानवी मूल्यांचा शोध. याच शोधातून दरवेळी कुठेतरी डोंगर-शिखरावर जाणारी ‘गिरिप्रेमी’ची मोहीम या दिवशी त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाऊलखुणा शोधार्थ फिरली आणि ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ खऱ्या अर्थाने साजरा झाला.

Story img Loader