पर्यटनासाठी अलिबागला अनेक जण जातात. या अलिबागच्या समोरच ऐन समुद्रात छत्रपती शिवरायांनी बांधलेला कुलाबा किल्ला गेली साडेतीनशे वर्षे या दर्याच्या लाटांना तोंड देत उभा आहे. या कुलाबा किल्ल्याचीच ही भ्रमंती.
शीर्षक वाचतानाच काहींचा गोंधळ उडाला असेल, की जंजिरा तर मुरुडला, मग अलिबागचे नाव मधेच कुठे? तर त्याचे असे आहे, की मूळ ‘जंजिरा’ शब्द म्हणजेच पाण्यातील किल्ला, जलदुर्ग, पाणकोट! पूर्वी बहुतेक जलदुर्गाचा उल्लेख ‘जंजिरा’ म्हणूनच व्हायचा, तेव्हा यातलाच हा आजचा अलिबागजवळचा ‘जंजिरे कुलाबा’!
अलिबाग तसे सर्वाच्याच परिचयाचे! इथे आलेले सर्व जण त्याच्या या किल्ल्याकडे धाव घेतात. अलिबागच्या किनाऱ्यापासून अर्धा किलोमीटरवर आत समुद्रात हा जलदुर्ग! तेव्हा इथे यायचे असेल तर सर्वात आधी भरती-ओहोटीचे गणित लक्षात घ्यावे लागते. हे गणित लक्षात न घेतल्याने इथे अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. त्यामुळे कुठेही पर्यटनाला निघताना या महत्त्वाच्या सूचनांकडे लक्ष द्यायलाच हवे. साधारणपणे तिथीच्या पाऊणपट केल्यावर जी संख्या येते ती त्या दिवशीची भरतीची वेळ असते. यानंतर पुढील चार तास ओहोटी! हा ओहोटीचा काळ किल्ल्यात जाण्या-येण्यासाठी सोयीचा! हे गणित केले तर अष्टमी, नवमी, दशमीचे दिवस किल्ल्यात जाण्यासाठी चांगले! या दिवसांत सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत समुद्राला ओहोटी राहते. आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ओहोटी म्हणजे साफसूफ जमीन नव्हे, या वेळीही कुलाब्याभोवतीच्या पात्रात गुडघाभर पाणी असते. यामुळे सावधानता ही हवीच! पण या पाण्यातून चालण्याचा अनुभव नक्की घ्या. पाण्यात उतरल्याशिवाय, त्याचा स्पर्श अनुभवल्याशिवाय समुद्राचा खराखुरा अनुभव येत नाही. या भुसभुशीत वाळूतून चालताना समुद्राशी नवे नाते तयार होते. ‘पायाखालची वाळू सरकणे’ असे यापूर्वी खूपदा ऐकलेले असते. इथे त्याचा शब्दश: अनुभव येतो. ज्यांना पाय भिजवायचे नसतात. त्यांच्यासाठी किनाऱ्यावरून घोडागाडय़ांचीही सोय आहे. या घोडागाडीत बसायचे आणि थेट समुद्रात घोडे घालत गडाकडे धावायचे. या उथळ समुद्रातून हे घोडे टापांऐवजी पाणी उडवत दौडत असतात.
दक्षिणोत्तर पसरलेला हा लांबट चौकोनी आकाराचा जलदुर्ग! ईशान्येला त्याचा महादरवाजा. या महादरवाजासमोर कुलाब्याचा धाकटा भाऊ शोभावा असा सर्जेकोट नावाचा आणखी एक छोटेखानी कोट! या दोन कोटांच्या मध्येच दगडांच्या अनेक राशी ओतून एक सेतू किंवा छोटीशी तटवजा भिंत तयार केलेली आहे. या सर्जेकोटामध्ये आजमितीस विहीर, दारूगोळय़ांचे कोठार, एक छोटेसे मंदिर आदी दुर्गावशेष दिसतात. हे सारे पाहात कुलाब्याच्या या महाद्वारात उभे ठाकावे.
दोन बुरुजांच्या मधोमध हे महाद्वार! त्याच्या डोक्यावर नगारखानाही! या द्वारशाखेवर मोर, हत्ती, हरिण, शरभ आदी पशुपक्ष्यांची शिल्पे कोरलेली आहेत. यातील शरभ तेवढा काल्पनिक पशू, यापूर्वी अनेक गडकोटांवर आपण पाहिलेला. याशिवाय उमलत्या कमळांची अनेक फुले. कमानीच्या मधोमध गणेशाचे शिल्प!
आत शिरताच वळण घेत पुढे आणखी एक दरवाजा लागतो. गडात शिरलो, की लगेचच उत्तर दिशेला तटातच तळघरात काढलेले धान्याचे कोठार दिसते. चार घुमटांचे छत आणि त्याला गोल खांबांचाच दिलेला आधार! कधीकाळी इथे धान्य, तेल-तूप भरून ठेवले जाई. सध्या मात्र इथे फक्त अंधार भरून राहिलेला आहे. आत शिरताच गडदेवता भवानीदेवी आणि गुलबाईचे मंदिर दिसते. यातील गुलबाई म्हणजे महिषासुरमर्दिनी! या शक्तिदेवतांचे दर्शन घ्यायचे आणि दुर्गदर्शनाला सुरुवात करायची!
कुलाबा हे नाव ‘कुल’ आणि ‘आप’ या शब्दांपासून तयार झाले. कुल म्हणजे सर्व, तर आप म्हणजे पाणी! ‘सर्व (बाजूने) पाणी’ असलेली ही जागा म्हणजे ‘कुलाप’! याचाच अपभ्रंश तो कुलाबा! छत्रपती शिवरायांनी बांधलेला हा शेवटचा दुर्ग! २१ मार्च १६८० रोजी त्यांनी इथल्या नवघर नावाच्या खडकाळ बेटावर हा जलदुर्ग बांधण्यास सुरुवात केली. तो पूर्ण झाला जून १६८१ मध्ये! मात्र त्या वेळी तो पाहण्यास महाराज हयात नव्हते. दुर्दैव त्या कुलाब्याचे! असा हा कुलाबा महाराजांनंतर मराठी आरमाराचे प्रमुख, सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या साम्राज्याचे केंद्र बनले. डच, इंग्रज, पोर्तुगीज आणि मुरुडचा सिद्दी या परकीय संकटांना आंग्य्रांच्या या अभेद्य भिंतीने रोखून धरले. कुलाबकर आंग्य्रांच्या पाच पिढय़ा इथे नांदल्या. त्यामुळे कुलाब्याच्या साऱ्या इतिहासावरच या आंग्रे घराण्याची छाप पडलेली आहे. देवीच्या मंदिरांपासून गडात निघालेली ही वाट पुढे गणेश मंदिरात येते. एका तटाच्या आत हे मंदिर. आवारात पूर्वाभिमुख तीन मंदिरे! मुख्य गणेशाचे, तर अन्य दोन श्री राधेश्वर महादेव आणि मारुतीची! यातील महादेवाच्या मंदिरासमोर एक अतिशय बारीक नक्षीकाम केलेले तुळशी वृंदावन आहे. या वृंदावनाशेजारीच एक पांढऱ्या चाफ्याचे झाड त्याची फुले गाळत असते. निसर्ग आणि स्थापत्याचा असा हा उत्तम मिलाफ काही काही ठिकाणी सहज पाहण्यास मिळतो.
इसवी सन १७५९ मध्ये राघोजी आंग्रे यांनी हे मंदिर आणि भोवतीचे प्रांगण बांधले. मुख्य मंदिर हेमाडपंती. मंदिराच्या दारातच दगडातच बांधलेले कारंजे! आज बंद असलेले हे कारंजे सुरू करता आले तर इतिहास आणि त्याच्या ऐतिहासिक सौंदर्याचेही जतन केल्यासारखे होईल. मुख्य मंदिराला अष्टकोनी सभागृह आणि त्यामागे अष्टकोनी आकारातच गर्भगृह; दोन्ही दालनांना वेलबुट्टीची नक्षी असलेली गवाक्षे आणि घुमटाकृती छत! मंदिरातील गाभाऱ्याचे प्रवेशद्वार तर खूपच अलंकृत! पायाशी कीर्तिमुख, दोन्ही बाजूस द्वारपाल, व्याघ्रमुखे, भोवतीच्या चौकटीवर पाना-फुलांच्या माळा आणि वरच्या द्वारपट्टीवर अन्य देवतांबरोबर मधोमध गणेशही विराजमान झालेला. या दरवाजाच्या डाव्या बाजूस कार्तिक स्वामी, तर उजव्या बाजूस गणेशमूर्तीची स्थापना केलेली आहे.
गर्भगृहात संगमरवरातील उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. या मूर्तीच्या भोवतीने पुन्हा अक्षमाला, नाग, डमरू आदी आयुधे घेतलेला शिव; कमळे धारण केलेला चतुर्भुज सूर्य; पद्म, गदा, चक्र आणि शंख घेतलेला त्रिविक्रम विष्णू; परळ, त्रिशूल, चाप, तलवार, नाग आणि पेला हाती घेतलेली अष्टभुजा महिषासुरमर्दिनी या चार देवतांच्या मूर्तीचीही स्थापना करण्यात आलेली आहे. ज्यामुळे हे मंदिर गणेशपंचायतन बनले आहे.
या मंदिरासमोरच एक देखणी पुष्करणी आहे. ३४.५ मीटर लांब आणि ३१.५ मीटर रुंद अशी विस्तीर्ण आकारातील ही जलवास्तू. राघोजी आंग्य्रांनीच खोदली-बांधली. चारही बाजूंनी पायऱ्यांची रचना असलेल्या या पुष्करणीच्या एका बाजूवर साती आसरांचे (सप्तमातृका) शिल्प बसविण्यात आलेले आहे. पुष्करणी नावातले सारे सौंदर्य इथे आहे, फक्त पाण्याने तेवढे शेवाळ पकडलेले. या वाटेवरच आंग्य्रांच्या पडझड झालेल्या वाडय़ाचे अवशेष दिसतात. कधीकाळी पाचमजली असलेला हा वाडा १७५३ ते १७८७ या ३४ वर्षांत तब्बल पाच वेळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. पुढे राघोजी आंग्रे यांनी तो १८१६ मध्ये पुन्हा बांधला आणि राहता केला. पण थोडय़ाच वर्षांत १८३९ मध्ये आंग्य्रांचे हे संस्थानच इंग्रजांकडून खालसा झाले. त्यांचा अंमल आल्यावर त्यांनी या वाडय़ाच्या कलात्मक लाकूडकामाचा लिलाव केला आणि इथले दगड अलिबागच्या पाणीपुरवठा योजनेसाठी वापरले. इतिहासाची ही लचकेतोडच! ..या उद्ध्वस्त वाडय़ाच्या भिंती पाहू लागलो, की त्या गतकाळाच्या आठवणींचे दु:ख गाळत असतात, त्या अश्रूंमध्ये आपले मनही थोडेसे भिजते. असे वाटते, हा इतिहास सांगण्यासाठी आता या भिंती तरी टिकतील का?
पुष्करणी आणि या वाडय़ाच्या अवशेषांमागेच या किल्ल्याशी संबंधित कुणा हाजी हजरत कमालउद्दीन शाहचा दर्गा आहे. या पुष्करणीवरून पुढे गेलो, की आंग्य्रांचे दिवाण, फडणीस, चिटणीस, दफ्तरदार, पोतनीस यांच्या घरांचे अवशेष दिसतात. गडाच्या दक्षिण भागात शेवटी ‘कान्होबाची घुमटी’ येते. हे सारे पाहात गडाच्या दुसऱ्या दरवाजातून दक्षिण भागात उतरलो, की इतका वेळ विसर पडलेला तो अथांग समुद्र पुन्हा पुढय़ात अवतरतो. हा गडाचा दक्षिण दरवाजा. याला दर्या, यशवंत, दक्षिण, धाकटा, लहान अशा अनेक नावांनी ओळखले जाते. या सालंकृत दरवाजावरचे शिल्पकाम कमालीचे देखणे. भौमितिक आकृत्यांबरोबरच इथे निसर्गातील काही प्रतिमा आणि देवतांची रचना केलेली आहे. माथ्याच्या पट्टीवर कीर्तिमुखातून निघणारे कमळाचे वेल अनेक फुलांना फुलवत मध्यभागी एकमेकांना पीळ घातलेल्या मकरांच्या (मगर) मुखात शिरतात. या वेलीच्या प्रत्येक वळणावर पुन्हा स्वतंत्र शोडष कमळ! या दुर्गासमोरील समुद्राच्या पाण्याशी नाते सांगणारा हा शिल्पपट; त्याच्याखाली पुन्हा कापण्यांच्या नक्षीची एक पट्टी! त्याखाली चौकटीच्या आतील बाजूस मध्यावर महिरपीच्या एका देवघरात रिद्धी-सिद्धीसह गणेशाची स्थापना केलेली. याशिवाय कमानीवर डाव्या बाजूस गरुड, तर उजव्या बाजूस मारुतीचे शिल्प कोरलेले. उजव्या बाजूसच थोडे वरच्या अंगास शरभाचेही शिल्प कोरलेले असून त्याच्या चार पायांत, तोंडात आणि शेपटीमध्ये असे सहा हत्ती पकडलेले दाखविले आहेत. हे सारेच शिल्पांकन खिळवून ठेवते.
कुलाब्याचा हा आतील भाग पाहून झाल्यावर त्याच्या तटावर चढावे. सर्वप्रथम भोवतीचा अथांग समुद्र आणि पाठीमागे नारळी-फोफळीत झाकलेले अलिबाग दिसते. दूरवर सागरगड, रामदरणे, कनकेश्वर डोंगर, खांदेरी-उंदेरीचे जलदुर्ग आदी स्थळे खुणावू लागतात. हे सारे पाहातच तटावरून निघावे. कुलाब्याला एकूण सतरा बुरूज. नगारखानी, गणेश, माडी, तोफखानी, सूर्य, हनुमान, भवानी, पीर, गोलंदाज, दारूखानी, यशवंतदरी, नाला, घनचक्कर, फत्ते, दर्या, मनोहंद्रा आणि बाबदेव अशी त्यांची नावे! आजूबाजूच्याच वास्तूंचा संदर्भ पुरवणारी! नगारखान्याशेजारी मूळची ढालकाठीची जागा, महादरवाजावरचा टोपीवजा नगारखाना, पूर्वेकडील भवानी मंदिरामागे सूर्य बुरुजावरच्या जुन्या तोफा, यशवंत दरवाजाशेजारील हनुमंत बुरुजावर नव्याने उभा केलेला मनोरा, गणेश मंदिरामागील बुरुजाशेजारचा चोरदिंडी दरवाजा असे सर्व पाहात पश्चिमेच्या तोफखानी बुरुजावर यावे. इथे ब्रिटिश बनावटीच्या त्या दोन मोठाल्या तोफा आपली वाट अडवतात. तोफगाडय़ांवर स्वार झालेल्या या तोफा डॉसन हार्डी या कंपनीने १९ व्या शतकाच्या मध्यावर ओतल्या! त्याच्यावर या माहितीचे लेख कोरलेले आहेत. या तोफा समुद्राकडे तोंड करून या कुलाबा किल्ल्याचाच दरारा सांगत असतात. दुर्गाच्या या पश्चिम तटावरून समुद्राच्या अगदी मध्यात उभे राहिल्यासारखे वाटते. समोरच्या दर्यातून उसळणाऱ्या लाटा या तटावर धावत येऊन आदळत असतात. त्या येतात, फुटतात आणि आक्रंदळतातही! गेल्या सव्वातीनशे वर्षांपासून हे असे सुरू आहे. हा सुसाट दर्या या ‘जंजिऱ्या’स असे भय दाखवतो आहे. पण त्याच्या या तडाख्यांना कुलाब्याचा हा तट पुरून उरला आहे. काहींच्या मते यामागे शिवरायांनी दुर्गबांधणीत वापरलेले एक छुपे तंत्रज्ञान आहे. शिवरायांनी हा किल्ला बांधताना, त्याचे तट उभे करताना त्या दोन चिऱ्यांमध्ये कुठेही जोडसाहित्य (चुना वा अन्य) वापरले नाही. दोन चिरे फक्त एकमेकांत अडकवले. मध्ये असलेल्या त्या फटी तशाच रिकाम्या ठेवल्या. ज्यामुळे या तटावर आदळणाऱ्या प्रत्येक लाटेतील काही पाणी या फटींमधून आत जाते. लाटेचा विरोध कमी झाल्याने तिचा धक्का आणि त्यामुळे होणारी हानी कमी होते. आत शिरलेले पाणी लाट ओसरली, की पुन्हा बाहेर येते. आज सव्वातीनशेपेक्षा जास्त वर्षे झाली, खवळलेला दर्या या कुलाब्याशी असाच झुंजतो आणि शिवरायांचे तंत्रज्ञान त्याला याच पद्धतीने चकविते आहे!