शीर्षक वाचून ही एखाद्या बसमार्गाची पाटी असल्यासारखे वाटले ना? पण जातीच्या भटक्यांमध्ये या नावाला एक विशेष स्थान किंवा त्यापेक्षाही ओलावा आहे. त्यातही पावसाळा सुरू झाला, की ‘कात्रज-सिंहगड’ केलास का, असे एकमेकांना विचारत हा विषय एकदम सर्वत्र ऐरणीवर येतो. कुठलेही स्थलआकर्षण नसताना आणि डझनावारी डोंगर खालीवर करावे लागत असतानाही निसर्ग भटकंतीचा मनमुराद आनंद देणाऱ्या प्रवासामुळे कात्रज ते सिंहगड ही वारी भटक्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.
खेड शिवापूर, कोंढणपूर-कल्याणकडे जाणाऱ्या कुठल्याही बसने कात्रजच्या बोगद्याजवळ पायउतार व्हायचे. या बोगद्याच्या डोक्यावरच्या डोंगरापासून या भटकंतीची सुरुवात होते. या डोंगररांगेवर चढून आलो, की एकाच वेळी उत्तरेकडचे गजबजलेले पुणे शहर आणि दक्षिणेकडचा शांत, हिरवागार खेड शिवापूर, नसरापूरकडचा भाग दिसतो. या दोन्ही भागांना जोडणारा बोगदा आपल्याखाली, डोंगराच्या पोटातून वाहता असतो. १८६४ साली ब्रिटिशांनी हा बोगदा तयार केला. पण तत्पूर्वीचा जुना मार्ग या डोंगरावरून गेला होता. त्याच्या काही स्मृती इथली एक चौकीवजा इमारत आपल्या उरी अजून साठवून आहे. तिने सांगितलेल्या जुन्या आठवणी जमल्या तर ऐकाव्यात आणि पुढच्या प्रवासाला लागावे.
खरेतर गेल्या काही दिवसांपासून कात्रजचा हा डोंगर वेगळय़ाच गोष्टीसाठी चर्चेत आहे. हव्यासापायी मानवाने या डोंगराची केलेली लचकेतोड सध्या सर्वत्र गाजत आहे. कधीकाळी गवतझाडीने झाकलेल्या या घाटमाथ्याला अक्षरश: जागोजागी जखमी केले आहे. डोंगराचे हे दु:ख गिळावे आणि जड अंत:करणानेच पुढे निघावे.
या साऱ्या भटकंतीत वाटेत कुठेही खाण्या-पिण्याची सोय नसल्याने त्याची तजवीज करतच सॅक पाठीवर घ्यावी. या प्रवासाची गंमत म्हणजे कुठे जायचे हे नेमके डोळय़ांसमोर असते, कसे जायचे हेही एकामागे एक उलगडणाऱ्या डोंगर-टेकडय़ा सांगत असतात. कदाचित या पारदर्शकतेमुळेच काहींचे पाय इथेच कापायला लागतात. पण त्यासाठीच तर पावसाळय़ात इथे यायचे. हिरव्या-पिवळय़ा गवताची हिरवाई या डोंगरांनी पांघरली, की ही सारी वाटच आपलीशी होते. मग निसर्गाच्या या नवलाईतच खच्चून श्वास घ्यायचा आणि ‘हर हर महादेव’ म्हणत चालू पडायचे!
गोकुळ-वृंदावन!
सुरुवातीलाच एक जोडशिखरे आडवी येतात. पहिल्याचे नाव ‘गोकुळ’, तर दुसऱ्याचे ‘वृंदावन’! जणू गोकुळाच्या दारातील वृंदावन! दोन्ही अगदी लागून असल्याने खरेतर एक चढायचे आणि दुसरे उतरायचे. कात्रजच्या डोंगररांगेकडे दुरून पाहिले, की ही जोडशिखरे लक्ष वेधून घेतात आणि मग त्या अंदाजानेच कुणालाही ‘कात्रजचा घाट’ दाखवत शाबासकी मिळवता येते. आज ही शिखरे पाहून-अनुभवून घ्या. कदाचित उद्या ही जोडशिखरेही दिसणार नाहीत.
वृंदावन गेले, की गाडी रुळाला लागल्यासारखी वाटते. घाटातल्या गाडय़ांचा आवाज मागे पडतो आणि पक्ष्यांचा किलबिलाट भोवताल जागवू लागतो. एवढा वेळ सिंहगडावर खिळलेली नजरही आता अन्य डोंगर, झाडी, वाटा, तळातील छोटय़ा छोटय़ा गावांकडे जाऊ लागते. या वाटांवरून पावसाळय़ात हिंडण्यात एक मजा असते. एरवी रूक्ष, रटाळ वाटणाऱ्या या वाटा पावसाळय़ात मात्र एकदम चैतन्य पिऊन पुढय़ात येतात. सारी सृष्टीच जणू जिवंत, सजीव होते. हरिततृणांच्या या मखमालीवर लाल, पिवळय़ा, जांभळय़ा, पांढऱ्या अशा अनेक रंगांतील रानफुले छोटे-छोटे डोळे करत नाचू लागतात. प्रत्येकाचा रंग वेगळा, रूप वेगळे! मग सृष्टीशी हाच संवाद साधत प्रवास पुढे सरकतो.
पावसाळय़ाची आणखी एक गंमत असते. सारा डोंगर हिरव्या गवताने झाकला तरी त्यातली वाट तेवढी चिखल, मातकट रंग घेऊन मधोमध धावत राहते. मग ती आखून दिलेल्या रेल्वेच्या रुळाप्रमाणे एका डोंगरावर चढते आणि तीव्र उतार घेत तशीच खाली उतरते. या चढउतारावरून मग घसरणे-पडणेही सुरू होते.
एकामागोमाग डोंगर जातात. डावीकडची ससेवाडी, सणसवाडी, उजवीकडचा नवा घाटमार्ग, कोळीवाडी, खंडोबाचा दांड, नांदोशी मागे पडते आणि वाट एका मोठय़ा खिंडीत उतरते- सीताबाईची खिंड! जणू डोंगरातला चौफुला! इथून एक वाट डावीकडच्या आर्वी गावात, तर उजवीकडची डोणज्यात उतरते. या खिंडीत असलेल्या देवाला नमस्कार करायचा आणि पाण्याचे चार घोट घशाखाली उतरवत पुढच्या मुक्तुंग डोंगरावर चढाई करायची. हा चढ चढून वर आलो, की भणाणणाऱ्या वाऱ्याशी झटा देत एक एकुटवाणे झाड उभे
असलेले दिसते आणि मग या डोंगराला मुक्तुंग नाव ठेवणाऱ्याचे कौतुक वाटले. उत्तुंगावरचे हे मुक्त जीवन ते शिखर आणि त्यावरचे ते झाड जगत होते. त्यांचा हेवा वाटत होता. ..पण पुन्हा ती भीती! हे उद्या-परवा राहील ना?
वाढत्या नागरीकरणाचा कुठल्याही शहराभोवतीच्या निसर्गाला पहिला फटका बसतो. सिंहगडाची ही डोंगररांग या अशा विकृत समाजविस्ताराचाच बळी ठरत आहे. दरवर्षी पाऊस सुरू झाला, की शेकडो भटके ही वाट तुडवतात. त्यावरचे निसर्गसौंदर्य अनुभवतात, तृप्त होतात. पण गेल्या काही वर्षांत या सौंदर्याला, त्याच्या या अनुभवण्याला ग्रहण लागले आहे. काहीजण याविरुद्ध आवाज उठवतात. काही हा निसर्ग वाचवण्यासाठी धडपडतात. कुठे बिया टाकणे, कुठे झाडे लावणे. जो निसर्ग आपल्याला हा आनंद देतो, त्याच्याविषयी साऱ्यांचीच अशी विश्वस्ताचीच भूमिका नको का?
असो! आत्तापर्यंत अर्धी वाट सरलेली असते आणि हिरव्या झाडीतील भरल्या अंगाचा सिंहगडही आता नजरेत आलेला असतो. त्याला खेटून असलेल्या चिलीमखडा ऊर्फ पोटॅटो पॉइंटही आता उठून दिसायला लागतो. मध्येच कधीतरी ढगांची दाटी होते आणि त्यात बुडालेला सिंहगड हात वर केल्याप्रमाणे त्याच्या डोक्यावरील टॉवरमधून खुणावत राहतो.
पावसाळा सोडून एरवी या वाटेचा आनंद घ्यायचा झाल्यास एखाद्या माहीतगाराबरोबर पौर्णिमेची एखादी स्वच्छ रात्र निवडावी आणि मग या वेळी आकाशातील चांदणे झेलत सिंहगडाच्या तीरी लागावे. या भटकंतीतही सिंहगडावरील हा टॉवर आणि त्याचे दिवे दिशा देत मार्गावर बांधून ठेवतात.
मुक्तुंग मागे पडते आणि एखाद्या झिम्मड सरीबरोबर वाट झाडीत शिरते. सिंहगड वनक्षेत्र सुरू झाल्याची ही खूण. या झाडीतच कधीकधी ससे, साळिंदर, भेकर आणि कोल्हय़ांच्या गाठीभेटी घडतात. काहींनी शपथेवर बिबटय़ा दिसल्याचेही सांगितले आहे. नाही म्हणायला एकदा आम्हाला चिखलात उमटलेला त्याच्या पायाचा ताजा ठसा दिसला होता. पण त्या दृश्यानेही आमची नजर हरणासारखी कावरीबावरी झाली होती.
पक्ष्यांसाठी तर हा परिसर स्वर्गीयच! छोटय़ाशा शिंजीरपासून ते धनेशपर्यंत आणि खंडय़ापासून ते मोरांपर्यंत अनेक पक्षिगण इथे सुखनैव नांदतात. या दिवसांत तर त्यांचा निव्वळ धिंगाणा सुरू असतो. कुठे घरटी बांधण्याची गडबड तर कुठे पिलांसाठी जगवण्याची धडपड! सारेकाही गुंतवत असते. सोनकी, तेरडा, चवर, कचोरा, भारंगी अशी नाना फुलेही इथे उमलतात. दर सात वर्षांनी फुलणाऱ्या कारवीचे पाय तर इथे घट्ट रोवलेले आहेत. असे हे वनसौंदर्य या वाटेवरच अनुभवता येते. तासाभराची ही जंगलवाट तुडवल्यावर आपण कल्याण-कोंढणपूरला उतरणाऱ्या रस्त्याजवळ सिंहगडच्या घाटवाटेला येऊन मिळतो.
डझनाहून अधिक डोंगर-टेकडय़ा, तेवढय़ाच िखडी तुडवत जवळपास पाच-सहा तासांची भटकंती झालेली असते. पण हिरवाईचा सहवास आणि कोवळय़ा उन्हापासून-झिम्मड पावसापर्यंतचा ओलावा, ही दमछाक चेहऱ्यावर आणू देत नाही. ..पाऊस-धुक्याच्या या गर्दीतच तो, सिंहगड दिसतो आणि त्या दमल्या अवस्थेतही हास्य उमलते. मग या आत्मानंदातच चिंब भिजलेल्या शरीर-मनाचा पुणे दरवाजाला स्पर्श होतो.
  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा