अलिबागहून रेवसच्या वाटेवर चौंढी गावातून या किहीमला रस्ता जातो. हे अंतर आहे नऊ किलोमीटरचे. वाटेतील चौंढी गाव म्हणजे पूर्वीपासून साऱ्या अलिबाग अष्टागरचे बाजाराचे गाव. अन्य वस्तूंबरोबरच इथला गुरांचा बाजारही परिसरात प्रसिद्ध आहे. त्याला स्थानिक भाषेत ‘हेड’ म्हणतात. इथल्या बाजारातून एखादी खिलारी बैलजोडी विकत घ्यायची आणि ती एखाद्या शर्यतीत उतरवायची हा इथला जुना रिवाज. अशा या चौंढीतून आत किहीमकडे वळलो की लगेच या निसर्गाला भरते येते. कोकणचे ते सारे सौंदर्य एखाद्या बेटावर अवतरल्याप्रमाणे या किहीमभोवती उतरलेले असते.
गावात शिरताच पाण्याने भरलेला एक विस्तीर्ण तलाव आपले स्वागत करतो. कोकणातील प्रत्येक खेडय़ात दिसणारे असे बांधीव तलाव, पुष्करणी, कुंडे ही इथल्या जलसंधारणाची एक आगळी वास्तूशैली. कधी चालुक्य- राष्ट्रकुटांपासून चालत आलेल्या या वास्तूपरंपरेतही कोकणचे असे सौंदर्य डोकावत असते.
उतरत्या छताच्या घरांची ही छोटीशी वस्ती. प्रत्येकाच्या दारापुढे लख्ख अंगण. पुढे-मागे बागा; आंबा, काजू, नारळ, पोफळी आणि अशाच कितीतरी फळझाडांच्या! या प्रत्येक बागेच्या काठावर पुन्हा फणसाची मोठाली झाडे. अगदी बुंध्यापासून ते शेंडय़ापर्यंत अनेक फळबाळांनी लगडलेली. हंगामात आलो तर जांब आणि जांभळाचीही तिच तऱ्हा. सारे झाड फळांनी लगडलेले असते. फळांची त्यांच्या रंगढंगाची ही दुनिया साऱ्या कोकणलाच सतत सजवत- बहरत असते.
किहीमची ही वस्ती या फळ, झाडोऱ्यात झाकून गेलेली आहे. भर दुपारची उन्हेही इथे या झाडांना ‘आत येऊ का?’, असे विचारत खाली उतरत असतात. पश्चिमेकडून समुद्रावरून येणारा तो घोंघावणारा वाराही या दाट झाडीतून निथळत झाडापानांचे आवाज करत या वाडीत शिरत असतो.
निसर्गाच्या या सान्निध्यामुळे पक्ष्यांनाही किहीम फार आवडते. अगदी सोनहळदी सुगरणपासून ते शेकडो मैल दुरून येणाऱ्या कुरवापर्यंतचे अनेक जातीचे पक्षी इथे दिवसभर किलबिलाट करत असतात. पक्ष्यांच्या या मैत्रामुळेच पुढे जगप्रसिद्ध पक्षितज्ज्ञ सलीम अलींचेही किहीमशी जीवाभावाचे नाते झाले आणि किहीमच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
..हे सारे एवढय़ासाठी सांगायचे, की इथे आल्यावर हा गावातच अगोदर रमायला होते. कोकणातील अनेक गावांच्या नशिबी हे सौंदर्याचे भाग्य आलेले आहे.
असो. किहीममध्ये फिरायला लागलो, की इथला हा निसर्गच सुरुवातीला खुणावतो. मग लक्ष जाते ते इथल्या प्राचीन मंदिरांकडे. गावात अनेक मध्ययुगीन मंदिरे आहेत. पण यातही भीष्मेश्वराचे प्राचीन आहे. ही मंदिरे पाहात असतानाच कुणीतरी समुद्रकिनारी असलेल्या त्या गूढ शिवलिंगाविषयी सांगते. गावोगावी मंदिर- देवतांवर झालेल्या आक्रमकांच्या हल्ल्याचा इतिहास इथे किहीममध्येही सांगितला जातो. या हल्ल्यातच गावातील एका प्राचीन महादेव मंदिरातील शिवलिंग आणि नंदी गावाबाहेर समुद्रकिनारी फेकण्यात आले. त्यावर हळूहळू किनाऱ्यावरच्या वाळूचे थर साचून ते लुप्तही झाले. पण हा काळा इतिहास पुढे भविष्यात मात्र उघड झाला. कारण गंमत अशी की एवढा हल्ला होऊन दूर लोटलेले हे शिवलिंग बरोबर श्रावण महिन्यात जलधारा कोसळू लागल्या की किनाऱ्यावरच्या वाळूची धूप होऊन प्रगटते आणि मग किहीमवासीय देखील इथे गर्दी करतात. हे दृश्य पाहिले नाही, पण ऐकूनच त्यातील गमतीने आश्चर्य वाटून गेले.
असे हे किहीम गाव भटकणेच मुळी गुंतवणारे! इथली हिरवाई, निसर्ग शांतता आणि नितळ समुद्रकिनाऱ्यामुळे तर फार पूर्वीपासूनच पर्यटक या गावाकडे पावले वळवत आहेत. इथल्या अनेक घरांमध्ये पर्यटकांची राहण्या- जेवणाची सोय केलेली आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळानेही त्यांच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या ‘राहुटी निवास’ योजनेचा प्रारंभ या किहीम किनाऱ्यावरच केला.
किहीमच्या या किनाऱ्याचा विषय त्या समुद्रावर घेऊन येतो. अथांग, निळय़ाशार समुद्राला साथसंगत करत दूरपर्यंत पसरलेला किहीमचा किनारा आल्या आल्याच मोहात पाडतो. या किनाऱ्यावरची वाळूची नक्षी पायाशी चाळा करू लागते. या किनाऱ्यावरच एक आश्चर्य दडलेले आहे. या किनाऱ्याला खेटूनच वाळूचे काही डोंगर तयार झालेले आहेत. पिरॅमिडसारख्या या टेकडय़ांना स्थानिक भाषेत ‘वाळूचे डूंग’ असे म्हणतात. विशिष्ट अडथळ्याची भौगोलिक स्थिती असेल तर समुद्रावरून येणाऱ्या पश्चिम वाऱ्याच्या झोतावर हे वाळूचे थर वर्षांनुवर्षे चढत राहतात आणि त्यातूनच हे असे ‘डूंग’ तयार होतात. वाळूच्या या डोंगरावरून घसरगुंडीचा खेळ खेळण्याची मजा इथे अनेक पर्यटक लुटतात. पण ते खेळतानाच त्यामागे दडलेले विज्ञान फारच कमी लोकांना जाणून घ्यावसे वाटते. या सृष्टीत दडलेली ही सारी कुतूहले जाणून घेणे, त्याचा आनंद घेणे हेच तर खरे पर्यटन आहे.
अलिबागच्या साऱ्या अष्टागरमध्ये किहीमचा किनारा सर्वात मोठा आणि सुंदर! स्वच्छ, नितळ, रुपेरी! या किनाऱ्याला पुन्हा नारळ-पोफळी आणि सुरुच्या बनाची झालर. असे वाटते, जणू या किनाऱ्याला पाहातच ते ‘रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना..’, हे गीत उमलले असावे.
संध्याकाळ झाली, की साऱ्या अष्टागरात आलेल्या पर्यटकांची पावले या किहीमच्या किनाऱ्यावर एकत्र येतात. संध्याकाळच्या गहिऱ्या रंगात दिवसभर पाहिलेली ती स्वप्नदृश्ये जणू इथे त्या अथांग सागर आणि अवकाशी उमटलेली असतात. या रंगांमध्येच स्वत:ला हरवून घ्यायचे आणि किहीमची ही मुशाफिरी चिरंतन करायची.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा