पाऊसकाळी सारी सृष्टी हिरवी झाली, निसर्ग नवलाईने भारली, की भटकंतीला उधाण येते. एखादी डोंगरवाट आणि मित्रांचा मेळ जमला की पाठीवर सॅक घेत भटके चालू पडतात. या सृष्टीचे हेच ‘कवतीक’ पाहावे यासाठी आम्ही कोकणदिवा गडाची मोहीम ठरवली. पण ट्रेकच्या दिवसापर्यंत सारे मित्र गळाले आणि शेवटी मी एकटाच बाहेर पडलो.
कोकणदिवा हा पुणे आणि रायगड जिल्ह्य़ाच्या सीमेवरचा गड. पुण्याहून या गडाकडे जायचे म्हटले तर पानशेत धरणाशेजारून थेट घोळ गाव गाठावे. या घोळ गावातून डोंगरदऱ्यातील एक वाट या कोकणदिवा गडावर जाते. रायगड जिल्ह्य़ातून देखील महाड-पाचाड-सांदोशीमार्गेदेखील एक वाट या कोकणदिव्यावर येते.
मी दुचाकीवरून निघालो. पानशेत सोडल्यानंतर लगेचच भोवतीने हिरवे डोंगर, वाहते धबधबे-झरे लक्ष वेधून घेऊ लागले. निसर्गाच्या या हिरवाईवर अनेकठिकाणी रंगीबेरंगी रानफुलेही उमललेली होती. वर्षां ऋतूचे हे सोहळे पाहतच घोळ गावात पोहोचलो. दुचाकी इथेच लावत गारजाईवाडीतील बाळाबा पोळेकर यांना बरोबर घेत कोकणदिव्याची वाट पकडली. डोंगर-दऱ्या, टेकडय़ा, घनदाट झाडी, नदी-नाले, धबधबे या साऱ्यांची साथ अनुभवत निघालो. पावसाची एखादी सर मध्येच येत आम्हाला भिजवून जात होती. पण थोडय़ाच वेळात उघडीप होत निसर्गाचा देखावा पुन्हा खुला होत होता. वाट जंगलातून जात होती. जंगलातील त्या नीरव शांततेत पक्ष्यांचे आवाज, ओढय़ा-धबधब्याचे खळखळाट लक्ष वेधून घेत होता. या साऱ्यांशी गप्पा मारत, मनसोक्त छायाचित्रण करत आम्ही तासा-दोन तासात कोकणदिव्यावर पोहोचलो. या गडाचा शेवटचा टप्पा हा उभ्या कातळाशी दोन हात करतच चढावा लागतो. यामुळे पावसाळय़ात ही चढाई करताना खूपच सावधानता बाळगावी.
काही खोदीव टाक्या, गुहा इत्यादी अवशेष या गडाच्या इतिहासाच्या आठवणी सांगत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगडाच्या प्रभावळीतील हा किल्ला असल्याने त्याकाळी एक चौकी म्हणून हा गड ओळखला जाई.
कोकणदिव्याच्या टोकावर आले, की इतिहासाच्या आठवणीबरोबरच भोवतीचा निसर्गच जास्त खुणावतो. घाटमाथा, पुढे पसरलेले कोकण, या तळ कोकणातून वाहणारी काळ नदी लक्ष वेधून घेत असते. ऐन घाटमाथ्यावर हा किल्ला असल्याने भवतीने गिरिशिखरांचा वेढा पडलेला असतो. यामध्ये दूरवर आमचा तो रायगडही असतो. सह्य़ाद्रीचे हे रूप पाहत असतानाच पश्चिमेकडून निघालेले ढग एकेका गिरिशिखराला झाकू लागले. लवकरच मोठा पाऊस येणार याची ही वर्दी होती. यामुळे आम्ही लगेचच कोकणदिव्याचा निरोप घेत परतीचा मार्ग पकडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा