सृष्टिसौंदर्याकरिता कोकण प्रसिद्ध आहेच, निदान अजूनतरी! अथांग समुद्र, स्वच्छ वाळूचे किनारे, नारळी-पोफळीच्या बागा, लाल माती, जांभ्या दगडाची टुमदार कौलारू घरं, वळणावळणाचे रस्ते, गर्द झाडी व आमरायांनी सजलेलं कोकण बहुतांश लोकांच्या परिचयाचं आहे. रत्नागिरी शहराचा विचार केला तर औद्योगीकरण व शहरीकरणाच्या खाणाखुणा इथं आता प्रकर्षांनं जाणवू लागल्या आहेत. साधारण हातखंब्यापासून ते समुद्रापर्यंत आणि मिरजोळे व झाडगावपासून ते भाटय़ाच्या खाडीपर्यंतचं वातावरण कोणत्याही शहरासारखंच आता दिसू लागलंय. परंतु सुदैवानं शहराच्या कोणत्याही दिशेला पाच मिनिटं बाहेर गेलं तरी आधी उल्लेख केलेलं कोकणचं रूप अजूनही दिसतं! रत्नागिरीच्या आसपासचं हेच कोकण, तिथला निसर्ग भटक्यांना साद घालत असतो. पावसाळय़ात त्यानं हिरवं रूप धारण केलं, की हे निमंत्रण अधिक गहिरं होतं.
सह्याद्रीचा (पश्चिम घाट) एक अविभाज्य घटक असलेला कोकणचा निसर्ग जैवविविधतेनं संपन्न आहे. म्हणूनच शहरातील टिळक जन्मस्थळ, पतितपावन मंदिर, रत्नदुर्ग व थिबा राजवाडा अशी महत्त्वाची स्थळं पाहून झाली की रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागात फिरून तेथील जैवविविधतेची झलक कोणत्याही पर्यटक, निसर्गप्रेमी किंवा अभ्यासकानं घ्यायलाच हवी.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील किनारी तालुक्यांचं वैशिष्टय़ आहे तेथील नसíगक अधिवासांचं वैविध्य! थोडय़ा उंचीवर असलेल्या सडय़ांच्या (सपाट पठारी प्रदेश) टोकाला आल्यावर समोर विहंगम दृश्य आपल्या स्वागताला तयार असतं. उतारावरील घनदाट दमट पानझडी जंगल व खालच्या दरीतील बागायती आणि बाजूनं खाडीला जाऊन मिळणारी एखादी नदी आपल्याला खुणावत असते. कधीकधी समोर अथांग समुद्रही दिसतो. हे सडे उन्हाळय़ात बऱ्यापकी उजाड दिसतात, परंतु तेथील सरपटणारे प्राणी व पक्षिजीवन समृद्ध असतं. पावसाळय़ात तर सडय़ांचा कायापालट होतो व सर्वत्र डोळय़ांना सुखावणारी हिरवळ व असंख्य रानफुलं मनाला मोहवून टाकतात. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या(बीएनएचएस) अभ्यासातून हे स्पष्ट झालंय, की सडय़ांवरील अनेक वनस्पती दुर्मिळ व प्रदेशनिष्ठ (फक्त याच प्रदेशात सापडणाऱ्या) आहेत.
उतारावरील दाट जंगलात इतर अनेक पक्ष्यांच्या जाती दिसतात. बहुतेक ठिकाणी जंगल व आमराया मिळून एक सलग अधिवास तयार झालेला असतो. खाडय़ांजवळ खारफुटींच्या जंगलांची सीमारेषा या अधिवासांना लागूनच असते. शिवाय येथील निसर्गात पाणथळी व किनाऱ्यावरील पक्ष्यांची भर पडते. ‘बीएनएचएस’च्या अभ्यासात येथील खारफुटी वनांमध्ये काही दुर्मिळ जातीची झाडं पाहण्यात आली आहेत.
समृद्ध निसर्गाचं प्रतीक मानला जाणारा मलबार कवडय़ा धनेश (पाइड हॉर्नबिल) रत्नागिरी शहरातसुद्धा सहज दिसतो. पावस रस्त्यावर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात आंब्याच्या झाडांवर रोज संध्याकाळी येऊन बसणारी जोडी मी तीन-चार वेळा पाहिली आहे. ते आल्याची माहिती त्यांच्या कर्कश आवाजानं लगेच मिळते. नजीकच्या परिसरात त्यांना घरटी करण्यायोग्य ढोली असलेली मोठी झाडं आहेत याचं हे लक्षण आहे. शिवाय अनेक प्रकारची फळं मुबलक प्रमाणात मिळत असल्यानं रत्नागिरीकरांना त्यांचं दर्शन नित्याचं आहे. याच परिसरात पाकोळय़ा (स्विफ्ट), बुलबुल, दयाळ (मॅगपाय रॉबिन), पांढऱ्या छातीचा खंडय़ा(व्हाइट-थ्रोटेड किंगफिशर), तांबट (कॉपरस्मिथ बाब्रेट), सुभग (आयोरा) व धाकटा खंडय़ा (स्मॉल ब्लू किंगफिशर) सारखे पक्षी आंबा, सावर व चांदणच्या झाडांवर सहज दिसतात.
साखरतरचा पूल ओलांडून आपण आरे-वारे माग्रे जयगडला जाणाऱ्या सागरी मार्गानं जाऊ लागलो की समुद्र, सुरुची बनं, नारळीच्या बागा, सडय़ांवरून दिसणारी विलोभनीय दृश्यं व डोंगरांवरील जंगल यांच्या जोडीला अनेक प्रकारचे पक्षीही दर्शन देतात. वारे गावालगत किनाऱ्यावरील डोंगराच्या बाजूनं जाताना ब्राह्मणी घारी हमखास दिसतात. रत्नागिरी व गुहागर तालुक्यांच्या हद्दीवर खाडी किनारी असलेल्या जयगड किल्ल्यावरून उजव्या बाजूला पाहिल्यास अतिशय सुंदर दृश्य दिसतं. तेथील सडय़ाच्या कडेला दाट आमराई व जंगल आणि खाडीपलीकडे वेळणेश्वरचा हिरवागार परिसर पाहून डोळय़ांचं पारणं फिटतं. डाव्या बाजूला पाहिल्यास ऊर्जा प्रकल्प व नवीन बंदराचा पसारा दिसतो.
हा किल्लादेखील पक्ष्यांचा लाडका आहे. अलीकडेच पावसाळी वातावरणात मी किल्ल्यावर पाच मलबार कवडे धनेश एका झाडावरून दुसऱ्यावर उडत जाताना पाहिले. त्याशिवाय सुभग, लाल पाठीची िभगरी (रेड-रंप्ड स्वॅलो), दयाळसारखा दिसणारा लहानसा चिरक (इंडियन रॉबिन), हिरवा वेडा राघू (ग्रीन बी-इटर), लाल गालाची टिटवी (रेड-वॉटल्ड लॅपिवग), जंगल मना व हळद्या असे इतर पक्षीसुद्धा हजेरी लावून गेले. येथील तटबंदीवर व आसपासच्या रानात लंगुर वानरांचा राबता असतो.
समृद्ध खारफुटी
सबंध कोकणकिनारा खारफुटी वनांची विविधता व विस्तार यांकरिता प्रसिद्ध आहे. बृगेरा, रायझोफोरा, अ‍ॅव्हिसिनिया, सोन्नेरेशिया, कंडेलिया व एक्सोसेरिया या प्रजातींच्या खारफुटी रत्नागिरी परिसरात कासारी, शिरगाव, कशेळे व अणसुरेसारख्या ठिकाणी विस्तीर्ण क्षेत्रात आहेत. जयगडजवळच्या सत्कोंडी भागात ‘झायलोकार्पस ग्रॅनाटम’ ही दुर्मिळ खारफुटीची जात आढळली आहे. अणसुरेजवळील खारफुटी तर अगदी अस्पर्श आहेत. खारफुटी व दमट पानझडी वनांच्या सीमारेषेवरील भागात टकाचोर (ट्रीपाय), लाल साकोत्री (रेड स्परफाउल), बलाकचोच खंडय़ा (स्टॉर्क-बिल्ड किंगफिशर), नवरंग (इंडियन पिट्टा), लाल मिशीचा (रेड-व्हिसकर्ड) बुलबुल, काळटोप मुनिया, जांभळय़ा पाठीचा िशजीर (पर्पल-रंप्ड सनबर्ड), मलबार कवडय़ा धनेश, भारद्वाज, तारवाली िभगरी (वायर-टेल्ड स्वॅलो), मराल बदक (लेसर व्हिसिलग डक), पाणकोंबडी व तुरेवाला सर्पगरुड (क्रेस्टेड र्सपट ईगल) यांसारखे पक्षी पाहायला किंवा ऐकायला मिळतात.
एकमेकांत गुंफलेल्या जंगल व सडय़ांच्या अधिवासात ठिपकेवाला कवडा (स्पॉटेड डोव्ह), तुरेवाला ससाणा-गरुड (क्रेस्टेड हॉक ईगल), पावशा (हॉक कक्कू), चंडोल (लार्क), समशेर सातभाई (सिमिटर बॅबलर) कुतुर्गा (ब्राऊन-हेडेड बाब्रेट), तपकिरी सुतारपक्षी (रुफस वूडपेकर) व अ‍ॅशी प्रीनिया (करडा वटवटय़ा) यांसारखे पक्षी जागोजागी दिसतात. पावसाळय़ापूर्वी चातक (पाइड क्रेस्टेड कक्कू) व त्याचे आवाज आपल्या स्थलांतरित अस्तित्वाची जाणीव करून देतात. पावसाळय़ात आलं, की उतारावरील आमराया त्यांच्या लालसर तपकिरी पालवीमुळे लांबूनही लक्षात येतात. इथं जंगल व आमराया यांचा समतोल पूर्वीप्रमाणे राखणं आवश्यक आहे. आडिवरे ते जैतापूर पट्टय़ातील जंगलात स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बिबटय़ा, भेकर, ससा, रानडुक्कर, वानर व अध्येमध्ये फिरस्ता गवाही दृष्टीस पडतो. आंबोलगडजवळच्या सडय़ावर मी अलीकडेच भरदिवसा आपली झुपकेदार शेपटी मिरवत चाललेला कोल्हा पाहिला.
हे सगळे डोळय़ांना व मनाला सुखावणारे जैवविविधतापूर्ण अधिवास टिकवायचे असतील तर शाश्वत विकास, पर्यावरणस्नेही पारंपरिक ग्रामीण जीवनशैली व तालुक्याच्या ठिकाणीच आटोपशीर नागरीकरण या गोष्टी नियोजनात व कृतीत आणणे नितांत आवश्यक आहे. अलीकडेच या परिसरात एका छोटय़ाशा गावातील निसर्गपूर्ण व्यवहार पाहून एक परदेशी अभ्यासक उत्स्फूर्तपणे म्हणाला, ‘हाऊ सस्टेनेबल!’ भविष्यात येथील निसर्ग अनुभवायची संधी हवी असेल तर आज ही ‘सस्टेनेबल’ जीवनशैली टिकवायलाच हवी.

  अतुल साठे atulsathe@yahoo.com

Story img Loader