खोपोली, पनवेल परिसरातील माणिकगड हा एका दिवसाच्या भटकंतीसाठी चांगला पर्याय. कमी श्रमाची, निसर्ग सहवास देणारी ही दुर्गभ्रमंती लक्षात राहणारी ठरते.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या प्रवासात रस्त्याच्या आजूबाजूला दिसणारे गिरिदुर्ग हा ट्रेकर्ससाठी कायमच कौतुकाचा विषय असतो. लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या पुणे जिल्ह्य़ातील किल्ल्यांनंतर थेट पनवेल जवळ येऊ लागले की प्रबळगड, कलावंतीणदुर्ग, ईर्षांळगड, कर्नाळा या रायगड जिल्ह्य़ातल्या बुलंद किल्ल्यांकडे खऱ्या भटक्यांची आपोआपच नजर जाते. पण या किल्ल्यांच्या यादीमधला एक किल्ला मात्र आजही उपेक्षेचे चटके सोसत उभा आहे. कर्नाळय़ावरून आपल्या पहाडावरच्या सुळक्यामुळे आणि घुमटासारख्या भव्य आकारामुळे सहज लक्ष वेधणारा हा किल्ला म्हणजे माणिकगड. रायगड जिल्ह्य़ातील आडवाटेवरचा पण अतिशय देखणा दुर्ग!
माणिकगडाला पुण्याहून जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पुण्याहून बोरघाट उतरून आपण खोपोली माग्रे जुन्या मुंबई-पुणे रस्त्याने मुंबईच्या दिशेने जायला लागलो की चौक फाटा लागतो. या फाटयावरून चौक गावामाग्रे माणिकगड पायथ्याचे वडगाव फक्त ८ किलोमीटरवर आहे. चौक माग्रे न गेल्यास पुढे पनवेलच्या अलीकडील रसायनी गावामाग्रेही माणिकगडाच्या पायथ्याला पोहोचता येते. रसायनी गावातून चांभार्ली, बोरीवली माग्रे माणिकगड पायथ्याच्या वडगावात जाता येते.
माणिकगडावर प्रथमच जात असल्यास गावातील एखादा वाटाडय़ा बरोबर घेणे चांगले. वडगावच्या शेतामधून काही काळ चालल्यानंतर लगेचच खडय़ा चढणीला सुरूवात होते. काही वेळातच एक पठार लागतं. या पठारावरून दिसणारा माणिकगडाचा भव्य आणि बुलंद आकार अविस्मरणीय आहे. त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारे पहाडांचे लांबलचक पदर केवळ अप्रतिम! या पठारावर पूर्वी धनगरवाडय़ाची वस्ती होती. सध्या तिथे फक्त शाळेची इमारत उभी असून इथूनच माणिकगडाच्या घनदाट जंगलाला सुरूवात होते. किल्ल्याचा डोंगर डावीकडे ठेवत जंगलातून जाणारी ही पायवाट परिसरातील कातकरी लोकांच्या वावरामुळे बऱ्यापकी मळलेली आहे. सुमारे दोन तासांच्या या पायपिटीनंतर आपण माणिकगडाच्या बरोबर मागच्या बाजूला येऊन पोहोचतो. या मार्गावरून जाताना डावीकडे एक मारूती मंदिर आहे. धनगरवाडय़ापासून इथपर्यंतचा हा प्रवास संपूर्णपणे सरळसोट असून मधे कुठेही चढण नाही. पण या संपूर्ण पायपिटीमध्ये माणिकगडाचे हिरवेगार जंगल आणि प्रत्येक टप्प्यावर बदलत जाणारा त्याचा आकार मनाला समाधान देतो. माणिकगडाच्या मुख्य पहाडावर डावीकडे एक आणि उजवीकडे एक असे सुळके आहेत. पैकी डावीकडच्या सुळक्याला ‘माणिकची िलगी’ असे नाव आहे. किल्ल्याचा मुख्य डोंगर आणि हा सुळका यांच्यातील घळीतून किल्ल्यावर जाण्यासाठी एक अवघड वाट आहे. पण ती कसलेल्या ट्रेकर्ससाठीच. आपण आपला राजमार्ग धरत किल्ल्याला पूर्णपणे वळसा घालत पुढे निघावे. माणिकगड व त्याच्या शेजारचा डोंगर यांच्या िखडीतून ही वाट किल्ल्यावर पोहोचते. किल्ल्याच्या या बाजूच्या कडय़ावर दोन भग्नावस्थेतील बुरूज आणि तटबंदीचे अवशेष आहेत. गडावर प्रवेश करताच स्वच्छ पाण्याचं टाकं लागतं. या टाक्यावरून पुढे भग्न तटबंदीवरून आपण लगेचच माथ्यावर पोहोचतो. डावीकडे चुन्याचा घाणा दिसतो. या घाण्याच्या समोरच माणिकगडाच्या प्रवेशद्वाराची चौकट अद्याप तग धरून आहे. तिच्या माथ्यावर गणेशपट्टी कोरलेली आहे. त्याच्याच शेजारी एक घुमटीवजा देऊळ आहे. या दरवाजातून आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो, की वडगावातून निघाल्यापासूनच्या सुमारे अडीच ते तीन तासाच्या सलग पायपिटीचे सार्थक होणे म्हणजे काय याची प्रचिती येते.
सरत्या पावसाळय़ात सोनकीच्या पिवळयाधमक फुलांनी पूर्णपणे बहरलेल्या माणिकगडाच्या माथ्यावरचा थंडगार वारा हा एक भन्नाट अनुभव आहे. किल्ल्याच्या माथ्यावर बांधकामाचे भग्नावशेष असून या जोत्यांच्या शेजारून वाट खाली उतरायला लागते. सुरूवातीला खोदीव पावटयांचा एक रस्ता खाली उतरतो. पाण्याची काही टाकी व खडकात खोदलेले एक शिवलिंग इथे दिसते.
माणिकगडाचा माथा आटोपशीर असल्याने साधारणपणे तासाभरात किल्ला बघून होतो. माणिकगडाच्या माथ्यावरून कर्नाळा, ईर्षांळगड, माथेरान, प्रबळ-कलावंतीणगड, सांकशी या किल्ल्यांचे दर्शन घडते. पुण्याहून एका दिवसात पाहता येण्यासारखा माणिकगड हा ट्रेकर्सना एक उत्कृष्ट पर्याय आहे. लांबून बघताना जरी माणिकगड त्याच्या भव्य आकारामुळे चढायला अवघड वाटत असला तरी प्रत्यक्षात सोपा असून थंडीतल्या निवांत भटकंतीसाठी असा किल्ला पनवेल परिसरात शोधूनही सापडणार नाही.