सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भटक्यांची पावले नेहमीच रेंगाळलेली असतात. कुठलातरी एखादा गिरिदुर्ग, एखादे शिखर, उभा सुळका, खोल कडा नाहीतर जंगलात हे हरवणे असते. पण या जोडीनेच या सह्य़ाद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरणाऱ्या घाटवाटा देखील भटक्यांच्या जगात स्वत:ची ओळख ठेवून असतात. रायगड भोवतीच्या अशाच काही घाटवाटांची ही भटकंती!
राजांचा गड आणि गडांचा राजा, पूर्वेचे जिब्राल्टर आणि तमाम दुर्गप्रेमींचे श्रद्धास्थान म्हणजे शिवतीर्थ रायगड! महाडपासून २० किलोमीटरवर एका सुटावलेल्या पर्वतावर वसलेला हा किल्ला. त्याची उंची समुद्रसपाटीपासून २९०० फूट. चहूबाजूने खोल कडे, यातून तो पायऱ्यांचा मार्ग गडावर पोहोचतो. रायगडाकडे येण्यासाठी महाडकडून येणारी वाट म्हणजे धोपटमार्ग. पण खरे भटके रायगडाकडे निघाले, की भोवतीच्या डोंगरदऱ्यातील आडवाटांवर उतरतात. डोंगरातील या आडवाटा जातीच्या भटक्यांच्या आवडत्या जागा. यातीलच काही वाटांवर आज पावले टाकूयात.
रायगडावर गेलो, की त्याच्या भोवतीने सह्य़ाद्रीचा मोठा पसारा पुढय़ात उभा राहतो. या दऱ्याखोऱ्यांमधून काळ आणि गांधारी नदी वाहते. जणू या रायगडाच्या सख्ख्या भगिनी. त्यांच्या रक्षणाचीच जबाबदारी हा रायगड युगानुयुगे वाहतो आहे. या नद्यांच्या खोऱ्यात अडकलेली नजर मग वर डोंगररांगेवरून फिरू लागली, की अनेक गिरी-दुर्गशिखरे ओळख देऊ लागतात. या गिरिशिखरांच्या सान्निध्यातूनच काही घाटवाटा गेली अनेक शतके रायगडाकडे धावत आहेत. सिंगापूर नाळ, बोराटय़ाची नाळ, बोचे घोळ आणि कावल्या घाट या त्या वाटा. या प्रत्येक वाटेवरची भटकंती निराळी, थरार निराळा. रायगडाला समोर ठेवत यातील कुठल्याही वाटेवर उतरले, की भटक्यांना वेगळय़ा जगात गेल्याचे समाधान मिळते.
यातील पहिला मार्ग तोरणा गडाच्या पाठीमागून कोकणात उतरतो. यासाठी तोरण्यापाठीमागच्या कोदापूर गावी मुक्कामी दाखल व्हायचे. दुसऱ्या दिवशी हारपुड, मोहरीमार्गे पुढे रायगडाकडे निघालो, की सिंगापूर आणि बोराटय़ाची नाळ अशा दोन घाटवाटा भेटतात. यातील पहिली ऐन घाटमाथ्यावरील छोटय़ाशा सिंगापूर गावाजवळून खाली उतरते. या गावावरूनच तिला सिंगापूर नाळ असे म्हणतात. ही सिंगापूर नाळेची वाट उतरावयास थोडीशी निर्धोक. यातला ‘थोडीशी निर्धोक’ हा शब्द अन्य वाटांच्या तुलनेत आहे, बर का? मोहरी गाव सोडल्यावर लगेचच या नाळेचा मार्ग सुरू होतो. दोन्ही अंगाने डोंगर आणि त्याच्या पोटातून जाणारा हा मार्ग. हा मार्ग उतरून खाली आले, की आपण कोकणातील पाणे गावात दाखल होतो. या गावात मुक्काम करत पुढे छत्री निजामपूर, रायगडवाडीमार्गे रायगडावर दाखल होता येते. दुसरा मार्ग मोहरी गावापासूनच सुरू होतो. याला बोराटय़ाच्या नाळेचा रस्ता असे म्हणतात. सिंगापूरच्या नाळेच्या तुलनेत ही वाट उतरावयास अवघड. यामुळे गिर्यारोहणाचे प्राथमिक धडे, थोडाफार सराव आणि तज्ज्ञ-अनुभवी डोंगरमित्र सोबत असल्याशिवाय या वाटेने उतरण घेतल्यास त्याचा फायदा होतो. ही नाळ आणि त्यातून खाली उतरणारी ही वाट
म्हणजे मोठमोठय़ा शिळांनी भरलेला ओढाच आहे. शिळा, प्रस्तर, पाण्याचे डोह, दोन्ही बाजूस किर्र्र रान या साऱ्यांचा सामना करत आणि त्याचे आव्हान घेत ही वाट खाली उतरावी लागते. म्हणूनच ही नाळ उतरताना हाताशी पूर्ण दिवस असणे गरजेचे. अन्यथा ऐन नाळेत मुक्काम करण्याची वेळ येऊ शकते, हे स्वानुभवावरून सांगतो. याच बरोबरीने आणखी एक मार्ग या घाटमाथ्यावरून रायगडाकडे उतरतो. या वाटेवर येण्यासाठी अगदी सुरुवातीला पानशेत गाठायचे. पानशेत धरणाच्या काठाकाठाने माणगावला पोहोचायचे. माणगावच्या पुढचा सारा मार्ग हा ऐन घाटमाथ्यावरचा. सुरुवातीलाच लागते ते ‘खानुचा डिग्गा’ नावाचे गिरिस्थळ. डोंगरदऱ्यातील नावे ही अशीच असतात. हा खानुचा डिग्गा ओलांडला, की आपण समोरच्या नाळेतून खाली उतरू लागतो. पण ही वाटही उतरायला अवघड. खोल उतरंड, सारा घसारा. यामुळे कैक वर्षांपासून येणारा प्रत्येक जण त्याचे बुड टेकवतच खाली उतरतो. यातूनच मग या वाटेला नावही मजेशीर मिळाले, ‘बोचे घोळ’! मनावर ताण आणणारी आणि शरीराचा घाम काढणारी अशी ही वाट. ती उतरलो, की आपण थेट तळातील वारंगी गावात दाखल होतो. मग पुढे पुन्हा मागच्या वाटेप्रमाणेच छत्री निजामपूर, रायगडवाडीमार्गे रायगड गाठायचा.
* सिंगापूर, बोराटय़ाची नाळ, बोचे घळ, कावल्या घाट
* घाटमाथ्यावरून कोकणात उतरणाऱ्या घाटवाटा
* पुणे जिल्ह्य़ातून रायगडकडे उतरतात
* या घाटवाटा ते रायगड प्रत्येकी ३ दिवसांचा ट्रेक
* या वाटांवरील भटकंतीसाठी गिर्यारोहण सराव हवा
* माहितगार सोबत असावा
* पावसाळा आणि प्रखर उन्हाळा वगळता अन्य उत्तम काळ
* साहसाची अनुभूती आणि निसर्गाचे सुंदर दर्शन
या डोंगरदऱ्यात आणखी एक वाट रायगडच्या दिशेने धावते. यासाठी पानशेत धरणाशेजारच्या घोळ गावी मुक्कामी यायचे. दुसऱ्या दिवशी या घोळमधून गारजाईवाडी करत कोकणदिवा गडाला नमस्कार घालत कावल्या घाटात पाऊल ठेवायचे. गच्च रानातली ही वाट सांदोशी गावात उतरते. सांदोशीत उतरले, की रायगडवाडी आणि वाडीतून पुढे गडावर स्वारी.
या साऱ्याच वाटा डोंगरदऱ्यातून धावणाऱ्या. आडवळणाच्या, झाडी-झुडपातून, डोंगरदरीतून, ओढय़ा-नाल्यांतून, दगड-धोंडय़ातून वाट काढणाऱ्या. साहसावर स्वार होणाऱ्या. यातील कुठल्याही मार्गे रायगडची वारी करायची असेल, तर हाताशी किमान तीन दिवस हवेत. सोबतीला माहितगार आणि गिर्यारोहणाचे थोडेसे ज्ञान-अनुभव हवा. हे सारे असेल तर या असल्या डोंगरवाटांवर नक्की पाऊल ठेवा. ती उतरता-उतरताच सह्य़ाद्रीचे जे विलोभनीय दर्शन घडेल ते कायमचे मनात साठून राहील. उरात जो आनंद भरेल तो अविस्मरणीय असेल. या साऱ्यालाच साठवत यापैकी एखादी डोंगरवाट उतरायची आणि रायगड गाठायचा. हे सारे कष्ट घेत रायगडावर दाखल झाले आणि गडावरून आपण उतरून आलेल्याच त्या डोंगरदऱ्या पाहिल्या, की घेतलेल्या साऱ्या श्रमांचे चीज झाल्यासारखे वाटते.
निनाद थत्ते