हिमालय म्हटले, की सध्या सगळय़ांच्या डोळय़ांपुढे उत्तराखंड आणि तिथली आपत्ती उभी राहात आहे. या नैसर्गिक प्रकोपाने जणू साऱ्या देशावरच संकट कोसळले आहे. या आपत्तीत मदत करण्यासाठी सामान्य प्रशासनापासून ते लष्करापर्यंत साऱ्या यंत्रणा सरसावल्या असताना या बचावकार्यात गिर्यारोहणाचे दोरही अनेक ठिकाणी बांधले गेले. पुण्याच्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेने उत्तराखंडमधील पिठोरगड जिल्हय़ात केलेल्या मदतकार्यामुळे समाजात एक नवा आदर्श उभा राहिला आहे आणि ‘गिर्यारोहणा’लाही काही सामाजिक मूल्ये बहाल केली आहेत.गिर्यारोहण क्षेत्रात ‘गिरिप्रेमी’चे नाव सर्वत्र आदराने घेतले जाते. एव्हरेस्ट-ल्होत्सेसारख्या अनेक मोहिमा, सहय़ाद्रीतील पदभ्रमण, नव्या पिढीसाठी गिर्यारोहण शिक्षण आणि असंख्य सामाजिक उपक्रमांमधून या संस्थेने हा क्रीडाप्रकार समाजाभिमुख केला आहे. संस्थेच्या या नावलौकिकामधूनच उत्तराखंड आपत्तीत ‘गिरिप्रेमी’ला मदतीची हाक देण्यात आली आणि संस्थेचे गिर्यारोहक या सामाजिक जाणिवेतून नोकरी-व्यवसाय बाजूला ठेवत या राष्ट्रीय मदतकार्यात धावून गेले.
उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या या पथकात आशिष माने, आनंद माळी, भूषण हर्षे, गणेश मोरे, टेकराज अधिकारी, कृष्णा ढोकळे (सर्व एव्हरेस्टवीर), अभिजित देशमुख, अतुल मुरमुरे, कौस्तुभ ठकार, मनोहर लोळगे आणि डॉ. प्रियादर्श तुरे, डॉ. अनिकेत कांबळे हे दोघे डॉक्टर सहभागी झाले होते. ‘गिरिप्रेमी’च्या या मदतकार्यास ‘स्वरूपसेवा’ आणि ‘मैत्री’ या दोन संस्थांनी मदत केली, तर उत्तराखंडमधील ‘अर्पण’ या संस्थेने त्यांच्या मदतकार्याचे समन्वयाचे काम पाहिले.
उत्तराखंडचा सारा भूप्रदेश हा अतिउंचीवरील आणि पर्वतीय आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या राज्याचा हा भूगोलच इथल्या आपत्तिनिवारणात मोठा अडथळा ठरला होता. अति उंची-डोगराळ भागातील या मदतीसाठी गिर्यारोहणाचे तंत्र काही ठिकाणी वापरण्याचे ठरले आणि यातूनच पिठोरगड जिल्हय़ात ‘गिरिप्रेमी’चे हे मदतकार्य पार पडले.पिठोरगड हा उत्तराखंडमधील दुर्गम असा जिल्हा. या भागातूनच कैलास-मान सरोवर यात्रेचा भारताकडील मार्ग जातो. उत्तराखंडमध्ये आपत्ती कोसळताच साऱ्यांचे लक्ष चारधाममुळे बद्रिनाथ, केदारनाथकडे वळले होते. मदतीचा ओघही याच भागात सर्वाधिक होता. या पाश्र्वभूमीवर पिठोरगडसारख्या दुर्लक्षित भागात मदतकार्याची ‘गिरिप्रेमी’ला जबाबदारी देण्यात आली.
ढगफुटीनंतर या सर्व भागांत मोठय़ा प्रमाणात भूस्खलन (लँड स्लाइड) झाले होते. रस्ते तुटले होते, पूल वाहून गेले होते. दळणवळण, संपर्कव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती. हजारो लोक डोंगरदऱ्या, नद्यांच्या पात्रात अडकले होते. या अशा दुर्गम जागी अडकलेल्यांचा शोध घेणे, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणे, दोर-शिडय़ांच्या साहाय्याने त्यांची सुटका करणे, तात्पुरते रस्ते- मार्ग तयार करणे, पूल उभे करणे आदी कामांत ‘गिरिप्रेमी’ने आपला मदतीचा हात दिला.
केवळ गिर्यारोहणातील दोरीच्या साहाय्याने या भागात अडकलेल्या अनेकांची या गिर्यारोहकांनी सुटका केली. रस्ते तुटले, तिथे दोरीचे तात्पुरते मार्ग तयार केले. पर्वत-डोंगरावर खाली-वर करण्यासाठी लाकडी शिडय़ांचे मार्ग केले आणि दगडी भराव-लोखंडी जलवाहिन्यांच्या मदतीने आपत्कालीन पूल उभे केले. तब्बल एक आठवडाभर सुरू असलेल्या या मदतकार्यातून शेकडो लोकांची सुखरूप सुटका झाली. अनेक गावांचे तात्पुरते दळणवळण सुरू झाले. ‘गिरिप्रेमी’च्या या कामाची दखल घेत स्थानिक राज्य प्रशासन आणि भारतीय लष्कराने या गिर्यारोहकांचा गौरव केला. गिर्यारोहण हा काही स्वान्तसुखाय असा खेळ-छंद नाही. तर या खेळाला, तंत्रालाही सामाजिक बांधिलकी, मूल्यांचा परिघ आहे. त्याच्या प्रत्येक पावलात राष्ट्रीयत्वाची भावना आहे. ‘गिरिप्रेमी’ने त्यांच्या या उत्तराखंड मोहिमेतून हेच दाखवून दिले आहे.
‘गिर्यारोहण’मदतीला धावले
हिमालय म्हटले, की सध्या सगळय़ांच्या डोळय़ांपुढे उत्तराखंड आणि तिथली आपत्ती उभी राहात आहे. या नैसर्गिक प्रकोपाने जणू साऱ्या देशावरच संकट कोसळले आहे. या आपत्तीत मदत करण्यासाठी सामान्य प्रशासनापासून ते लष्करापर्यंत साऱ्या यंत्रणा सरसावल्या असताना या बचावकार्यात गिर्यारोहणाचे दोरही अनेक ठिकाणी बांधले

First published on: 03-07-2013 at 09:31 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mountaineer helped to uttarakhand flood effected peoples