गड-किल्ले हे महाराष्ट्राचं एक अनोखं भूषण व अमूल्य ठेवा आहे, हे आपण जाणतोच. सुमारे ४०० किल्ल्यांच्या अस्तित्वामुळे महाराष्ट्र संपूर्ण देशात याबाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. शिवरायांच्या स्फूर्तिदायी आणि विजयी इतिहासाचे महाराष्ट्रातील बरेच किल्ले साक्षीदार आहेत. आज ऐतिहासिक, पर्यटन-विषयक आणि वास्तुशास्त्रीय अशा विविध अंगी आपल्या किल्ल्यांचं महत्त्व निर्विवाद आहे. कोकणातील सिंधुदुर्गपासून विदर्भातील गाविलगडपर्यंत, खानदेश सीमेवरील साल्हेरपासून दक्षिण महाराष्ट्रातील पन्हाळगडपर्यंत आमि मराठवाडय़ात नळदुर्गपासून देवगिरीपर्यंत हे दुर्गरूपी शिलेदार आजही दिमाखाने उभे आहेत. शिवाजी महाराज हे मध्ययुगीन भारतातील पहिलेच राजे होते, ज्यांनी सागरी सामर्थ्यांचं महत्त्व जाणलं आणि इथे आपल्या जलदुर्गांची कहाणी सुरू होते!
सागरी किल्ल्यांच्या तत्कालीन सामरिक माहात्म्याबद्दल आपण इतिहास वाचला आहेच. आज या जलदुर्गावरील व आसपासच्या समृद्ध निसर्गाबद्दल आणि पर्यावरणीय महत्वाबद्दल आपण जाणून घेऊ. वनस्पती, पक्षी, प्राणी आणि जलचर अशा सर्व प्रकारच्या जैवविविधतेने जलदुर्गांचे परिसर आणि संपूर्ण कोकण किनारा संपन्न आहे. तेथील निसर्ग संपत्तीचं महत्त्व नीट समजून घ्यायचं असेल तर संपूर्ण परिसराचा एकत्रित आढावा घ्यावा लागेल. त्याचबरोबर हे लक्षात घेतलं पाहिजे, की या जैवविविधतेला अनेक धोके भेडसावत आहेत आणि या नैसर्गिक ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आपण केलेच पाहिजे.
वनस्पतींचं भांडार
जलदुर्गावर आणि त्यांच्या आसपास भूमीवरील, किनारी तसेच सागरी वनस्पतीचं जणू भांडारच आहे. कोकणातील भूमीवरील आंबा, फणस, जांभूळ, काजू, ताड, नार आणि करवंद अशा मधुर फळे देणाऱ्या झाडांबरोबरच भेंड, पिंपळ, वड, उंबर, उंडी, सावर, कराई, चाफा, बोलींमाड, सुरू, साग, घाणेरी आणि रुई अशा विविध वनस्पती आणि वृक्ष यांनी आपले जलदुर्ग आणि लगतचे परिसर सजलेले आहेत. अनेक किल्ल्यांवरील तळ्यात आणि खडकांवर उगवलेले शेवाळ, तसेच निरनिराळ्या प्रकारचे गवत आणि नेचेसुद्धा आपले लक्ष वेधून घेतात. काही किल्ल्यांवर निवडुंग उगवलेले दिसते.
किनाऱ्याला असलेल्या जलदुर्गावर तर विविध वृक्ष सर्रास आढळतातच, परंतु सिधुदुर्ग किंवा जंजिरासारख्या पाण्याने वेढलेल्या किल्ल्यांवर सुद्धा पक्ष्यांच्या विष्ठेतून पडलेल्या बिया किंवा माणसांनी केलेली लागवड यामुळे यातील अनेक वृक्ष सापडतात. मुंबईतील शिवडीच्या किल्ल्यावरील उंडीची झाडे आणि सिंधुदुर्गावरील विपुल संख्येने असलेली नारळाची झाडे लगेच लक्षात येतात. वसईच्या किल्ल्यातील नारळ आणि ताडाची गर्द राई तर एखाद्या घनदाट जंगलाचा आभास निर्माण करते!
किनारी वनस्पतीमध्ये खारफुटी अथवा सुंद्रीची वने आणि त्यांच्याशी निगडित इतर कुळातील झाडं अतिशय महत्त्वाची आहेत. कोकण किनाऱ्यावर, विशेषत: खाडय़ा व नद्यांच्या मुखाशी, खारफुटी अजूनही अनेक ठिकाणी समृद्ध आहे. वसई, गोपाळगड, जयगड व विजयदुर्ग किल्ल्यांच्या लगतच्या खाडी किनाऱ्यांवर विस्तृत प्रदेशावर खारफुटीची जंगले आहेत. लाटा व वाऱ्यापासून किनाऱ्याचे रक्षण, माशांची पैदास होण्याचं ठिकाण आणि पक्षी व उभयचर जीवांचा अधिवास अशी खारफुटीच्या उपयोगांची यादी न संपणारी आहे.
खारफुटीच्या पुढे समुद्राच्या बाजूला अनेक ठिकाणी चिखलाची मैदाने व त्यापुढील उथळ समुद्रात विविध प्रकारच्या सागरी पाणवनस्पती विपुल प्रमाणात आढळतात, ज्यावर असंख्य जलचर आणि पक्षी पोसले जातात. अनेक ठिकाणी जलदुर्ग या अधिवासामध्ये जणू काही त्याचाच एक भाग बनून उभे आहेत.
पक्ष्यांचे नंदनवन
जंगलं, खारफुटी आणि समुद्र किनारे अशा विविध अधिवासांमध्ये राहणाऱ्या असंख्य पक्ष्यांचे वास्तव्य जलदुर्ग व त्यांच्या आसपास दिसून येतं. किल्ला किनाऱ्याला लागून असो किंवा पाण्याने वेढलेला असो. पक्ष्यांना अन्न किंवा निवाऱ्याच्या शोधात तिथे विनासायास जाता येते. टिटवी, कोकीळ, पाकोळी, घार, ब्राह्मणी घार, पोपट, साळुंकी, कावळा, कबूतर, कवडा, चिमणी, कोतवाल आणि भिंगरी यासारखे पक्षिगण जलदुर्गावर अनेकवेळा दिसतात. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील मधल्या झुडपी गवताळ मैदानात लाल गालाच्या टिटव्या नेहमीच आपल्या कलकलाटाने आपलं लक्ष वेधून घेतात. मोटरबोटने किल्ल्यावर जाताना मला एकदा इजिप्शियन गिधाड दिसले होते. त्याशिवाय जलदुर्गाच्या आसपासच्या रानात सातभाई, शामा, दयाळ, करडा धनेश, मलबार धनेश, थोरला धनेश, मक्षीखाऊ, स्वर्गीय नर्तक, हळद्या, गव्हाणी घुबड, शिक्रा आणि सर्पगरूड यासारखे असंख्य पक्षी दिसतात, तर आसपासच्या गवताळ भागात किंवा सडय़ांवर रातवा, नीळपंख, मुनिया व गप्पीदास यासारखे पक्षी दिसतात.
शिवडी किल्ल्यावरून समोरील चिखलाच्या मैदानावर रोहित (फ्लॅमिंगो) हजारोंच्या संख्येने थंडीत दिसतात. संपूर्ण किनारपट्टीवरील चिखलाच्या मैदानावर व खारफुटी वनांमध्ये (जी अनेक ठिकाणी जलदुर्गाना लागूनच आहेत) रोहित व्यतिरिक्त शेकाटय़ा, बगळा, वंचक, रात्रवंचक, समुद्रपक्षी, सुरय आणि खंडय़ा यांच्या विविध जाती सहज दिसतात. त्याचप्रमाणे कुलाबा आणि जंजिरासारख्या जलदुगार्ंच्या आजूबाजूला जे समुद्र किनारे आहेत, तेसुद्धा स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास आहेत.
सिंधुदुर्ग, पूर्णगड, फत्तेगड, देवगड, वसई, विजयदुर्ग यांसारख्या जलदुर्गाजवळ असलेल्या सुरूच्या वनात शेवारी उर्फ समुद्री गरूड या दिमाखदार पक्ष्याचे वास्तव्य हमखास दिसते. अनेक वेळा हे गरूड किल्ल्यांवर सुद्धा चक्कर मारून जातात. दुर्मिळ अशा पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचं वास्तव्यसुद्धा काही जलदुर्गाच्या जवळच्या, विशेषत: हर्णे ते वेळास परिसरात, सुरू व अन्य वृक्षांवर आढलून आलय.
वन्य प्राण्यांचा आढळ
आज सर्वत्र वन्य प्राणी आणि त्यांचे अधिवास नष्ट होत आहेत आणि कोकणही त्याला अपवाद नाही. परंतु, डोंगर-दऱ्या प्रमाणेच जलदुर्ग आणि आसपासचे सडे, खाडय़ा व रानांमध्येसुद्धा प्राण्यांचे अस्तित्व दिसते. अगदी चिमुकल्या खारीपासून ते बिबटय़ापर्यंत अनेक प्राणी आपली हजेरी लाऊन जातात. रानडुक्कर, दख्खनी माकड, मुंगुस, वटवाघूळ, ससा, रानउंदीर, रानमांजर आणि भेकर हे वन्यजीव जलदुर्गाच्या आसपास असल्याच्या नोंदी आहेत. जलदुर्गाच्या आसपासच्या खाडय़ा व नद्यांमध्ये पाणमांजर मोठय़ा संख्येने वस्ती करून आहेत.
मी स्वत: जयगड परिसरात कोल्हा पाहिला आहे. हर्णेजवळच्या चार जलदुगार्ंच्या परिसरात हनुमान लंगूर
सरपटणारे जीव
किल्ल्याइतकेच प्राचीन असणारे अनेक प्रकारचे सरपटणारे जीव जलदुर्गाच्या आसपासच्या अधिवासामध्ये पाहायला मिळतात. गोडया पाण्यातल्या मगरी कोकणातील बहुतांश नद्या व खाडय़ांमध्ये विपुल आहेत. उदाहरणार्थ- गोवळकोट व गोपाळगडच्या जवळून वाहणाऱ्या वसिष्ठी नदीतून एखादा तास होडीतून फेरफटका मारला तर दोन डझन मगरी सहज दिसतात. तसेच जलदुर्गाच्या परिसरातील सडय़ांवर आणि रानात घोरपड सापडते. सरडय़ांचे निरनिराळे प्रकार जलदुर्ग व सभोवताली आढळून येतात.
जलचरांचा अधिवास
जलदुर्ग समुद्रात किंवा किनाऱ्याला लागून असल्याने जलचरांचा अधिवाससुद्धा तिथे आहे. रत्नदुर्ग, कोर्लई, सिंधुदुर्ग व उंदेरीसारख्या जलदुर्गालगत खडकाळ किनारे आहेत, जिथे खेकडे, कालवं आणि अन्य समुद्री जीव सापडतात. संपूर्ण किनाऱ्यालगत उथळ समुद्रात यांच्या सोबतच असंख्य प्रकारचे मासे, डॉल्फिन, शिंपले व जलचर कृमी मोठय़ा संख्येने आढळतात. हर्णे परिसरातील जलदुर्गाजवळच्या अनेक किनाऱ्यांवर दरवर्षी समुद्री कासवे अंडी घालण्यास येतात व नंतर थंडीत त्यांची छोटी पिल्ले बाहेर पडून पुन्हा समुद्रात जातात. मुंबईच्या बीएनएचएसतर्फे केल्या जात असलेल्या संशोधनात या सर्व अधिवासांच्या समृद्धतेबद्दल नव्याने माहिती हाती येत आहे.
ऱ्हास व संवर्धन
समृद्ध ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा जपणारे जलदुर्ग व आसपासचे परिसर; जे निसर्ग पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, त्यातून मिळणारा स्थानिक रोजगार आणि राष्ट्रीय अभिमान अशा गोष्टींसाठी बहुमूल्य आहेत; तेच आज विविध संकटांना तोंड देत आहेत. काळाच्या ओघात जसे निसर्गावर आघात व झीज होते, तसेच अनेक प्रकारचा विध्वंस मानवनिर्मित आहे.
जलदुर्गावर येणारे पर्यटन जसे स्थानिक रोजगार निर्मिती करतात व समाजात इतिहासाला पुन्हा उजाळा देतात, त्याचप्रमाणे अनेक वेळा निष्काळजीपणाने पर्यावरणाचा ऱ्हाससुद्धा करतात. येताना-जाताना प्लास्टिक, कागद, काचा व धातू या वर्गातील कचरा मोठय़ा प्रमाणावर टाकून जातात. बेशिस्तपणा आणि आपल्या ऐतिहासिक वास्तूंचं पावित्र्य जपण्याबद्दल अनास्था, याचं हे प्रत्ीक आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच मी अलीकडे प्लास्टिकच्या डझनभर बाटल्या तरंगताना पाहिल्या. अशा प्रकारच्या कचऱ्याने परिसर नुसता विद्रूप होतो, असं नाही, तर हा कचरा खाऊन अनेक जलचर जीव व पक्षी मरण्याचा धोका संभवतो. प्रबोधन आणि शिक्षा व दंड अशा दुहेरी हत्याराने हे थांबवणे आवश्यक आहे. सगळ्या जलदुगार्ंजवळ एक निसर्ग व इतिहास माहिती केंद्र निर्माण करून त्या ठिकाणाचं महत्त्व येणाऱ्या लोकांना आधीच शिकवलं गेलं पाहिजे.
इतर ठिकाणाप्रमाणे किनारी भागातसुद्धा पक्ष्यांची शिकार होत असल्याचं आढळून आलय. इतर वन्यजीवांचीसुद्धा शिकार अधूनमधून आढळून येते. अर्निबध वृक्षतोडीमुळे काही किल्ल्यांचे परिसर उजाड व भकास दिसू लागले आहेत. कोर्लई, जंजिरा, रत्नदुर्ग व जयगडसारख्या जलदुर्गाच्या आसपासचा परिसर बऱ्याच प्रमाणात उघडा बोडका दिसू लागला आहे. मातीची धूप होऊन किनारी पर्यावरण नष्ट होणे व खाडय़ात गाळ साचणे हे धोके यामुळे संभवतात. खारफुटीची अर्निबध तोड, विशेषत: मुंबई परिसरातील शिवडी, माहीम, वसई, कुलाबा व घोडबंदरसारख्या जलदुर्गांच्या आसपास दिसून येते. अतिक्रमणामुळे तर मुंबई परिसरातील किल्लयाचं अस्तित्व होतं की काय अशी भीती आहे.
जलदुर्गावरील नैसर्गिक झाडं-झुडपंसुद्धा राखून ठेवायला हवी. कारण तेथील वारशाचा तीसुद्धा अविभाज्य भाग आहेत. तटबंदी किंवा अन्य वास्तूंवरील वड-िपपळ काढायला हवेत. कारण त्यामुळे किल्ल्याचा ऱ्हास होतो. पण नूतनीकरणाच्या नावाखाली बाकीची झाडं-झुडपं पूर्णपणे काढून टाकणं चुकीचं आहे. ठिकठिकाणी गरजेपुरती जागा साफ करून काही सुविधा व डागडुजी (जी किल्ल्याच्या वातावरणाशी मिळती-जुळती आहे) करणे शक्य आहे. अर्निबध चंगळवाद, जी भारतीय परंपरा नाही हा सगळ्याच ठिकाणी मारक ठरत आहे.
जलदुर्ग, खाडय़ा, चिखलाची मैदाने, खडकाळ किनारे, समुद्र, खारफुटी, वन्यजीवन, मासेमारी, पर्यटन, स्थानिक उद्योग, किनारी पर्यावरण व किनारी सुरक्षा अशी एक मानवी आणि निसर्गाची घट्ट वीण आपल्याला कोकणात पाहायला मिळते. यातील सर्व घटक पर्यावरणीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण आहेत. विज्ञान, अर्थकारण आणि अध्यात्म यांची चाणक्यप्रमाणे सांगड घालून जर विकास प्रक्रिया अवलंबली तर जलदुर्ग व किनारी पर्यावरणासोबत सर्वच अमूल्य गोष्टींचे संवर्धन शक्य होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा