सहल, ट्रेकिंग, पदभ्रमण, गिरिभ्रमण, गिर्यारोहण या साऱ्या भ्रमंतीच्या चढत्या भाजण्या आहेत. या साऱ्या प्रवासाचे विश्वच निराळे, याची जीवनशैली निराळी. इथे रुजण्यासाठी, बहरण्यासाठी काही गोष्टींची सवय, अभ्यास, जाणीव, काळजी असावी लागते. या जगातील याच छोटय़ा-छोटय़ा गोष्टींची माहिती देणारी ही चौकट दर पंधरवडय़ाने.
पेहराव
ट्रेकिंगचे जग हे निसर्गाच्या सान्निध्यात, आभाळाच्या उघडय़ा छताखाली आणि डोंगर-दऱ्यांच्या पायवाटेवर धावत असते. तेव्हा या जगात वावरताना पेहरावाला खूपच महत्त्व असते.
* ट्रेकिंग करताना कायम पूर्ण बाह्य़ांचा शर्ट-पॅन्ट घालावी.
* वाटा-आडवाटांवरून, जंगल-झाडीतून भटकंती करताना बिनबाह्य़ांचे शर्ट, तोकडय़ा पॅन्ट (बर्मुडा, थ्रि फोर्थ) घालू नये.
* ट्रेकला जाताना डोक्यावर टोपी आणि पायात बूट असणे आवश्यकच आहे.
* ट्रेक करताना पायात कापडी किंवा खेळाचे बूट घालावेत. या बुटाचे तळवे चांगले असल्याची खात्री करावी. जेणेकरून अवघड वाटेवरून खाली-वर करताना पायांना चांगली पकड मिळेल.
* चप्पल, सँडलवर ट्रेक कराल तर थोडय़ाच वेळात तुमचीच अवस्था फाटकी होईल.
* भर उन्हात फिरताना टोपीबरोबरच एखाद्या मोठय़ा रुमालाने मानदेखील झाकावी.
* मुक्कामी ट्रेकला जाताना मोज्यांचा एखादा जादा जोड बरोबर ठेवावा.
* बाहेर, उघडय़ावर झोपताना पायात मोजे घालून तसेच कान झाकून झोपावे.
* सॅक भरताना रुमाल, नॅपकिन घेण्यास विसरू नका.
* भटकंतीचे स्वरूप पाहून‘गॉगल’बरोबर घ्यावा.ल्ल ट्रेकिंग हा डोंगरदऱ्यातून चालणारा खेळ असल्याने कुठलाही पेहराव हा हलका, कमी वजनाचा असावा. शरीराभोवती घट्ट कपडे घालू नयेत.
ट्रेक च्या वाटेवर!
सहल, ट्रेकिंग, पदभ्रमण, गिरिभ्रमण, गिर्यारोहण या साऱ्या भ्रमंतीच्या चढत्या भाजण्या आहेत. या साऱ्या प्रवासाचे विश्वच निराळे, याची जीवनशैली निराळी.
आणखी वाचा
First published on: 08-01-2015 at 01:04 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the way of trek