जन्मत:च निसर्गसौंदर्याचे लेणे लेऊन आलेला प्रदेश म्हणजे कोकण! लाल माती, माडा-पोफळीच्या बागा, सिंधुसागराची निळाई, प्राचीन कलात्मक मंदिरे, त्या भोवतीचे पाण्याने भरलेले तलाव-पुष्करणी, इतिहास जागवणारे जलदुर्ग आणि या साऱ्यांच्या जोडीला पुन्हा कोकणची खास संस्कृती! कोकणच्या कुठल्याही वाटेवर स्वार झालो, की ही भूमी मनाला अशी जागोजागी भुरळ पाडत असते. कोकणच्या याच वाटा- आडवाटांवरचे निसर्गसौंदर्य, इतिहास-संस्कृतीचा दुर्मिळ खजिना एका पुस्तक मालिकेतून उलगडला आहे – ‘साद सागराची’!
निसर्गप्रेमी आणि भटक्या वृत्तीचे लेखक पराग पिंपळे यांनी कोकणच्या या दस्तऐवजाला सखोल भटकंती आणि अभ्यासातून आकार दिला आहे. ‘साद सागराची’ या एकूण सहा पुस्तकांच्या संचात अगदी अलिबागजवळच्या रेवसपासून ते तळकोकणातील रेडीच्या गणपतीपर्यंत असंख्य स्थळे, त्यांचा भवताल आणि तिथली पर्यटन संस्कृती सामावली आहे. अलिबाग, दिवेआगर-श्रीवर्धन, दापोली, गुहागर-हेदवी, रत्नागिरी-गणपतीपुळे आणि मालवण-तारकर्ली असे हे कोकणांतर्गत सहा भाग आणि त्यावरच्या या सहा पुस्तिका आहेत.
साडेसातशे किलोमीटर लांबीची आमची कोकण किनारपट्टी विविध नद्यांच्या खाडय़ांनी जागोजागी विभागलेली आहे. यातील प्रमुख दोन खाडय़ांच्या मधला प्रदेश म्हणजे या ‘साद सागराची’ पुस्तक मालिकेचा एकेक भाग. ‘छोटा प्रदेश विस्ताराने सांगायचा’ हे इथले सूत्र! यामध्ये त्या-त्या भागातील गड-कोट, प्राचीन मंदिरे, जंगले, नैसर्गिक आकर्षणे, समुद्रकिनारे अशा असंख्य स्थळांची माहिती पुढे येते. शिवाय ही सारी स्थळे, त्यांची माहिती ही त्या-त्या भागातील सहल मार्गानुसार मिळत जाते. फिरणाऱ्याच्या दृष्टीने हे खूपच सोयीचे पडते. या सर्व माहितीमध्ये इतिहासापासून-भूगोलपर्यंत आणि निसर्गापासून संस्कृतीपर्यंत असे अनेक पदर जोडलेले आहेत. या साऱ्यांमागे लेखकाच्या अभ्यास आहे, व्यासंग आहे आणि जातीच्या भटक्याचे कष्ट आहेत. या माहितीला पिंपळे यांनी मार्गदर्शक नकाशे, वेधक छायाचित्रे, उपयुक्त माहिती-सूचनांचीही जोड दिलेली आहे. हे लेखन करण्यापूर्वी हा सारा कोकण त्यांनी दुचाकीवर असंख्य वेळा पाहिलेला आहे. यामुळेही साऱ्या माहितीला अनुभवाची जोड आहे. रस्ते, गावांमधील अंतरे, प्रेक्षणीय स्थळे, पर्यटनाचा चांगला काळ, स्थलवैशिष्टय़ं, आकर्षणे, पथ्ये-सूचना, महत्त्वाचे संदर्भ, सोयीसुविधा अशी मोठी आणि उपयुक्त माहिती या पुस्तकातून आपल्यापर्यंत पोहोचते.
कोकणात आजकाल एखाद्या भागात तीन-चार दिवस भटकण्याचे वेड मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. अशावेळी त्या-त्या भागावरचे हे स्वतंत्र पुस्तक खुपच फायदेशीर, वापरण्यास सोपे आणि सखोल माहिती देणारे ठरते. उत्तम आर्टपेपरवरची निर्मिती आणि पन्नास ते साठ रुपयांपर्यंतची अल्पशी किंमत यामुळे ही खरेदी सर्वार्थाने फायदेशीर ठरते.
आज आपल्याकडे कोकणात भटकणाऱ्यांचे वेड मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. कोकणातील प्रत्येक वाटेवर, स्थळ-वैशिष्टय़ांवर आता पर्यटन चांगलेच बहरले आहे. अशावेळी त्या प्रवासाला, पर्यटनाला चांगली दिशा देण्याचे काम ‘साद सागराची’या पुस्तिका करत आहेत. कोकणच्या वाटेवरचा हा सांगाती ठरला आहे.
(साद सागराची : पराग पिंपळे , संपर्क – ९३७१०१४८८३ )
सांगाती कोकणचा!
जन्मत:च निसर्गसौंदर्याचे लेणे लेऊन आलेला प्रदेश म्हणजे कोकण! लाल माती, माडा-पोफळीच्या बागा, सिंधुसागराची निळाई, प्राचीन कलात्मक मंदिरे, त्या
First published on: 06-11-2013 at 07:47 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Picnic place kokan