*  वर्षांऋतू जेवढा लोभस, भटकण्यासाठी पाय खेचणारा तेवढाच परावलंबी, असुरक्षित. * कुठलाही ट्रेक-सहलीला जाण्यापूर्वी त्या स्थळाची, ट्रेकची, त्याच्या वाटा-चढाईची पूर्ण माहिती घ्यावी. अज्ञात ठिकाणी अनुभवी मार्गदर्शक, माहितीपुस्तक घेऊनच बाहेर पडावे. * पाऊस, ढग, वारा यामध्ये रस्ता चुकण्याचा, घसरण्याचा मोठा धोका असतो.
* धबधब्याखाली भिजण्याचा मोह अनेकांना होतो. पण या धबधब्यांमध्ये पाण्याबरोबर छोटे-मोठे दगडही अंगावर पडून अपघात होतात. * ओढे-नाले आणि धबधब्यातील पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्याने अनेकदा वाहून जाण्याच्या दुर्घटनाही घडतात. * प्रवास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने असेल तर वेळापत्रक लक्षात ठेवा आणि स्वतंत्र वाहन असेल तर आवश्यक टूल किट, स्टेपनी बरोबर बाळगा. * मुक्कामी ट्रेक असल्यास निर्जन स्थळी, उघडय़ावर मुक्काम करण्याऐवजी जवळच्या वस्तीवर सुरक्षित घरी किंवा मंदिरात मुक्काम करावा. झोपताना रद्दी पेपर घालून त्यावर अंथरूण घातल्यास जमिनीतील ओल लागत नाही. * ट्रेक करताना पायात कापडी किंवा स्पोर्ट्स शूज घालावेत. चप्पल, सँडलवर ट्रेक करू नये. * सॅकमधील सर्व सामान मोठय़ा प्लास्टिक बॅगमध्ये घेतल्यास त्याला ओल लागत नाही. कॅमेरा, लेन्स, मोबाईल, चार्जर यांची विशेष काळजी घेत  कोरडय़ा सुती कापडात गुंडाळून घ्यावे. * आडवाटेवरचे ट्रेक करताना आपल्याबरोबर दोरी, टॉर्च, काडेपेटी, मेणबत्ती, पॅकफूड, आवश्यक औषधे आणि नाव-पत्ता-संपर्क क्रमांक-रक्तगट असलेले ओळखपत्र घेण्यास विसरू नये. * मद्यपान, कर्कश गाणी, धिंगाणा टाळा. स्थानिक नागरिकांशी सौजन्याने वागा. त्यांच्या समस्या जाणून घ्या.  त्यांच्यासाठी आणि तिथल्या निसर्ग-पर्यावरणासाठी काही मदत करा. * शेवटी सर्वात महत्त्वाचे.. कुठल्याही स्थळी गेला तरी तिथल्या निसर्गसौंदर्याचा आनंद जरूर घ्या; पण त्याच्यातील हस्तक्षेप, प्रदूषण टाळा! निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय मागे काही ठेवू नका आणि गोड आठवणींशिवाय इथून काही घेऊन जाऊ नका.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Picnic rainy picnic spots rainy picnic trekking trek waterfall trek it