‘रेस अक्रॉस अमेरिका’ ही सायकल शर्यत जगातील सगळ्यात अवघड सायकल शर्यत समजली जाते. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून सुरू होऊन ही शर्यत थेट पूर्व किनाऱ्यावर संपते. आजवरच्या इतिहासात अवघ्या २०० जणांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. भारतातून आजवर दोनच सायकलपटू त्यात सहभागी होण्यास पात्र ठरले आहेत. यंदा प्रथमच एक मराठमोळा तरुण सुमित पाटील या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र ठरला आहे. ही स्पर्धा, तिची तयारी, सराव आणि मदत यासंदर्भात त्याच्याशी प्रशांत ननावरे यांनी केलेली ही बातचीत..
‘रेस अक्रॉस अमेरिका’ (फअअट) स्पर्धा म्हणजे काय?
अमेरिकेत कॅलिफोर्निया येथील ओशियन पीएर येथून सुरूहोणारी ही स्पर्धा अॅनापोलिस, मेरीलँड (इस्ट कोस्ट) येथील सिटी डॉक येथे संपते. या वर्षी ही स्पर्धा १० ते २१ जून या कालावधीत होणार आहे. अमेरिकेतील १२ राज्ये आणि ८८ काऊंटी पार करत साधारण १७० हजार फुटांची उंची आणि जवळपास ४८०० किलोमीटरचा हा पल्ला अवघ्या १२ दिवसांमध्ये पार करायचा असतो. स्वाभाविकच स्पर्धा वेळेत पूर्ण करण्यासाठी दररोज ४०० किलोमीटर सायकल चालवणे गरजेचे असते. दिवसाच्या २४ तासांत तुम्हाला ऊन, पाऊस, वारा, थंडी, चढ-उतार या सर्वाचाच सामना करत ४०० किलोमीटर सायकलिंगसोबत झोप, भूक व अन्य गोष्टी करायच्या असतात.
‘टूर दी फ्रान्स’ आणि ‘रेस अक्रॉस अमेरिका’ यांच्यातील फरक काय?
‘टूर दी फ्रान्स’ या जगप्रसिद्ध सायकल शर्यतीमध्ये तुम्हाला ५००० किलोमीटर अंतर १९ टप्प्यांमध्ये २१ दिवसांत पूर्ण करायचे असते. परंतु ‘रेस अक्रॉस अमेरिका’ स्पर्धेत हे अंतर एकाच टप्प्यात सलग १२ दिवसांमध्ये पार करताना संपूर्ण अमेरिका खंड पालथा घालायचा असल्याने ही जगातील आणि इतिहासातील सर्वात कठीण सायकल स्पर्धा मानली जाते.
या स्पर्धेसाठी पात्र कसा ठरलास?
पात्रतेसाठी बंगळुरू ते उटी आणि परत असे एकूण ६०१ किलोमीटरचे अंतर ३२ तासांत पार करायचे होते. मी हे अंतर ३० तास ५२ मिनिटांत पूर्ण केले.
’स्पर्धेसाठी तयारी कशी सुरू आहे?
सायकलिंगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मित्र-मत्रिणी आणि सोशल लाइफपासून दूर मी सध्या पुण्याला स्थायिक झालो आहे. सरावासाठी मी सकाळी सायकलने तीन तासांत महाबळेश्वरला जातो आणि दुपारी जेवायला पुण्यात परत येतो. खाण्यापिण्याच्या बाबतीत मी विशेष पथ्य पाळत नसलो तरी भरपूर पाणी पितो आणि सर्व गोष्टी खातो. भारतीय पदार्थ खूप पौष्टिकआहेत.अति तेलकट पदार्थ टाळणे आणि पोटभर खाणे, एवढंच मी पाळतो.
तुला कोणत्या मदतीची अपेक्षा आहे?
स्पर्धेत सलग १२ दिवस सोबत सतत एक व्हॅन, मदतनीसांची टीम, सायकली, त्यांचे पार्ट्स, राहण्याची, जेवणाची व्यवस्था हा सर्व खर्च सुमारे ५० लाखांच्या घरात जाणार आहे. त्यामुळेच, सध्या मी प्रायोजकांच्या शोधात आहे. इतक्या अवघड स्पर्धेसाठी राज्य किंवा केंद्र सरकारतर्फे कुठल्याही निधीची तरतूद नाही. त्यामुळे हा सर्व खर्च स्ववबळावरच उभा करावा लागणार आहे. आम्ही ‘टी अग्नी’ ची स्थापना केली असून मला आवश्यक ते साहाय्य या टीमतर्फे पुरविण्यात येत आहे. विशेषत: अमेरिकेत स्पर्धेच्या वाटेवर राहणाऱ्या लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आम्हाला वाटते. आर्थिक मदतीशिवाय खासगी वाहन, निवास आणि खाण्या-पिण्याचा खर्चातही हातभार लावू शकतात. भारत आणि भारताबाहेरील इच्छुक देणगीदारांसाठी www.sumitpatil.com हे संकेतस्थळही सुरू केले आहे..