पावसाळा जवळ आला, की भटक्यांना ज्या काही ठरावीक स्थळांची आठवण होते त्यात लोणावळय़ाजवळील राजमाची हा एक वनदुर्ग आहे. डोंगर, जंगल झाडी आणि त्यात दडलेल्या या बेलाग दुर्गाची भ्रमंती..
मावळातल्या अनेक वाडय़ावस्त्यांना बैलगाडीरस्त्याने जोडलेले आहे. डोंगरदऱ्यांच्या सान्निध्यातून वाहणाऱ्या या वाटांवरील प्रवास एक वेगळी भेट असते. इथला निसर्ग, ओढेनाले, झाडेझुडपे, पशुपक्षी अगदी वाटेत भेटणारे गावकरी हे सारेच विश्व वेगळे असते. चालणाऱ्याला यातील सौंदर्य आणि वैविध्य समजले, की तो या वाटांचा गुलाम होतो. लोणावळय़ाच्या उत्तरेला उढेवाडी नावाच्या छोटय़ा गावापर्यंत अशीच एक वाट जंगलझाडीतून गेली आहे. जिच्या शिरावर बसला आहे एक देखणा किल्ला- राजमाची! इतिहासकाळापासून वाहत्या असलेल्या बोरघाटाचा हा रक्षक!
खंडाळा घाटातून रेल्वेने जाताना किंवा लोणावळय़ाजवळच्या राजमाची पॉइंटवर आलो, की जंगलझाडीतला हा गड आणि त्याची ती जुळी शिखरे श्रीवर्धन-मनरंजन लक्ष वेधून घेतात. राजमाचीच्या या वैशिष्टय़पूर्ण भूरचनेमुळे पाहणाऱ्या प्रत्येकालाच हा गड आकर्षित करतो. पण समोर दिसणाऱ्या या गडाच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी मात्र तब्बल १६ किलोमीटरची पायपीट करण्याची तयारी ठेवावी लागते. लोणावळा, तुंगार्ली गाव, धरण, ठाकुरवाडी मार्गे जाणारी ही वाट! या वाटेला अध्र्या वाटेत खंडाळामार्गेही एक वाट येऊन मिळते. ज्यांना डोंगरदऱ्या खालीवर करण्याची हौस आणि सवय आहे, अशांसाठी आणखी काही आडवाटा आहेत. कर्जतहून सहाआसनी रिक्षाने कोंदिवडे किंवा कोंडाणे गाव जवळ करायचे किंवा घाटातील ठाकुरवाडी नामक रेल्वेच्या अल्पकाळासाठीच्या छोटय़ाशा थांब्यावर पटकन उतरायचे आणि समोरची उल्हास दरी उतरत राजमाचीच्या डोंगराला भिडायचे. यापैकी कुठल्याही मार्गे आलो तरी अंगावर येणारी दीड-दोन हजार फुटांची सरळ चढण चढावी लागते.
राजमाचीकडे निघालो, की भवतालची हिरवाईच आपले मन जिंकून घेते. यातही लोणावळय़ाकडून आलेल्या वाटेवर तर जास्तच! साग, ऐन, आंबा, जांभूळ, बेहडा, सावर, बहावा, पळस, पांगारा, कुडा, कुंभा, उंबर.. वाघाटी, पळसवेल, करवंद-बांबूची जाळी आणि अशाच किती वृक्षवेली वनस्पती! या साऱ्या वनस्पतींनी हे जंगल घट्ट केले आहे. पुन्हा या झाडीत नानातऱ्हेचे पशुपक्षी, कीटक, फुलपाखरे; ओढय़ानाल्यासारख्या नाना परिसंस्था! या साऱ्यांमुळे राजमाचीच्या वाटेवर प्रवेश होताच हा निसर्गच पहिल्यांदा वेड लावून टाकतो. लोणावळय़ाच्या बाजूने आलो, की गड येण्यापूर्वी अलीकडेच काही अंतरावर तळातील तटबंदी आपला रस्ता अडवते. गडाची ही वेस! ती आता पाडून रस्ता केला आहे. पण बाजूच्या बलदंड भिंती पाहिल्या की त्या काळीच्या दरवाजाचा अंदाज येतो. या वेशीच्या आत शिरताच डाव्या हाताला गणेश, मारुतीचे मंदिर आहे. पुढे काही अंतरावर सतीच्या शिळाही आहेत. जणू गडाचे हे पहिले पहारेकरीच! ही वेस ओलांडली की राजमाचीची हद्द सुरू. गडाची ही माची. या माचीवर मधोमध ते दोन बेलाग बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन! यातील श्रीवर्धन आपल्यावर लक्ष ठेवून असतो.
वाट काही वेळातच पायथ्याच्या उढेवाडी गावात पोहोचते. दहा-वीस घरांची ही वाडी पण प्रत्येकाचे अंगण अगदी साफसूफ, शेणामातीने सारवलेले. त्यावर झावळय़ांचे मांडव घातलेले. यातल्याच एखाद्या घरी आपली पथारी लावायची आणि राजमाची हिंडायला बाहेर पडायचे. उढेवाडीला खेटूनच एक दाट राई आहे. या राईत एक बांधीव तलाव आणि त्याच्या काठावर मध्ययुगीन महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराच्या पाठीमागे डोंगरातून येणारा एक झरा गोमुखाद्वारे मंदिराच्या पुढय़ातील टाकीत पडतो आणि पुढे मुख्य तलावाला जाऊन मिळतो. हा तलाव दंडा राजपुरीच्या कुणा देशमुखाने शके १७१२ मध्ये बांधला आहे. या आशयाचा एक शिलालेखच या तळय़ाच्या काठावर आहे. या तलावाच्या काठावर आले की त्याच्या त्या स्वच्छ नितळ अशा पाण्यात साऱ्या राजमाचीचे प्रतिबिंब पडलेले दिसते. पाण्यातले त्याचे हे रूप पाहावे आणि मग प्रत्यक्ष दर्शनासाठी गडाकडे निघावे.
या उढेवाडीतूनच डोक्यावरच्या श्रीवर्धन-मनरंजन बालेकिल्ल्यांकडे वाट निघते. कडय़ात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या, अर्धवट लेणी यांचे सान्निध्य घेत ही वाट दोन बालेकिल्ल्यांच्या मधल्या खिंडीत येऊन थांबते. या खिंडीत भैरवनाथाचे एक प्रशस्त मंदिर आहे. गडावरील मुक्कामासाठी वाडीशिवाय हाही एक पर्याय! मंदिरात भैरव आणि जोगेश्वरीच्या मूर्ती! छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज आणि थोरले बाजीराव पेशवे यांनी वेगवेगळय़ा काळात त्या अर्पण केलेल्या. मंदिरासमोर गडावरील तोफा ठेवलेल्या आहेत. याशिवाय दीपमाळ, भोवतीने काही कोरीव शिल्पंदेखील आहेत. यातील गजान्तलक्ष्मीचे शिल्प तर पाहण्यासारखे.
दोन बालेकिल्ले असणारा राजमाची हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला. यातील श्रीवर्धन हा उंचीने थोडासा उंच! यावर जाण्यासाठी खडकातच पायऱ्यांचा मार्ग खोदलेला आहे. गोमुखी पद्धतीच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच दोन्ही बाजूंची देवडी थक्क करून सोडते. वळणावळणाच्या मार्गावरील प्रशस्त आकाराची, रेखीव खांबांवर उभी असलेली ही देवडी पूर्वी बहुमजली होती. पण आता तिचे छत पूर्ण कोसळले आहे. किमान तिच्या उभ्या िभती आणि खांब ढासळण्या-पडण्यापूर्वी तरी वाचवायला हवेत. पण हे करायचे कोणी..?
या दरवाजातून गडावर सरकावे तो डाव्या हाताला खडकात खोदलेली काही टाकी दिसतात. या टाक्यांच्या कडेलाच एक लोहस्तंभ पडलेला आहे. अंदाजे ८ फूट लांबीच्या या लोहस्तंभाचे नेमके प्रयोजन मात्र कळत नाही. रायगडावर देखील असाच एक स्तंभ आहे. आमच्या गडांवरील या अशा वस्तूंचे योग्य जतन आणि संशोधन व्हायला हवे.
या टाकीजवळून निघालेली ही वाट पुढे एका शैलगृहाजवळ थांबते. या मूळच्या शैलगृहांची मध्ययुगात धान्याची कोठारे झाली. या शैलगृहाच्या दरवाजांवर गणेशपट्टी आणि कमळे कोरलेली आहेत. ही वाट पुढे श्रीवर्धनच्या शिखराकडे निघते. वाटेत आणखी काही उद्ध्वस्त घरांचे अवशेष, बुजलेल्या टाक्या, विष्णूचे एक छतविना छोटेसे मंदिर आणि गडाची सदर लागते. या साऱ्यांतून मार्ग काढत आपण गडाच्या सर्वोच्च अशा ढालकाठीच्या वा टेहळणीच्या बुरुजावर येतो. या बुरुजावर आता नव्याने ध्वजस्तंभ उभारला आहे. या बुरुजावरून सारा राजमाची किल्ला आणि परिसर नजरेत येतो.
श्रीवर्धनची उत्तर बाजू म्हणजे या बालेकिल्ल्याची जणू एखादी माची आहे. या माचीच्या बुरुजांना दुहेरी तट घालून संरक्षित केले आहे. या दोन तटा दरम्यान ये-जा करण्यासाठी भुयारी जिनेही जागोजागी ठेवले आहेत. अशा बुरुजांना चिलखती बुरुज म्हटले जाते. श्रीवर्धनच्या तुलनेत उंचीने कमी असलेल्या मनरंजनला स्वयंसिद्ध अशी रक्षणाची साधने नसल्याने त्याच्या सभोवार मजबूत तट घातला आहे. एकापाठोपाठ तीन दरवाजांतून मनरंजनमध्ये प्रवेश करावा लागतो. गडाच्या आत विस्तीर्ण पठार असून त्यामध्ये दोन मोठे तलाव, दारूगोळय़ाचे कोठार, किल्लेदाराच्या उद्ध्वस्त वाडय़ाचे अवशेष, सदर आदी वास्तू दिसतात. या अवशेषांमध्येच छत नसलेली, पण भिंती शाबूत असलेली एक इमारत लक्ष वेधून घेते. या इमारतीच्या प्रवेशद्वारावरील सुरेख गणेशपट्टी, बाजूचे चंद्र, सूर्य या शुभचिन्हांमुळे गडावरील ही एखादी महत्त्वाची वास्तू वाटते. मनरंजनवरून पश्चिमेकडचा देखावा खूपच रमणीय दिसतो म्हणूनही या बालेकिल्ल्याला ‘मनरंजन’ म्हणतात, असेही सांगितले जाते. राजमाची किल्ल्याचा हा परिसर पाहून मन नकळतपणे त्याच्या इतिहासात डोकावते. या किल्ल्याला फार ज्वलंत नसला, तरी प्रदीर्घ असा इतिहास आहे. गडाच्या पोटात ठिकठिकाणी खोदलेली शैलगृहे, पाण्याच्या टाक्या आणि मुख्य म्हणजे या गडाशेजारीच असलेली कोंडाणे लेणी या साऱ्या खाणाखुणा या गडाला प्राचीन काळापर्यंत घेऊन जातात. या गडाजवळून वाहणारा बोर घाट हा प्राचीन काळापासूनच वाहता आहे. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठीच या गडाची निर्मिती झाली. हे निश्चित! हा काळ बहुधा सातवाहनांचा म्हणजेच दोन हजार वर्षांपूर्वीचा! यानंतर राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, मुस्लिम सत्ताही या गडावर नांदून गेल्या. छत्रपती शिवाजी महाराजही एकदोनदा गडावर आल्याचे उल्लेख आहेत. पुढे आलमगिरीची वावटळ सहय़ाद्रीत अवतरताच इसवी सन १७०४ मध्ये औरंगजेबाच्या सेनापतीने राजमाचीच्या किल्लेदारास वश करून हा गड जिंकला खरा; पण औरंगजेबाची पाठ फिरताच मराठय़ांनी राजमाचीवर पुन्हा जरीपटका फडकवला. इसवी सन १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी दर्यासारंग कान्होजी आंग्रेंकडे गडाची सूत्रे दिली. पुढे त्यांनी तो १७३० मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांकडे सुपूर्द केला. यानंतरच्या काळात इसवी सन १७७६ मध्ये सदाशिवराव भाऊंच्या तोतयाचे (सदोबा नावाचा एक ब्राह्मण) प्रकरणही या गडावर मोठे गाजले. या तोतयाने कोकणातून बंडाळी करत राजमाचीपर्यंतचा भाग ताब्यात घेतला. पुढे पेशव्यांनी आंग्य््राांच्या मदतीने या तोतयाचा बंदोबस्त केला. असा हा राजमाची गड आणि त्याचा इतिहास!
पण इथे आलो की या इतिहासापेक्षाही राजमाचीचा भवतालच जास्त लक्षात राहतो. गडावरून या परिसरावर नजर फिरवली, की सुरुवातीला सर्वत्र किर्र्रऽऽ जंगलच दिसते. मग या जंगलातून उसळी घेतलेला ढाकचा किल्ला, नागफणीचे टोक खुणावू लागते. डोंगरांच्या बेचकीतून वळवंड धरणाचे पाणी चमचमू लागते. दूरवरची माहुली, कर्नाळा आणि माणिकगडाची दुर्गशिखरे ओळखी देऊ लागतात. उल्हास नदीचे खोरे, त्याभोवतीचे तळकोकण एखाद्या नकाशाप्रमाणे भासते. या निसर्गशांततेत समोरच्या खंडाळय़ाच्या डोंगरातून शिट्टय़ा मारत धावणाऱ्या आगगाडय़ा लक्ष वेधून घेतात. हे सारे पाहात आपले लक्ष पुन्हा तळातील उढेवाडी आणि तिच्या शेजारच्या राईच्या तळय़ावर येऊन थांबते.
असा हा राजमाची आणि त्याच्या भोवतीचा निसर्ग, वेड लावणारा. शिशिरात तो गोठून जातो, वसंतात पुन्हा बहरतो आणि वर्षांकाळी न्हाऊन निघतो. पावसाळय़ात तर भटक्यांचे हे लाडके स्थळ! झिम्मड पाऊस, ओल्याचिंब वाटा, कोसळत्या धबधब्यांनी वर्षांकाळी हा सारा घाटमाथाच हिरवाईत भिजून जातो. धुक्यात हरवून बसतो. भिजलेली झाडे, शेवाळलेल्या फांद्या आणि गवतफुलांनी झाकलेली पठारे या साऱ्यांनी राजमाची जणू यौवनात पाऊल टाकत असतो. अशा या धुंदवेळी मग या वाटेवर स्वार होणारे प्रत्येक मन राजमाचीच्या प्रेमात बुडून जाते.