रोहा हे रायगड जिल्ह्य़ातलं टुमदार गाव. तालुक्याचं ठिकाण असा मान मिळाल्याने अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेलं. पोह्य़ाचे पापड़, मिरगुंड, सुकामेवा इत्यादी खास कोकणी पदाथार्ंचं माहेरघर! जवळच असणारा मुरूडचा नितांतसुंदर सागरतीऱ  वन्यजीवांचं नंदनवन असणारं फणसाड अभयारण्य़ अवचितगड़, बिरवाडी, तळा-घोसाळा हे किल्ले आणि देखण्या नक्षीकामानं नटलेली कुडे-मांदाड लेणी ही तर रोह्य़ाची खास ओळख. पण याच रोहा तालुक्यात कोलाड नागोठणे रत्यावरील खांब गावाजवळ एक अपरिचित दुर्ग उभा आहे..सुरगड!
आपल्या कातळकडयामुळे लांबूनही लक्ष वेधणारा आणि खास पावसाळयात भेट देण्याजोगा असा हा किल्ला. मुंबई-गोवा महामार्गाच्या अगदी जवळ हा किल्ला. पुण्याहून ताम्हिणी उतरून विळेमार्गे कोलाडला पोहोचलो की मुंबई-गोवा महामार्ग आडवा येतो. त्याचंच बोट धरून ५ किलोमीटरवरील खांब गावात पायउतार व्हायचं. मुंबईकडच्या दुर्गप्रेमींनी पेण -नागोठणे मार्गे थेट खांब गाव गाठावं. मुंबई गोवा महामार्ग ओलांडून पक्क्या सडकेनं दहा मिनीटात वैजनाथमार्गे पायथ्याचं घेरा सुरगड हे खास कोकणी गाव गाठलं की समोर सुरगडाचा हिरवागार कातळकडा दिसतो. त्याच्यावरून शांतपणे वाहणाऱ्या जलप्रपातांमुळे त्यांचं ते रूप आणखीनचं खुललेलं असतं.  गावातील भातखाचरं तुडवत निघावं आणि थांबावं ते थेट एका खळाळत्या ओढय़ापाशी. नितळ शुभ्र पााण्याचा तो जलौघ आपली दृष्टी दूरवरुनच खेचून नेतो. हा ओढा ओलांडला की सुरगडाचं घनदाट जंगल सुरू होतं. सुरगडाचा कडा या झाडीमागं लपलेला असल्याने आपल्याला दिसत नाही. पावसाळयात तर हे जंगल खास अनुभवावं. वृक्षसंपदा तर इथं आहेच, पण फुलपाखरांचेही अनेक प्रकार आणि त्यांच्या रंगांच्या कैक अप्रतिम छटा सहजपणे बघायला मिळतात.
पायथ्याच्या गावकऱ्यांनी ‘घेरा सुरगड बचाओ समिती’ स्थापन केली असून त्यामार्फत सुरगडाच्या विकासाचे काम चालू आहे. तोच वसा सध्या मुंबईच्या ‘दुर्गवीर’ संस्थेने पुढे चालवला आहे. पायथ्याहून अध्र्या पाऊण तासात आपण एका पठारावर पोहोचतो. सुरगडाचा कातळ एव्हाना आपल्यासमोर उभा असतो. सुरगडाचा माथा गाठायचे दोन मार्ग. एक घळीतून जाणारा मुख्य दरवाजाचा, तर दुसरा गडाला फेरी मारून मागच्या बाजूने वर चढणारा. हा मार्ग लांबचा असला तरी या मार्गावर अणसाई देवीचं मंदिर आणि एक तोफ बघण्यासारखी आहे. जाता-येता स्वतंत्र मार्ग वापरल्यास संपूर्ण किल्ला फिरून होतो.
घळीच्या वाटेने निघालो, की कडय़ाच्या पोटात खोदलेलं पाण्याचं एक टाकं समोर येतं. शेजारी एक भुयारही पहायला मिळतं. घळीच्या पायथ्याशीही एक छोटेखानी गुहा आहे. घळीच्या जागीच गडाचा दरवाजा असावा. पुढे बुरूजही दिसतात. पावसाळयात हा मार्ग काहीसा निसरडा होतो, पण वाटतो तितका कठीण अजिबात नाही. त्या खोदीव खोबण्यांचा आधार घेत काळजीपूर्वक वर चढायचं की उजव्या बाजूला मिश्या असलेल्या मारूतीची देखणी मूर्ती दिसते. कमरेला खंजीर लावलेला आणि डोक्यावर झाडांचं छत्र! या प्रकारची मूर्ती किल्ल्यांवर क्वचितच पहायला मिळते. इथून दोन वाटा फुटतात. आपण उजवीकडच्या वाटेने गेलो, की घेरा सुरगड गावाकडे तोंड करून उभा असलेला एक बुरूज आहे. इथून अर्धचंद्राकृती कुंडलिकेचं पात्र, अवचितगड, घोसाळगड हे किल्ले आणि पायथ्याचं टुमदार घेरा सुरगड गाव दिसतं.
गडमाथ्यावर किल्ल्यावरील कोठार, भग्नावस्थेतील हेमाडपंती मंदिर, पाण्याची टाकी, सदर आदी वास्तू दिसतात. या गडावर एक अवाढव्य बांधणीचा बुरूजही दिसतो. गडाच्या माचीवर एक शिलालेख अवश्य पाहावा असा आहे. अरबी व देवनागरीत कोरलेल्या या शिलालेखानुसार सिद्दीसाहेब नावाच्या माणसाच्या हुक मावरून सूर्याजी याने हा किल्ला बांधला. या वेळी तुकोजी हैबतराव गडाचे सुभेदार होते. कर्नल प्रॉथरने १८१८ साली किल्ल्याचा ताबा घेतल्याची इतिहासात नोंद आहे.
किल्ल्याचा पसारा तसा लहान असल्याने तासाभरात किल्ला बघून पूर्ण होतो. वर्षांऋुतुचा खरा आनंद हा सुरगडासारख्याच आडवाटेवरच्या पण देखण्या किल्ल्यांमध्ये सामावला आहे. आजही तुम्ही गेलात तर सुरगडाचे ते देखणं पावसाळी रूप तुमच्यावर जादू करेल आणि शरीरानं तुम्ही तिथे नसलात तरी मन तिथेच ठेवून जायला भाग पाडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा