मस्त पावसाळी हवा! साहजिकच घरात बसणे अशक्य. पाठीवर सॅक चढवून बाहेर तर पडतोच पण खूप वेळा कोठे जावे, हा प्रश्न सतावतोच. यावर सोप्पे उत्तर आहे सागरगड. आपलं वाहन असेल तर उत्तमच अन्यथा पुणे-अलिबाग बस पकडून अलिबागेच्या अलीकडेच ५ कि.मी. वर असलेल्या खंडाळे या गावी उतरावे. बसमधून उतरतानाच नाकासमोर दिसणाया धबधब्याकडे जाणाऱ्या गाडीरस्त्याने चालू पडावे. आपले वाहन असल्यास दोन-अडीच कि.मी.ची पायपीट वाचेल. थोडय़ाच वेळात आपण पोहोचतो एका खळाळणाऱ्या प्रवाहाशी, पण जरा डुंबण्याचा मोह आवरा. कारण थोडय़ाच अंतरावर मगापासून आपल्याला खुणावणारा जलप्रपात आपली वाट पाहतो आहे. येथे आल्यावर कोणाचे ऐकायची गरजच काय? खुशाल जलक्रीडेला प्रारंभ करा. तुषार स्नानाने थकवा दूर पळतोच आणि शरीर मनात फक्त उत्साहाचाच जल्लोषच जल्लोष. सुमारे १५० फूट सरळ जमिनीवर झेपावणाऱ्या या धबधब्याचे नाव आहे ‘धोंधाणे धबधबा.’ घोंगावणाऱ्या आवाजात धो धो कोसळणाऱ्या या प्रपाताला अगदी साजेसे नावॐ येथून मग निघावे दाट झाडीतून लपतछपत जाणाऱ्या काहिशा चढाच्या वळणदार वाटेने सिध्देश्वर मंदिराकडे. वाटेतील झाडीत दुर्मिळ कांचन वेल आढळते. हिच्या कानवल्याच्या आकाराच्या मखमली शेंगा येथे पाहायला मिळाल्या. दाट झाडीत कडय़ाच्या टोकावरील मंदिराचे सभागृह चांगलेच प्रशस्त असून बंदिस्तही आहे. बाजूलाच एक स्वच्छ चवदार पाण्याची विहीर आणि शेजारीच एक खळाळता ओढा. हाच ओढा आपल्याला कडय़ावरून लोटून घेतो व धबधबा बनतो. हे सर्व दृष्य पाहून वाटते की शांताबाई 
शेळके यांची कविताच आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत. मुक्काम करायला आदर्श आणि सुरक्षित जागा. बरोबर आणलेला शिधा वापरून मस्त खिचडी बनवली आणि सर्वजणांनी मनापासून ताव मारला. असे जेवण तुम्हाला कोठेही मिळणार नाही याची खात्री बाळगा.
या नंतर पुढील सर्व प्रवास जवळजवळ सपाटीवरूनच आहे. सर्वत्र हिरव्या रंगाच्या अगणित छटा आढळतात. वाटेत अनेक आगळ्या वेगळ्या वनस्पती आढळतात. आमच्या भाग्याने सोबत उष:प्रभा पागे असल्याने कधी कधी असे वाटले की आम्ही बोटॅनिकल गार्डनची सैर करतो आहोत. उषाताईंनी अनेक झाडांचा त्यांच्या वैशिष्ठयांसहित परिचय करून दिला. येथे वावडिंगाच्या झुडपांवर मोहोर आला होता तर चार-पाच प्रकारची ऑर्किड्सही पाहिली. शिवाय अनेक वनस्पती विशेष पाहता आल्या. याच पठारी भगात आपल्याला लागते सागरगडमाची गाव यालाच गवळीवाडा असेही म्हणतात. बरोबर शिधा आणला नसल्यास येथे उदरभरणाची सोय होऊ शकते. अर्थात इंतजारके बाद. या पठारावरून भटकत असताना अचानक समोर खूप मोठा पसारा असलेला सागर गड आपल्याला दर्शन देतो. पण हुरळून जाऊ नका. अजून खूप पदभ्रमण बाकी आहे. बाकदार वाटा आपल्याला गडाच्या तटबंदीपाशी आणून सोडतात. गडाला विशाल तटबंदी असून बऱ्याच प्रमाणात ती सुस्थितीत आहे. प्रवेशद्वाराचे केवळ अवशेषच शिल्लक आहेत.
शिवाजी महाराजांनी मोगलांशी केलेल्या तहानुसार मोगलांना हस्तांतरण केलेल्या तेहेतीस किल्ल्यांत या गडाचा समावेश होता तेव्हा याचे नाव होते खेडदुर्ग. महाराज आगऱ्याहून परत आल्यावर याला परत स्वराज्यात दाखल करून घेण्यात आले व याचे नामकरण ‘सागरगड’ असे झाले. या गडाचा उल्लेख इ.स.१७१३ मध्ये पेशवे व कान्होजी आंग्रे यांच्यात झालेल्या तहातही आहे.
या गडावरून मांदाडच्या खाडीपासून कोरलई किल्ल्यापासून रेवदंडा चौल नागावपासून अलिबाग कुलाबा किल्ला थळ किहीम खान्देरीउन्देरी ते मुम्बइच्या समुद्रावर आणि अष्टागरावर नजर ठेवणे सहज शक्य आहे. त्यामुळे याचे संरक्षणदृष्टया महत्त्व अनन्य साधारण होते व आहे. हा सर्व परिसर सहज न्याहाळता येतो आणि म्हणूनच याचे सागरगड असे नामकरण झाले असावे. गडावरील गडेश्वराचे मंदिर आज भग्नावस्थेत असून जवळच राणीमहालाचे अवशेष आहेत. या बालेकिल्ला सदृश भागाला तटबंदी असावी असे अवशेषांवरून वाटते. एक तलाव आणि पाण्याची टाकीही आहेत. कोठार पडिक अवस्थेत आहे. काही इमारतींची जोतीही आढळतात. गडाच्या उत्तर टोकाच्या कडय़ाखाली आहे एक दगडी सुळका याला म्हणतात वांदरलिंगी. अगदी जीवधनच्या वांदरलिंगीची जुळी बहीणच. पदभ्रमण खूप असले तरी गड खूप सोपा आहे. निसर्गाची विविध रूपे विविध वनस्पती मनसोक्त जलक्रीडा यासाठी तरी येथे यायलाच हवे. मग निघायचं ठरवताय ना!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा