एसटीने आम्हाला वांद्रे फाटय़ाला सोडलं तेव्हा साडेनऊ वाजत आले होते. ऊन तापायला लागलं होतं. या वांद्रे फाटय़ापासून उजवीकडचा रस्ता पिंपरी, भांबुर्डे, तैलबैला फाटा, सालसर, आंबवणे मार्गे लोणावळ्याला गेला आहे. इथून आमच्या ट्रेकची सुरुवात असणारा पिंपरीचा पाझर तलाव तीनेक किलोमीटरवर होता. पाऊणेक तासात आम्ही परातेवाडीच्या पुढे असलेल्या दरीच्या कडेला पोहचलो. समोर जे दृश्य उलगडलं त्याला काय नाव द्यावं हे अजूनही कळत नाहीये! ..समोर कोकणापर्यंत पसरलेली प्रचंड खोल आणि अरुंद दरी. दोन्ही बाजूने सह्य़ाद्रीचे तुटलेले रौद्रभीषण कडे. नावजी, अंधारबन, कुंडलिका सुळक्यांचंी मालिका. खाली पसरलेला विस्र्तीण उन्नई तलाव व धरण. समोरच्या डोगरात पसरलेले ते जंगलाचं मनमुराद साम्राज्य आणि त्याच्या थोडय़ाच अंतरावर असणारे आम्ही. सुन्न, नि:शब्द.. अहाहा!  ..केवळ स्वप्नवत!
एकही शब्द न बोलता साऱ्यांची फक्त कॅमेऱ्याची हालचाल सुरू होती. पण इतक्या वेळा पाहूनदेखील मला हे दृश्य तितकच नवीन आणि जिवंत वाटत होतं. हीच तर सह्य़ाद्रीची किमया. ज्या ज्यावेळी पाहावं तेव्हा प्रत्येक वेळी तो निराळा नवीनच भासतो. या दरीला कुंडलिका म्हटलं जातं. सुमारे अर्धा तास थांबल्यावर भानावर येऊन आम्ही पाय उचलले. कुंडलिकेच्या या पॉइंटपासून पाझर तलावाला पोहचेपर्यत अकरा वाजले. आता शेजारच्या खिंडीत जाणारे टॉवर्स दिसत होते, ही ‘सिनेर खिंड’ म्हणजे वीर नावजी बलकवडेंच्या स्मारकाची जागा. तेथे एक वीरगळ आहे. सुरुवातीच्या दगडांच्या बाणावरून माग काढत गेल्यावर अध्र्या तासात पलीकडच्या डोंगरावर पोहचतो. येथूनच अंधारबनची वाट सुरू होते. येथे एक निक्षून लक्षात ठेवावे वाटेत हिर्डी गाव येईपर्यंत पिण्यायोग्य पाणी नाही. त्यामुळे ट्रेकर्सनी किमान तीन लिटर पाण्याचा साठा बरोबर ठेवावा. अध्र्या तासात जंगलात शिरलो. आपण आफ्रिकेच्या भयाण जंगलात आहोत की काय, असा प्रश्न क्षणार्धात सर्वाच्या मनाला शिवून गेला. अंधारबन! हे नाव या जंगलाला ज्या कोणी दिलय ना त्याच्या ‘क्रिएटेव्हिटी’ला मानाचा मुजरा! दोनशेएक टक्के सार्थ नाव असलेल्या या निबिड अरण्यात आमचा प्रवेश झाला होता. भर दुपारी १२ वाजता देखील गर्द झाडीमुळे इथे अंधार होता. डोक्यावरच्या या भारी छत्रामुळे चालताना सारेच पब्लिक खूश झाले. (ही ब्लॉगपोस्ट संपूर्ण वाचण्यासाठी – http://www.onkaroak.com/ 2013/02/blog-post.html)

Story img Loader