जांभ्या खडकांवरी कालवें, त्यावरूनी खेंकडे
पहात फिरती जिथें हालत्या स्वप्रतिबिंबाकडे
कमलमीन भयहीन उघडुनी निज पाकळिपाकळी
नवल करती कुणीं रेखिल्या पुलिनीं रंगावली;
तेथें होता दुस्मनाला अखण्ड वितरुनि भया
दर्यावर दावीत दरारा विजयवंत घेरिया!
घेरिया उर्फ विजयदुर्ग! तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्हय़ात दूर डोंगरझाडीत सिंधू सागराच्या तीरी वसलेला एक अभेद्य जलदुर्ग! वाडी-वस्ती आणि बंदरही. नारळी-पोफळीच्या बागा, लाल मातीचे रस्ते, जांभ्या दगडातील उतरत्या छपरांची घरे आणि निळय़ाशार सागराचे सान्निध्य! कोकणातल्या कुठल्याही छोटय़ा खेडय़ाला लाभलेले हे दैवी वरदान विजयदुर्गच्या ठायी, पण याबरोबरच कोकणच्या इतर खेडय़ांप्रमाणे उपेक्षेचे भोगही त्याच्या नशिबी! नुकतेच २५ ते २७ जानेवारी दरम्यान याच विजयदुर्गवर शेकडो दुर्गप्रेमींच्या उपस्थितीत तृतीय दुर्गसाहित्य संमेलनाचा सोहळा रंगला आणि विजयदुर्गबरोबरच महाराष्ट्रातील साऱ्याच गडकोटांमध्ये चैतन्य संचारले. दुर्गसाहित्यापासून ते दुर्गसाधनांपर्यंत आणि दुर्गसंवर्धनापासून ते त्याच्या पर्यटनविकासापर्यंत अशी मोठी चर्चा झडली, परिसंवाद रंगले, प्रदर्शने मांडली गेली, माहितीपट-सांस्कृतिक कार्यक्रम झाले आणि ज्यातून महाराष्ट्राला जणू दुर्गजागरणाचा मंत्रच मिळाला.
महाराष्ट्राच्या इतिहास, भूगोल, निसर्ग-पर्यावरण, लोकजीवन आणि संस्कृतीत दुर्गाना मोठे स्थान आहे. कवी गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राला ‘दुर्गाच्या देशा’ म्हटले ते या नातेसंबंधातूनच! गडकोटांचे समाजाशी असलेले हे ऋणानुबंध अधिक घट्ट, निकोप, अभ्यासू आणि विधायक करण्याच्या हेतूने ‘गोनीदा दुर्गप्रेमी मंडळा’ची स्थापना झाली आहे. यासाठी दरवर्षी एखाद्या किल्ल्याच्या सान्निध्यात दुर्गसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी २००९ मध्ये राजमाची, २०१२मध्ये कर्नाळा आणि यंदा २०१३मध्ये विजयदुर्गवर या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
‘किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती’ यंदाच्या संमेलनाची आयोजक संस्था होती. तर संमेलनामागील उद्देश लक्षात घेऊन भारतीय पुरातत्त्व विभाग आणि भारतीय नौदलानेदेखील या संमेलनात सक्रिय सहभाग नोंदवला होता. हे संमेलन एका जलदुर्गावर होत असल्याने ‘जलदुर्ग आणि आरमार’ ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना होती. याचाच विचार करून यंदाच्या संमेलनाध्यक्षपदी भारतीय नौदलाचे माजी उपप्रमुख व्हाईस अँडमिरल (निवृत्त) मनोहर आवटी यांची, तर स्वागताध्यक्ष म्हणून सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे यांची निवड केली होती.
२५च्या पहाटेपासून राज्यभरातील दुर्गप्रेमी विजयदुर्गमध्ये दाखल होऊ लागले होते. संमेलनापूर्वीच सारा गाव श्रमदानाने साफसूफ केला होता. नारळी-पोफळीच्या बागांमधून स्वागत कमानी डोकावत होत्या. आलेल्या दुर्गप्रेमींची या गावातल्याच घरांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुसरीकडे विजयदुर्गलाही या संमेलनाच्या निमित्ताने नवे रूप दिले होते. एरवी झाडे-झुडपे माजलेल्या आणि अवशेषांचे ढिगारे बनलेल्या या गडावर फिरण्यासाठी वाटा तयार केल्या. पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली इथल्या वास्तूंची साफसफाई झाली. गडावर तोरणे बांधली गेली, स्वागत कमानी उभारल्या गेल्या, मंडप घातला गेला. रात्रीच्या विद्युतरोषणाईत तर गडाबरोबर सारा दर्याच उजळला.
अशा या भावपूर्ण वातावरणात २५च्या सकाळी ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. महाराष्ट्रातील गडकोटांवरील आद्य आणि महत्त्वपूर्ण अशा साहित्यकृतींना पालखीचा मान देत ही दिंडी वाजत-गाजत दुर्गावर पोहोचली. पुढे या दुर्गसाहित्याचेच बोट पकडत उद्घाटनाचा सोहळा रंगला. उद्घाटक ज्येष्ठ इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर, स्वागताध्यक्ष आंग्रे, संमेलनाध्यक्ष आवटी आणि प्रमुख पाहुणे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची दुर्गजागरणाची भाषणे झाली. इतिहास संशोधनामध्ये दुर्गाचा अभ्यास महत्त्वाचा असल्याचे शिरगावकरांनी सांगितले. आंग्य््राांनी जलदुर्गाचे इतिहासातील महत्त्व स्पष्ट केले, तर आवटींनी आज्ञापत्रात म्हटल्याप्रमाणे ‘ज्याचे आरमार त्याचा समुद्र आणि ज्याचा समुद्र त्याचे राज्य’ ही संकल्पना आजही किती महत्त्वाची हे उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
दुर्गाबद्दलचे हे विवेचन एका दुर्गावरच ऐकताना सारेच भारावले होते. यातच नव्वदीतले शिवशाहीर बोलू लागल्यावर तर जणू सारा विजयदुर्गच रोमांचित झाला. ‘..किल्ले इतिहासाचे एक अत्यंत मोलाचे गाठोडे आहे. त्याचे जतन करा. हे किल्ले वाचले तर आपला इतिहासही आपोआप जगेल आणि हा इतिहास जिवंत राहिला तर आपले वर्तमानही शाबूत राहील!’ बाबासाहेबांच्या तोंडून जणू भोवतीचे विजयदुर्गचे तटबुरूजच बोलू लागले होते.
उद्घाटनाच्या या सत्रानंतर परिसंवाद, व्याख्याने, दुर्गदर्शन, प्रदर्शने, नौकानयन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून या संमेलनाची रंगत वाढत गेली. परिसंवादाच्या पहिल्याच माळेत, ‘मराठय़ांचे आरमार’वर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, मनोहर आवटी, कॅप्टन आनंदराव बोडस आणि रघुजी आंग्रे यांनी मराठय़ांच्या आरमारापासून ते आजच्या नौदलापर्यंतचा मोठा प्रवास मांडला. ‘दुर्गसाहित्याचा प्रवास’ या परिसंवादात डॉ. वीणा देव, सीमंतिनी नूलकर, आनंद देशपांडे आणि मोहन शेटे यांनी दुर्गसाहित्याचे नवनवे प्रवाह, भाषा, मांडणी, उपयुक्तता यांचा वेध घेतला. जागोजागी ढासळणारे किल्ले आणि त्यांना वाचवण्यासाठी धडपडणारे हात यांना घेऊन ‘दुर्गसंवर्धन चळवळ’वरील परिसंवाद रंगला. यामधून भगवान चिले (रांगणा), श्रीदत्त राऊत (वसई), सुरेंद्र नावडे (राजगड), संतोष असूरकर (सूरगड), मिलिंद क्षीरसागर (घनगड) यांनी दुर्गसंवर्धनाच्या एकेक चळवळी मांडल्या. अभिजित बेल्हेकर, डॉ. राहुल मुंगीकर, मंगेश निरवणे आणि पुरातत्त्व विभागाचे राजन दिवेकर यांनी या विषयातील अन्य पैलू स्पष्ट केले. ‘शोध किल्ल्यांचा’ या परिसंवादात गिरिभ्रमण आणि दुर्गाचे नातेसंबंध पुढे आले. यामध्ये आनंद पाळंदे, सचिन जोशी, सचिन मदगे आणि उष:प्रभा पागे यांनी भटकंतीतून दुर्गशोधयात्रेची वाटचाल प्रगट केली. संमेलनातील शेवटचा परिसंवाद ‘कोकणच्या पर्यटन विकासातील दुर्गाचे स्थान’ हा विषय घेत कोकणात स्थिरावला. अण्णा शिरगावकर, गोपाळ बोधे, डॉ. संदीप श्रोत्री, वैभव सरदेसाई, पराग पिंपळे आणि डॉ. सुरेश गंगावणे या वक्त्यांनी यामध्ये कोकणातील दुर्गाना बोलके केले. त्यांच्या कथा आणि व्यथाही मांडल्या. दुर्गचिंतन आणि विचारमंथन करणाऱ्या या साऱ्याच परिसंवादांनी उपस्थितांना ‘दुर्ग’ या विषयात अक्षरश: बुडवून टाकले. फलित स्वरूपात काही योजना आणि त्यापाठीचे कार्यक्रमही लगोलग जाहीर झाले.
संमेलनात परिसंवादाच्या जोडीने काही माहितीपट सादर झाले. ‘गोनीदां’च्या ‘हे तो श्रींची इच्छा’ या शिवराज्याभिषेकावर आधारित कादंबरीच्या अभिवाचनाने विजयदुर्गवर जणू रायगड अवतरला. डॉ, विजय देव, डॉ. वीणा देव, रुचिर कुलकर्णी आणि विराजस कुलकर्णी यांनी हे वाचन केले. कोकण आणि कविवर्य बा. भ. बोरकर यांचे नाते सर्वश्रुत आहे. त्यांच्या या काव्यप्रतिभेला संगीत आणि नृत्यात बांधून ठेवणारा ‘अमृतवेल’ हा कार्यक्रम पुण्याच्या ‘चिद्विलासिनी’ संस्थेच्या प्रज्ञा अगस्ती, पूर्वा सारस्वत, तेजा कुलकर्णी, क्षिप्रा जोशी आणि मृण्मयी वैद्य यांनी सादर केला. कोकणातील काही कलाकारांनी या वेळी स्थानिक लोककला सादर करत संमेलनाच्या रात्री उजळून टाकल्या.
संमेलनाच्या निमित्ताने गडावरील विविध वास्तूंमध्ये गडांची छायाचित्रे, रंगचित्रांची प्रदर्शने भरविली होती. भारतीय पुरातत्त्व विभागाचे प्राचीन वारशाचे दर्शन घडवणारे प्रदर्शन, सचिन मदगे यांचे गोव्यातील किल्ल्यांचे छायाचित्र प्रदर्शन आणि भास्कर सगर यांचे कोकण चित्रदर्शन या प्रदर्शनांनी विजयदुर्गमधील उपेक्षित वास्तू पुन्हा जिवंत-नांदत्या झाल्या.
भारतीय नौदलाने या संमेलनामध्ये ‘आयएनएस मातंग’, ‘आयएनएस कंकारसो’ या दोन युद्धनौका पाठवून सहभाग नोंदवला. या युद्धनौकांनी विजयदुर्गला सलामी दिल्यावर नौकानयनाच्या उपक्रमातून अनेक छोटय़ा-मोठय़ा नावांमधून दुर्गप्रेमींनी या ‘फिरत्या जलदुर्गा’ना आणि विजयदुर्गला प्रदक्षिणा मारली.
तीन दिवस आणि तब्बल हजारएक दुर्गप्रेमी विजयदुर्गच्या या अंगणात राहिले, बागडले. त्यांनी हा गड पाहिला, अनुभवला, त्याचा इतिहास-भूगोल दोन्हीही जागवला. कुणी त्याची छायाचित्रे काढली, कुणी त्याची चित्रे! कुणी कविता केल्या, कुणी पोवाडे रचले. काहींनी या तीन दिवसांत गडाची साफसफाई केली, तर काहींनी त्याच्या ढासळलेल्या घराचे चार दगड पुन्हा रचले. दरवाजांना तोरणे बांधली गेली, देवालयात दिवे लागले. गेले कित्येक वर्षे उपेक्षेच्या खाईत पडलेले आमचे हे धारातीर्थ जणू पुन्हा जिवंत, नांदते झाले. ..आपल्याच वारसांनी वृद्धापकाळी तरी आपली जाणीव ठेवली हे पाहून आठशे वर्षांचा तो पुराणपुरुष ‘विजयदुर्ग’ही भारावला!
महाराष्ट्र हा दुर्गाचा देश आहे, यामुळेच हा दुर्गप्रेमींचाही देश आहे. अशाच दुर्गप्रेमींना एकत्र बांधत, या संमेलनातून याविषयी समाजप्रबोधन केले जाते. चार दिवसांच्या या सोहळय़ातून स्थानिक गावांमध्ये हालचाल निर्माण होते. निवास-न्याहारी योजनेतून अर्थव्यवस्थेला चालना मिळते. स्थलप्रसिद्धीतून भविष्यात स्थानिकांसाठी पर्यटन व्यवसायाच्या चार संधीही निर्माण होतात. एकाचवेळी दुर्गजागरण आणि स्थानिकांना रोजगार या दोन्ही गोष्टींसाठी हे संमेलन निमित्त ठरते. आमचे जागोजागीचे किल्ले खऱ्याअर्थाने वाचवायचे असतील तर त्यासाठीची ही एक आदर्श पाश्र्वभूमी आहे. जी अशा दुर्गसाहित्य संमेलनातून तयार होते. यंदाच्या ‘विजयदुर्ग’गाथेचे यश इथेच कुठेतरी आहे!

story of vijaydurg

vasai naigaon marathi news
वसई : दहा वर्षांपासून नायगाव खाडी पुलाचे काम अपूर्णच, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कामकाज ठप्प
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
indian tectonic plate
तिबेट खालील भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगणार? भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता; याचा काय परिणाम होणार?
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
chandrapur tirupati balaji loksatta news
बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा, पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून…
Suvarnadurga Fort marathi news
दापोली येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार ‘वर्ल्ड हेरीटेज’चा दर्जा; जिल्हा प्रशासनाकडून पाहणी
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?
Loksatta kutuhal How minerals got their names
कुतूहल: खनिजांना नावे कशी मिळाली?
Story img Loader