आपल्याकडे अनेक प्रेक्षणीय, महत्त्वाची स्थळे येता-जाता वाटेवर असूनही आपल्याकडून ती सहजपणे दुर्लक्षित होतात. समाजाचे दुर्लक्ष आणि सरकारच्या उपेक्षेतून हळूहळू अशी स्थळे दृष्टिआड होऊ लागतात. पुणे-बेंगलोर महामार्गावरील पुणे जिल्हय़ातील नसरापूरजवळचा ‘स्वराज्य स्तंभ’ही असाच वर्तमान आणि समाजाशी नाळ तुटलेला!
पुण्याहून तीसएक किलोमीटरवर नसरापूरफाटा. याला चेलाडी असेही म्हणतात. या जागेवरूनच पुरंदर, भोर, रोहिडा, रायरेश्वर, राजगड, तोरणा, सिंहगड आदी ऐतिहासिक स्थळांकडे मार्ग फुटतात. शिवरायांच्या स्वराज्याचेच जणू हे प्रवेशद्वार! स्वराज्य स्थापनेस जेव्हा तीनशे वर्षे पूर्ण झाली तेव्हा या स्थळीच तत्कालीन भोर संस्थानने हा स्तंभ उभारला.
महामार्गावरील वर्दळीमुळे आज हा सारा भाग हॉटेल, टपऱ्यांनी व्यापून गेला आहे. या टपऱ्यांच्या गर्दीतच स्वराज्याचा हा स्तंभ शोधावा लागतो. पण इथे पोहोचल्यावर त्याची भव्यता आणि दर्शनाने उडायलाच होते. एका मोठय़ा बांधीव चौथऱ्यावर हा तब्बल नऊ मीटर उंचीचा स्तंभ! तळाशी चौकोनी, मध्ये अष्टकोनी, त्यावर गोलाकार आणि शिरोभागी कलश-श्रीफळ घेतलेला! यातील चौकोनी भागाच्या चारी अंगांना संगमरवरात लेखांचे, तर त्याच्यावर अर्धवर्तुळाकार महिरपींमध्ये विविध विषयांवरचे शिल्पपट बसवलेले.
पश्चिम दिशेने स्मारकात शिरलो, की या बाजूचा देवनागरीतील लेखच आपल्याला या स्मारकाची माहिती देत पुढे येतो-
छत्रपति श्री शिवाजी महाराजांनी
महाराष्ट्रांतील या प्रदेशांत
स्वराज्याचा पाया घातला. त्या
घटनेचा त्रिशत्सांवत्सरिक
उत्सवाच्या प्रसंगी हा स्मारकस्तंभ
भोरचे अधिपती श्रीमंतराजे
सर रघुनाथराव पंडित
पंतसचिव के. सी. आय. ई.
यांनी उभारला    शके १८६७
छत्रपती शिवरायांनी इसवी सन १६४५मध्ये रायरेश्वरावर स्वराज्याची जी शपथ घेतली त्यास १९४५मध्ये तीनशे वर्षे पूर्ण झाली. याबद्दल त्या वर्षी तत्कालीन भोर संस्थानच्या पंतसचिवांनी त्याचवर्षी हा स्तंभ उभा केला. वरील लेखातील याच आशयाचा मजकूर उर्वरित बाजूंवर संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी भाषेत कोरला आहे. या लेखांच्या वर महिरपीमध्ये एकेक शिल्पपट बसवलेला आहे. यामध्ये पश्चिम अंगास स्वराज्य स्थापनेचा प्रसंग, उत्तर अंगास धनुष्यबाण आणि बाणांनी भरलेला भाता दाखवला आहे. पूर्वेस शिवमुद्रा कोरली आहे. तर दक्षिण अंगास ढाल-तलवारीची छबी संगमरवरात उतरवली आहे. यातील पश्चिम अंगाचे शपथ सोहळय़ाचे शिल्प तर आवर्जून पाहावे असे आहे.
या शिल्पपटात खांब, महिरपी, कोनाडय़ातून मंदिराची रचना साकारली आहे. मधोमध ती आई भवानी अष्टभूजा महिषासुरमर्दिनीच्या रूपात विराजमान आहे. तर तिच्या पुढय़ात कुमारवयातील शिवबा त्यांच्या सवंगडय़ांसह स्वराज्याचे दान मागत आहेत. प्रसन्न भाव, पाय दुमडलेले आणि दान घेण्यासाठी हात उचललेला अशी शिवबांची मुद्रा. बरोबरचे सवंगडीही त्याच भक्तीच्या भावात. भोवतीने ढाल-तलवार, धनुष्यबाण, कु ऱ्हाड आदी शस्त्रे खाली ठेवलेली. उठावातील हे सारे शिल्प, त्यातील पात्रे त्रिमितीचा उत्तम भास निर्माण करतात.
फक्त एकच गोष्ट, शिवाजीमहाराजांनी हिरडस मावळातील रायरेश्वर मंदिरात शपथ घेतलेली असताना इथे भवानीमातेसमोर हा प्रसंग कसा सादर केला हे कळत नाही.
या शिल्पांच्या जोडीनेच या स्तंभाच्या चौथऱ्यावर तत्कालीन स्वराज्यातील स्थलखुणा दर्शविणाऱ्या संगमरवरी पट्टय़ा बसवल्या आहेत. मराठी-इंग्रजी भाषेतील या मार्गदर्शिकांवर तत्कालीन गावे-शहरे, गडकोटांचे उल्लेख, त्यांची या स्तंभापासूनची अंतरे दिलेली आहेत. उत्तरेस सुधागड ४१ मैल, सिंहगड साडेअकरा मैल, तुंग ३९ मैल, तिकोना ३८ मैल; आग्नेयेस पुरंदर ६ मैल; नैर्ऋत्येस आंबाड खिंड १६ मैल, भोर ८ मैल, रोहिडा १२ मैल, आंबवडे साडेचौदा मैल, रायरेश्वर साडेअठरा मैल तर पश्चिमेस राजगड साडेतेरा मैल आणि तोरणा १९ मैल अशी माहिती दिलेली आहे. या साऱ्यांतून जणू स्वराज्याचा भूगोलच जोडला जातो. या भूगोलातून मग इतिहास नाचू लागतो.
शिवकाळ, त्याचा इतिहास जागवणारे असे हे स्मारक. पण आज मात्र ते उपेक्षेच्या खाईत आहे. दुर्लक्षित, एका कोपऱ्यात बंदीवानाचे जीवन जगत आहे. त्याच्यावरील काही शिल्पपटांना हानी पोहोचली आहे तर काही लेखांवरची अक्षरे पुसू लागली आहेत. या साऱ्याला वेळीच वाचवले नाही तर एका स्मारकाचेच स्मरण करण्याची वेळ येईल.
खरेतर महामार्गालगत असलेल्या या स्मारकाभोवती एखादी बाग फुलवली, या स्मारकाची माहिती लावली तर येत्या-जात्या साऱ्यांनाच त्याचे महत्त्व कळेल. चार पावले इथे थांबतील, इतिहासाची खरी प्रेरणा घेऊन पुढे जातील. पण हे करायचे कुणी? आमच्याकडे या साऱ्यांच्या विश्वस्तपदाची जबाबदारी आहे ते शासनच ही अशी खरीखुरी ऐतिहासिक स्मारके वाऱ्यावर सोडून समुद्रात पुतळा बांधायला निघाले आहे..!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा