दैनंदिन आयुष्यामध्येच ज्यांना दररोज नवनव्या आव्हानांना सामोरे जावे लागते, त्या विशेष मुलांसाठी ‘गिर्यारोहण’ विश्वातील आव्हान खरेतर अशक्य कोटीतील, पण याच अशक्य वाटणाऱ्या आव्हानास ‘नवक्षितिज’च्या २१ विशेष मुलांनी शक्य करून दाखवले. पहेलगाम परिसरातील हिमपर्वत आणि हिमनद्यांच्या परिसरात या विशेष गिर्यारोहकांनी आपली पावले उमटवली आणि जणू त्या हिमालयानेही त्यांना आपलेसे केले.
ज्यांना स्वत:कडे लक्ष देण्याचेही भान नसते, ज्यांना आणि त्यांच्यासाठी इतरांनाही दैनंदिन जगण्याच्या लढाईतही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते अशा या विशेष मुलांसाठी कुठली गिर्यारोहण मोहीम ही कल्पना देखील अंगावर काटा आणणारी. पण हे शिवधनुष्य ‘नवक्षितिज’ संस्थेने उचलेले आणि अनंत अडचणी आणि आव्हानावर मात करत शक्यही करून दाखवले.
‘नवक्षितिज’ची ही गिर्यारोहण मोहीम होती पहेलगाम, श्रीनगर सोनमर्ग व गुलमर्ग भागात. या भागातील हिम पर्वत आणि हिम नद्यांच्या परिसरात. ज्यांना दैनंदिन जीवन जगताना मदतीचे अनेक हात द्यावे लागतात, त्यांच्यासाठी इथे गिर्यारोहणासाठी तर असंख्य मदतीचे दोर बांधावे लागले.
सर्वात अगोदर मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मार्गाचा या मुलांच्या दृष्टीने आधी आढावा घेण्यात आला. यासाठी येणाऱ्या खर्चासाठीही हातपाय हलवले गेले. ही सारी पूर्तता झाल्यावर या मोहिमेवर जाण्यासाठी मुलांची शारीरिक आणि मानसिक तयारीकडे संस्थेने लक्ष वळवले. मोहिमेपूर्वी अनेक दिवस अगोदर व्यायाम, डोंगर-टेकडी चढ-उताराचा सराव सुरू झाला. छोटे-मोठय़ा पदभ्रमण मोहिमांमधून प्रत्यक्ष अनुभवाची शिदोरी जोडण्यास सुरुवात झाली. अशा या अथक परिश्रमानंतर ही एकवीस विशेष मुले-मुली, स्वयंसेवक अशा पंचेचाळीस जणांच्या गटाने पहेलगामकडे कूच केले.
पहेलगामपासून या मुलांचे पदभ्रमण सुरू झाले. बर्फाच्छादित डोंगर, त्यावरील घाटवाटा, चिनार, पाईन, देवदारची वृक्षराजी, धबधबे, खळखळणाऱ्या नद्या या साऱ्यातून जाताना ही मुले हरखून गेली. मनाच्या या उभारीने पायांना बळ दिले. वाटेमध्ये अनेक ठिकाणी छोटे छोटे ओढे आडवे येते होते. यावर ओंडके टाकत छोटे पूल तयार केलेले होते. हे अवघड मार्गही या विशेष गिर्यारोहकांनी पार केले.
पहेलगामचा परिसर, गुलमर्गजवळील गंडोला येथील हिमनद्यांच्या परिसरात या मुलांनी यथेच्छ भटकंती केली. या हिमनद्यांच्या परिसरातील उंची होती तब्बल साडेदहा हजार फुटांपेक्षा जास्त तरीही ही मुलांनी या विरळ वातावरणातही आपली पावले टाकली.
बर्फातील भटकंतीचा आनंद घेतला. पुढे असाच श्रीनगपर्यंतचा टप्पा या मुलांनी पार केला आणि जणू त्यांच्यातील अपुरेपणालाच
आव्हान दिले. आम्हीही कुठे कमी नाही, आम्हीही इतरांप्रमाणेच कुठल्याही आव्हानाला तोंड देऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले. विशेष मुलांमधील ‘आत्मविश्वास’ जागवणारा, त्यांचे मनोबल वाढविणारा असाच हा अनुभव होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा